विरंगुळा - ९२

१९७४ पासूनच देशातील राजकारणाला संपूर्ण क्रांतीचं वळण लागण्यास प्रारंभ झाला होता. १९७५ मध्ये याची परिणती आणीबाणी पुकारण्यात घडली. नजरकैदेच्या अफवेचा प्रकार १९७५ला आणीबाणी सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच ऐकावा लागला. पंतप्रधानांच्या गोटातूनच अफवा पसरविल्या जात असल्याचं त्यावेळी दिल्लीत कुजबुज होती. मंत्रिमंडळातील सहकारी आणीबाणीस अनुकूल नव्हते. दहशतीनं त्यांनी स्वस्थ रहावं अशासाठी अफवांचा मार्ग अवलंबिला जात असावा असा काहींचा तर्क होता. आणीबाणी सुरू होण्यापूर्वीपासूनच म्हणजे १९७४ पासूनच यशवंतरावांचं परदेश दौऱ्याचं वेळापत्रक मात्र तंतोतंत होतं.

त्यांचे हे दौरे एकाकी होत असत. वेणूताईंना आजारपणामुळे धावपळीचे दौरे झेपणारे नव्हते. ही खंत यशवंतरावांना अस्वस्थ करीत असली तरी दौऱ्यात असताना वेणूताईंशी पत्राद्वारे संवाद साधून मन मोकळं करण्याचा त्यांचा परिपाठ त्यांनी कायम राखला. १९४९ मध्ये वेणूताई क्षयरोगातून सावरल्यावर मिरजेच्या दवाखान्यातून त्यांना घरी परत आणण्यासाठी यशवंतराव गेले असताना, 'आता मला संतती होणार नसल्याने तुम्ही दुसरं लग्न करा' असं वेणूताईंनी सांगितलं होतं. तेव्हा 'मला वंशाला दिवा असण्याची गरज नाही, यापुढे मला तू आणि तुला मी असं सांगून यशवंतरावांनी हा विषय तिथेच संपवला होता. पत्नीला हे जे वचन दिलं त्याला आता १९७४ पर्यंत पंचवीस पावसाळे उलटले. दोघांनीही याचं कसोशीनं पालन केलं. या वचनाची स्मृती यशवंतरावांच्या मनाच्या कप्प्यात किती घट्ट होती याचं प्रतिबिंब परदेश दौऱ्यावर असताना त्यांनी वेणूताईंना लिहिलेल्या पत्रात उमटलेलं आढळतं.

२६ एप्रिल १९७४ला ते दिल्लीहून 'कौलालंपूर' शहराच्या दौऱ्यावर निघाले. त्याच दिवशी दुपारी कौलालंपूरला पोहोचले. वाटेत दोन तास बँकॉक येथे थांबले होते. या दोन तासात विमानतळाजवळच त्यांनी 'अयोध्या' पाहिली. ते लिहितात-
------------------------------------------------------------

अयोध्या पहाण्यासाठी गेलो. आज ती अयोध्या ओसाड आहे. काही पडलेल्या इमारतींचे अवशेष आणि मंदिरांचे भग्न अवशेष जुन्या वैभवाची पुसटशी साक्ष देत आहेत. तसे म्हटले तर पहाण्यासारखे काही नाही. नाही म्हटले तरी ४०० वर्षे हे शहर या देशाची राजधानी होते. १८व्या शतकाच्या शेवटी ब्रह्मी सैन्याने आक्रमण करून या शहराचा विध्वंस केला. भारतापासून हजारो मैल दूर अंतरावरील ही 'अयोध्या' पहाताना हजारो वर्षांच्या सांस्कृतिक संबंधांचा इतिहास मनात गर्दी करून गेला.
-यशवंतराव
------------------------------------------------------------