विरंगुळा - ९७

मीही अशा स्थानांची महत्त्वाकांक्षा धरली होती हे म्हणणे खरे नाही. किंवा त्यासाठी कुणाच्या पाठीमागे लाचारीने लागलो असेही नाही. परंतु जेव्हा जबाबदारी आली तेव्हा मागे फिरून पाहिले नाही.

अडचणींची व संकटांची कल्पना माझ्या इतकीच तुलाही आहे. कोणत्या परिस्थितीत कोणते काम स्वीकारले व ते का हे तुझ्या इतके दुसऱ्या कुणालाही माहिती नाही. टीकाकार स्वाभाविकच सत्तेच्या मागे लागले आहेत वगैरे म्हणणार याची मला कल्पना आहे. मी त्यांच्याशी वाद घालायला जाणार नाही. पण योजून एखादी सत्तेची जागा हस्तगत करावयाची असे मी कधीच केले नाही. पण वस्तुस्थिती आहे की सातत्याने गेली तीस वर्षे सत्तास्थानावर आहे.

जाणावीपूर्वक सत्तेचा उपयोग सामाजाच्या परिवर्तनासाठी करावयाचा माझा प्रयत्न राहिला. नव्या विचारांना सामोरा गेलो. मुख्यत: दलितांबद्दल कणव ठेवून सामाजिक न्याय प्रस्थापित केला पाहिजे ही माझी धारणा प्रथमपासूनची होती. माझ्या हातात संपूर्ण (!) सत्ता होती तेव्हा त्या सत्तेचा आग्रहाने व योजनापूर्वक दृष्टीने आणि वर उल्लेखिलेल्या उद्दिष्टांसाठी उपयोग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

त्याचा काही परिणामही झाला. त्या धोरणाने अनेक नवी माणसे महाराष्ट्रात उभी करण्याचा मी प्रयत्न केला.

जे आपल्यासाठी कोणी केले नाही ते आपण इतरांसाठी करावे आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असताना ते केले तर अधिक फलदायी होते. म्हणून अधिक मित्रभावाने, हळुवारपणे पण विचाराच्या दिशा कायम ठेवून माणसे मी वागविली आणि वाढविलीही.

हे सर्व ठीक आहे. पण आज मी जेव्हा राजकारणातले चित्र पाहतो तेव्हा माझे मन अस्वस्थ होते. खरोखरीच आपण काही नव्या कामाचा पाया घातला होता का? खरी जिव्हाळ्याची माणसे आवती भोवती होती का? काही काही माणसांचे नमुने पाहिले म्हणजे आश्चर्यही वाटते - खरे म्हणजे दु:ख होते.

झाले हे पुरे नाही का? हा असाच खेळ पुढे किती दिवस कुणासाठी आणि काय म्हणून चालू ठेवायचा असा प्रश्न माझ्यापुढे उभा आहे.

मी काही राजकारण संन्यास घेण्याचा विचार करीत नाही. विचार येतो निवडणुकांचा आणि सत्ता स्थानांचा. आज सत्ता स्थानावर राहण्याची अनेकांची धडपड चालू आहे. जे आहेत ते तेथेच कसे राहता येईल यासाठी साधनशुचितेचा कसलाही विचार न करता अगदी क्रूरपणे कारस्थाने करताहेत.