विरंगुळा - ३८

१९ जानेवारी

हैद्राबादच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा करण्याची तयारी श्री. किडवाई यांनी दर्शविली होती. त्यानुसार वर्किंग कमिटी संपली आणि त्याच रात्री किडवाई यांच्या सलून मधून प्रवास केला. ७ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत खूप मजेदार गोष्टी श्री. किडवाई यांनी सांगितल्या. पं. मोतीलालजींबद्दल त्यांना फार आदर आहे. पं. जवाहरलाल नेहरूंवर प्रेम आहे. परंतु त्यांच्या चुका दाखविण्याइतका घरोबा असल्यामुळे मोकळेपणाने सहज त्यांचे अनेक दोष दाखवून देतात.

Jawaharlal will consult only those who usually agree with him but Motilal used to consult only them who used disagree and... with him. That is the difference between the father and the son.
-----------------------------------------------------------
२० जानेवारी

सकाळी सोलापुरात स्नान करून मोटारीने विजापूरला आलो. दुपारची चर्चा छान झाली. रात्री ९.३० च्या जाहीर सभेत किडवाईंचे भाषण प्रथम ऐकले. शांत व स्पष्टपणे बोलण्याची बरी तऱ्हा आहे. मात्र वक्तृत्वाची हौस त्यांच्यात नाही. त्याच्याविना त्यांचे काम अडतही नाही. त्यांच्या हजेरीत माझ्या 'हिंदी' भाषणाची काय त्रेधा झाली असेल कल्पना करवत नाही. पण बोललो, चांगली वीस मिनिटे! विजापूरहून सकाळी ८ वाजता परत निघालो. भीमा ओलांडून अलीकडे आल्यावर निंबर्गी गावाकडे गेलो. शेतकी खात्यातील श्री. शिरोळे, येथे त्यांनी बरीच वर्षे चालू केलेले नाला बंडिंगच्या कामाचे परिणाम दाखविण्यासाठी हजर होते. छोटा ओढा अडवून 'नाला बंडिंग.' त्याच्या होणाऱ्या परिणामाचे प्रात्यक्षिक येथे पहावयास मिळाले. 'सब् सॉइल वॉटर' जमिनीच्या पोटातील पाण्याचा जिव्हाळा कमी खोलीवरच लागू लागला हा सर्वात मोठा फायदा दिसला. सहा ते आठ फुटावर खोलीत इंजिन चाललेले असते. चार मोठे पाण्याचे झरे दिसले. एका खडकावर विहिरीवर वीस एकराच्या पुढे उसाचे पीक भिजत असल्याचे पाहिले. छोटे बंधारे, बंदिस्त आणि नालाबंडिंग हे दुष्काळी भागावरचे कायमचे उपाय आहेत असा माझा विश्वास होता तो खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला.

सोलापुरात पोहोचताच आमदारांच्या बैठकीत चर्चा झाली. श्री. साने (कम्युनिस्ट) सावधरीतीने 'चढाई' क़रण्याच्या मूडमधे होते परंतु त्यांचे जमले नाही. दुष्काळी जिल्ह्याकडे पाठ फिरवून जिनिव्हाच्या शांतता परिषदेस गेले असल्यामुळे श्री. तुळशीदासजी हजर नव्हते. परंतु कोणी शिष्याने, पूर्वी लिहून ठेवलेले त्यांचे एक पत्र किंवा त्याची नक्कल आणून श्री. किडवाईचे हाती दिली. पत्र उद्देशून असे लिहिलेलेच नव्हते त्यामुळे कोणाचेही नाव घालून त्यास देण्यास हरकत नव्हती, असा त्या पत्राचा विनोदी थाट होता.

आज माझा उपवास होता. त्यामुळे चर्चेनंतर मी मुक्कामावर जाऊन स्वस्थ पडलो. पी. टी. आय. चा प्रतिनिधी आला होता. त्याला माझी इंप्रेशन्स सांगितली. आंतरराष्ट्रीय बंदी उठणे जरूर आहे हे वारंवार किडवाईंचे नजरेस मी आणले होते. आज दुपारी चर्चेचे वेळीही बैठकीत माझी भूमिका स्पष्ट केली होती. तीच गोष्ट पी. टी. आय. च्या माणसाजवळ पुन्हा स्पष्ट केली. रात्रीची सभा भव्य झाली.
------------------------------------------------------------