यशवंतरावांना लोकजीवन समृद्ध करण्यासाठी तसेच महाराष्ट्राची प्रादेशिक एकात्मता भक्कम करण्यासाठी आणि माणसांची भावनात्मक एकात्मता टिकविण्यासाठी लेखकांनी आपली लेखणी झिजवावी असे वाटते. याशिवाय शास्त्रीय माहिती व वैज्ञानिक संशोधन मराठी भाषेत झाले पाहिजे असा वारंवार आग्रह ते धरतात. "ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील मूलभूत संशोधन हाती घेण्याचा प्रयत्न ज्या भाषेत होतो तीच ज्ञानाची भाषा होऊ शकते. " आज आपल्याला हे मान्य करावेच लागेल. त्याशिवाय त्या भाषेला 'ज्ञानभाषा' होता येत नसते. आणि अमृताचे पैजा जिंकायचे असेल, ज्ञानेश्वरांचे भाकीत खरे करायचे असेल तर शास्त्रीय माहिती मराठीत उपलब्ध झाली पाहिजे. इतर भाषेमधील ज्ञानभांडार खेचून आणण्याची भाषा यशवंतराव करतात, इतकी त्यांना गरज वाटते आणि यासाठी साहित्य संस्कृती मंडळाने 'पॉवर हाऊस बनावे' असे ते म्हणतात. पॉवर हाऊस हे सृजनशील असते. इतरांची उचलेगिरी करणारे नसते. हे मंडळ महाराष्ट्राचे जीवन व्यापक, विस्तृत व क्रियाशील करणारे माध्यम बनावे अशी इच्छा ते बोलून दाखवतात. यावरून यशवंतराव साहित्याच्या भाषा आणि माध्यमाकडे आणि साहित्यिकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहात होते ते स्पष्ट होते.
साहित्यातील सामाजिक जाणीव
यशवंतराव चव्हाण यांनी 'सामाजिक जाणीव' प्रकट केली हे त्यांच्या साहित्याचा अभ्यास करताना सहज लक्षात येते. सामाजिक जाणिवेच्या स्वीकारामध्ये समाजाच्या स्थितीगतीचा अतिशय गांभीर्याने त्यांनी शोध घेतला. समाजाची प्रगती, जडणघडण, सामाजिक, आर्थिक संबंध, समाजातील अंत:प्रवाह इ. विविध घटकांचे परस्परसंबंध तसेच शोषण, पिळवणूक, गुलामगिरी या सगळ्यांची सामाजिक जाणीव त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. तेथेच सामाजिक या संज्ञेला अर्थ प्राप्त होतो.
कोणत्याही साहित्याचे वेगळेपण हे जसे त्यातून व्यक्त होणा-या जाणिवांवर अवलंबून आहे. तसेच त्या साहित्याचे श्रेष्ठत्व किंवा सामान्यत्वही लेखकाने व्यक्त केलेल्या जीवन जाणिवांच्या उत्कटतेवरच अवलंबून असते. प्रतिभावंताची संवेदना मान्य केली की जीवनानुभवाचे सामर्थ्यही मान्य करावे लागते. केशवसुत, हरिभाऊ, वामन मल्हार जोशी, मुक्तिबोध तसेच काही प्रमाणात खांडेकर, मर्ढेकर, अनिल, कुसुमाग्रज यांनी सामाजिक जाणीव ठेवून लेखन केले. अलीकडच्या काळात दलित साहित्याच्या संदर्भात, ग्रामीण साहित्याच्या संदर्भात, 'सामाजिक जाणीव' ही संज्ञा वापरली जाते. समाजासह जाणारे, समाजाच्या संगतीने जाणारे असे साहित्याचे स्वरुप असते. एक प्रकारच्या आंतरिक प्रेरणेने, अंत:स्फूर्तीने लेखक साहित्य निर्माण करीत असतो. त्यामध्ये समाजाच्या स्थितीगतीचा व जडणघडणीचा विचार अपेक्षित असतो. "समाजजीवनात घडणा-या अनेकविध घडामोडीसंबंधीची उत्सुकता आणि ओढ जेथे कलावंत मनाला वाटत असते आणि त्या घडामोडी तो आपल्या साहित्यातून मांडत असतो अशाच ठिकाणी 'सामाजिक जाणीव' ही संज्ञा वापरली जाऊ शकते. " साहित्यिक हा समाजातच जन्मतो. त्याची सृजनशक्ती ही सामाजिक घटना कल्पनांच्या रुपाने व्यक्त होते. म्हणून सामाजिकता व सृजनशक्ती यांच्या विधायक मिश्रणातूनच साहित्यिकांची साहित्यिकता सिद्ध होते. सामाजिकतेशिवाय साहित्य व साहित्यिक निर्माण होऊच शकत नाहीत. म्हणून साहित्यिकांची सामाजिकता ही त्यांच्या निर्मितीचे समर्थनही असते व साधनही असते.
साहित्य हे समाजाची सांस्कृतिक गरज भागविणारी निर्मिती असते. तत्कालीन समाजाच्या स्थितिगतीचा परिणाम साहित्यनिर्मितीवर होत असते. थोडक्यात समाजाची ज्या प्रकारची स्थितिगती असेल, ज्या प्रकारचे काळाचे आव्हान असेल, ज्या प्रकारच्या जीवनविषयक मूल्यकल्पना असतील, त्या प्रकारची 'जाणीव' लेखकाच्या भावविश्वाबरोबरच त्यांचे विचारविश्वही शिल्पित करीत असते. "म्हणूनच 'सामाजिक जाणिवा' असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा समाजाच्या स्थितीगतीबद्दलचा विचार गृहित असतो किंबहुना कलावंतांच्या विचार विश्वाचा परिपाक म्हणजेच 'सामाजिक जाणीव' असते." साहित्यातील सामाजिकता व सामाजिक जाणीव ही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देत असते असे मत ते व्यक्त करतात.