विरंगुळा - ९८

असल्या कारस्थानात अप्रत्यक्षपणे सामील न होता, किंवा त्या कारस्थानाचे बळी होण्यापूर्वीच, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन बाजूला झाले तर बरे नाही का? असा प्रश्न मनात घोळतो आहे.

याचा निर्णय कसा घ्यावयाचा. त्या निर्णयासाठी कोणत्या कसोट्या लावावयाच्या? फक्त आपल्या स्वत:च्या भावनांचा (Subjective) विचार करून निर्णय करावयाचा का? तर उत्तर 'होय' असे येते.

श्रीमतीजी अजून महत्त्वाच्या कामात सल्लामसलत घेतात पण सत्तेच्या वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याचा समजेल असा प्रयत्न करतात असा अनुभव आहे. मग मन धुमसत राहते. असे अपमानित राहण्याने ज्यांचा मी प्रतिनिधी आहे असे मानतो, त्यांचाही अपमान तर होत नाही ना, अशी बोचणी असते.

मी माझी समजूत घालतो की, असा वैयक्तिक भावनांचा विचार करून निर्णय घ्यावयाचे नसतात. राष्ट्रीय कार्य करीत असताना स्वत:ला विसरले पाहिजे, भविष्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. रागाने मोडता येते, जोडता येत नाही. तडजोडीने वागले पाहिजे असा विचार करून मग काम चालू राहते.

पण खऱ्या अर्थाने काम चालू आहे का? की एका व्यक्तीचा अहंकार सुखविण्यासाठी हे सर्व चालू आहे?
 
काँग्रेस पक्ष हे मी माझे सर्व जीवन मानले. ती काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसमध्ये लोकशाही राहिली आहे का? सत्ता मिळवून ते ताब्यात ठेवण्याचे यंत्र म्हणून आज काँग्रेस वापरली जात आहे.

आजची शासनयंत्रणा अत्यंत आधुनिक तंत्रे वापरून अधिक एककेंद्रित होत आहे. प्रसंग पडला तर ही यंत्रणा जीवघेणा निष्ठुरपणा दाखविण्यासही मागे पुढे पाहणार नाही असे आधुनिक सत्तेचे सर्व जगातच स्वरूप दिसत आहे. आपला देशही याला अपवाद नाही. या पद्धतीत माझे मन रमत तर नाहीच पण तिच्या विरुद्ध मनात विष आहे.

जनतेची काँग्रेस खऱ्या अर्थाने बनावी यासाठी जनतेत राहिले पाहिजे असे मला एकसारखे वाटते. श्रीमतीजींना विरोध करण्यासाठी नाही. माझी तशी भावनाच नाही. प्रथमपासून माझा त्यांच्याकडे ओढा होता हे तुला माहिती आहे.

१९६९ मध्ये मी त्यांच्याविरुद्ध मत दिले ते त्यांना सत्तेवरून काढण्यासाठी, हे निदान माझ्याबाबतीत तरी खरे नाही. मी त्यांचे मत एकसारखे विचारले होते. त्यांचे मत बनत नव्हते. हे करू का ते करू अशी चंचलता होती. शेवटी मी जे ठरवीन ते इतरांनी मानावे अशी त्यांची रीत होती.