विरंगुळा - १००

मॉटेंगो बे मधील 'हॅपी डेज्' या बंगल्यातून शांत समुद्र दिसतो आहे. जसा मलबार हिलवरील 'ऐरी' बंगल्यातून दिसत असे तसा. त्यावेळी माझी जी मन:स्थिती होती तीच आज आहे की काय, न कळे!

वातावरण प्रसन्न आहे. खूप विश्रांती मिळाली. मन मोकळे झाले. आता ४॥ च्या विमानाने किंग्जटनला परतावयाचे आहे.

हे सर्व लिहीत असताना तू समोर बसली आहेस असे मला एकसारखे वाटत होते.
-यशवंतराव

सारी चिंता
बजबजपुरीची

राज्यात आणि केंद्रात राजकारणात व्यग्र असताना वर्षांमागून वर्षे जे प्रश्न निर्माण झाले आणि मनात जमून राहिले त्या प्रश्नांची उत्तरे काय असावीत किंवा काय असू शकतील याविषयी यशवंतरावांनी १९७५ च्या मे महिन्यात माँटेगो बे या जमेइका देशातील निवांत ठिकाणी चिंतन केले. स्वत:शी स्वत:च केलेला संवाद हे या चिंतनाचे स्वरूप आहे. या मूक संवादाचं त्यांनी पत्ररूपानं शब्दांकन केलं आहे. ज्या कोणाच्या मनात एक किंवा अनेक प्रश्नांची गर्दी जमते तेव्हा त्या प्रश्नांच्या निकालासाठी, निर्णयासाठी स्वत:शी संवाद करावाच लागतो. अशा संवादाने तो निर्णयाशी पाहोचतोही. वेणूबाईंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी 'हे सर्व लिहीत असताना तू समोर बसली आहेस असे एकसारखे वाटत होते.' या वाक्याने पत्राची इतिश्री केली आहे. हा एक अनोखा मूकसंवाद म्हटला पाहिजे.
त्यावेळच्या राजकारणातील वक्र चालीने अस्वस्थ बनलेले त्यांचे मन 'यातून वेळीच बाजूला होणे योग्य नाही का?' असा विचार करीत असतानाच 'लोकात काम करीत राहावे' असेही त्यांचे मन त्यांना सांगते. सार्वजनिक जीवनांत आणि राजकारणांत जी तत्त्वे मानली त्याच्या भविष्याचे काय? हा एक प्रश्न त्यांना भेडसावतो. यापेक्षाही काँग्रेस पक्ष हे त्यांनी आपले सर्व जीवन मानलेले असल्याने 'ती काँग्रेस कुठे आहे?' असा प्रश्न स्वत:ला विचारतात. मला महाराष्ट्र काँग्रेस पक्षालाच मार्ग दाखविला पाहिजे असेही स्वत:ला बजावतात. छुपे शत्रू आणि वरवर दिसणारे मित्र याचाही ते उल्लेख करतात. सत्तास्थानावर राहण्यासाठी सुरू असलेली क्रूर कारस्थाने, साधन सुचितेचा अभाव, मी जे ठरवीन ते इतरांनी मानावे ही दिल्लीतील सत्ताधाऱ्याची वृत्ती असा एकूण आढावा त्यांनी त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधताना घेतलेला असला तरी, मी काही राजकारण संन्यास घेण्याचा विचार करीत नाही असा निर्वाळाही दिला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसला मार्ग दाखविण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात खिळखिळा झालेला महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष त्यांनी एकसंध, भक्कम बनवला. सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या पाठीशी प्रचंड जनशक्ती उभी करण्याची किमया घडविली. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ तयार करताना दिल्लीला हस्तक्षेप करू दिला नाही. आमदारकीसाठी उमेदवार निश्चित करताना एकमताने यादी तयार करण्याची प्रथा सुरू केली. याचबरोबर महाराष्ट्र हे सर्वांगिण विकासाचे देशातील एक अग्रेसर राज्य व्हावे यासाठी धोरणसूत्री तयार करून त्याची विनाविलंब अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनात शिस्त निर्माण केली.