विरंगुळा - ४२

१ फेब्रुवारी

जानेवारी संपला. आज चिमाजीआप्पा यांचा विरार येथे स्मरणोत्सव असल्याने विरारला जाऊन आलो. तेथे श्री. आण्णासाहेब वर्तक यांचा भरघोस पाहुणचार घेतला. हा पाहुणचार बरेच दिवस लक्षात राहील. श्री. शंकरराव जोशी (इतिहास संशोधक, पुणे) यांचे विचारप्रवर्तक भाषण अर्धेच ऐकले. राज्यपालांच्या शपथविधीसाठी लवकर परत यावे लागले. श्रीशिवाजी हे पितृसमान होते आणि शहाजी हे प्रख्यात सेनापती व मुत्सद्दी होते. त्यांनी पूर्व तयारी केली नसती तर श्रीशिवाजीला यशस्वी होता आले असते का? या दिशेने ते आपले विचार मांडित होते. श्री. जोशी यांच्याशी केव्हातरी बोलले पाहिजे.

रात्री श्री. मंगलदास यांनी राज्यपाल म्हणून शपथ घेतली. शपथविधीचा कार्यक्रम सुटसुटीत परंतु गंभीर वातावरणात पार पडला.

राजस्थानचे अन्नमंत्री बिकानेरच्या हरभऱ्याच्या डाळीचा भिजत पडलेला प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्यासह भेटले. मार्ग निघू शकला नाही. आम्ही इतके कायदेशीर वागतो याचे या मंत्रिमहाशयांना आश्चर्य वाटले असे दिसले. कोर्टात एकदा तरी केसचा निर्णय लावून घेतल्याशिवाय व कायदेशीर रीत्या पैसे देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय काही करू शकत नाही. असे मी निर्धाराने सांगताच त्यांची निराशा झाली.
------------------------------------------------------------

२ फेब्रुवारी

गॉलब्लेडरचा त्रास सुरू झाला आहे. प्रकृतीच्या कारणासाठी कोल्हापूरची भेट रहित केली. सकाळीच कराडचे एकजण भेटले. घरच्या अनेक प्रश्नांनी मन आज उदास झाले. करमेना म्हणून संध्याकाळी बाहेर जाऊन काही पुस्तके खेरदी केली.

४ फेब्रुवारी

आज ४ फेब्रुवारी. दुपारी डॉ. धनंजयराव गाडगीळ येऊन ठरल्याप्रमाणे भेटले. मी त्यांना मुद्दाम मला येऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. भेट बरी झाली. बोलण्या वागण्यांत सोज्वळता दिसली. फारसे आग्रही दिसले नाहीत. माझी बाजू समजूतीच्या वृत्तीने त्यांच्या पुढे ठेवली आणि अर्ध्या तासातच मुलाखत संपली. आज प्रकृती यथा तथा!
------------------------------------------------------------
६ फेब्रुवारी

कालचा दिवस असा तसाच गेला. आज सेक्रेटरीएटच्या सर्व नोकरवर्गाचे संमेलन झाले. मुख्यमंत्र्यापासून तो शिपायापर्यंत सर्वजण सरमिसळ होऊन वागत होते. खेळत होते. खेळाच्या मैदानावर दिलखुलास हिंडणारे व मनमोकळे हसणारे मोरारजी पाहून वातावरणांत एकदम अनौपचारिकता आली. ते व मी असे दोघेच प्रथम बराच वेळ या खेळात भाग घेऊन इकडे तिकडे हिंडत होतो. नंतर हळूहळू इतर मंडळी आली.

मंत्री विरुद्ध सेक्रेटरी असा रस्सीखेचीचा कार्यक्रम झाला. त्यात सेक्रेटरी विजयी झाले. आमच्या टीममध्ये असलेल्या दोन तीन 'म्हाताऱ्यां' मुळे आम्ही हरलो असा माझा कयास आहे. तोंडाचा चंबू करून श्री. कुंटे रस्सी ओढत होते- अगदी मनापासून.

डोळे बांधून करावयाचा एक कार्यक्रम होऊन ही अत्यंत अवघड कामगिरी करण्यात मी चँपियन ठरलो. रात्री श्री. निंबाळकरांचे येथे श्री. पंजाबराव देशमुखांबरोबर जेवण घेतले.
-----------------------------------------------------------