काल रात्री येथील बीचवर प्रधानमंत्री मॅनली यांची पार्टी होती. त्याला हजर राहिलो. सर्व Heads of Govt. हजर होती. जमेइकन संगिताची पार्श्वभूमी आणि सागराच्या तालबद्ध लाटांची लय यांची साथ, यामुळे पार्टी लगेच जमून गेली. गप्पांचा कलकलाट, अधून मधून हास्यांची उडणारी कारंजी, हातात हात घालून इकडे तिकडे भटकणारी जोडपी, सगळे वातावरण कसे मोकळे होते. कॅनडाचे प्रधानमंत्री श्री. ट्र्यूडो आणि श्रीमति ट्र्यूडो हे जोडपे विशेष खूष दिसले. संगीत अधिक तेज होताच या जोडप्याने नृत्याचा श्रीगणेशा केला. बहुतेक सर्व जोडपी त्यात सामील झाली. अशा तऱ्हेने हा आनंद समारोह रात्री ११ वाजेपर्यंत चालू होता. या पार्टीमध्ये मोकळेपणाने दोन-चार सिंधी धनिक जोडपी होती. जगात कोठेही जा सिंधी तेथे असतातच. नुसतेच असतात असे नाही तर महत्त्वाचे व्यापारी असतात. इंपोर्ट-एक्सपोर्टचा त्यांनी कब्जा केलेला असतो. सर्वांचा पुणे, मुंबईशी संबंध असल्यामुळे केव्हातरी ते आपल्याला भेटलेले असतात. त्या सर्वांनी तू बरोबर आहेस का म्हणून चौकशी केली आणि माझ्या एकाकीपणावर त्यांनी नेमके बोट ठेवले.
गेले दोन-तीन दिवस अनेक प्रश्नांनी माझ्या मनात काहूर मांडले आहे. या प्रश्नांची उत्तरे काय आहेत कोण जाणे. पण प्रश्न तरी नेमके काय आहेत व त्यांची उत्तरे काय असावीत किंवा असू शकतील हे एकदा कागदावर मांडून पहावे असे मनात आले आहे.
कामाच्या व प्रवासाच्या दैनंदिन गर्दीमध्ये आपल्या अंतर्मनात डोकावून पहाण्यासाठीही सवड व शांतता मिळत नाही. येथील निवांत वातावरणामध्ये कदाचित हे शक्य होईलसे वाटते. हे लिहिणे (पत्रे) म्हणजे तुझ्याशी केलेली संभाषणेच आहेत. तेव्हा हे सगळे तुझ्याशी बोलायचे नाही तर कोणाशी?
मी सुरुवातीला म्हटले आहे की गेल्या दोन-तीन दिवसात प्रश्नांनी काहूर मांडले आहे. याचा अर्थ ते प्रश्न काही दोन तीन दिवसात निर्माण झालेले नाहीत. गेले अनेक महिने - काही वर्षे म्हटले तरी चालेल, हे प्रश्न जमून गेले आहेत.
काही प्रश्न जसजसे उभे राहात गेले त्या त्या वेळी तात्कालिक उत्तरे मिळत गेली. पण सुसंगत उत्तरांची आखणी झालेली नाही. ही एक रुखरुख मनाला लागून आहे. येथील मुक्कामात ही रुखरुख स्वस्थ बसू देईना एवढाच त्याचा अर्थ.
पुढल्या वर्षी तीस वर्षे होतील. मी पहिली निवडणूक जिंकून सरकारमधे आलो. अनेक अडचणी आल्या. परिश्रम करावे लागले. अनेकांचे आशीर्वाद मिळाले. लौकिक अर्थाने नावलौकिक मिळाला. सत्तेची अनेक स्थाने पाहिली. राज्यात आणि केंद्रात. सामान्य अर्थाने कुणालाही हेवा वाटावा अशी!