विरंगुळा - ३७

मला त्यांनी बोलणार काय असे ठराव मांडण्यापूर्वी सहज विचारले. पण मी 'अमेंडमेंट' पाठविण्याचे ठरविले. 'स्टॅबिलायझेशन' ऐवजी 'फॉर्मेशन' असा शब्द घालावा अशी एकदम साधी सरळ उपसूचना मी अध्यक्षांकडे दिली. काका म्हणाले, मला मान्य आहे परंतु पंडितजी मान्य करणार नाहीत. तेव्हा 'स्टॅबिलायझेशन' या शब्दाचा उदार अर्थ 'लिबरल इंटरप्रिटेशन' मी ठरावाशी सूचक म्हणून करतो आणि उपसूचना मांडल्यावर कांहीतरी खुलाशानंतर काढून घे. मी उपसूचना मांडल्यावर काहीतरी खुलाशानंतर काढून घेणार नाही असे स्वच्छ बजावले. परंतु ऐनवेळी उपसूचना उशिरा आली म्हणून पंडितजी ती मांडण्यास परवानगी देणार नाहीत असे कळले. परंतु श्री. हिरे यांनी पंडितजींशी चर्चा करून तीन मिनिटे बोलण्याच्या अटीवर उपसूचना मांडण्याची परवानगी मिळविली. तीन मिनिटात मी थोडक्यात विषय मांडला. उपसूचना मतास टाकता ४१ मते विरुद्ध १०० मते पडून नापास झाली. गेल्या दोन वर्षात उपसूचना मतास टाकून इतकी मते मिळविली ती पहिलीच उपसूचना म्हटली पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रतिनिधीमधे याचा फार चांगला परिणाम झाला असे दिसले. परंतु याचा इतरत्र परिणाम-प्रतिक्रिया काय झाल्या आहेत किंवा उमटणार आहेत हे हळूहळू दिसू लागलेच. हैद्राबादचे श्री. देविसिंग चव्हाण (पुनर्वसनमंत्री) मुद्दाम दुसरे दिवशी घरी येऊन भेटून गेले. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची त्यांची तयारी दिसली.
-यशवंतराव

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची चर्चा ठराव महाराष्ट्रात सुरू होती. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी प्रत्यक्ष आंदोलन उभे राहून ते तीव्र बनण्यापूर्वीची हैद्राबाद येथील १९५३च्या अ. भा. काँग्रेस वर्किंग कमेटीच्या बैठकीतील ही घटना आहे. यातील यशवंतरावांची सुस्पष्ट भूमिका संयुक्त महाराष्ट्रविषयक त्यांचा दृष्टिकोन कोणता होता यावर प्रकाश पाडणारी आहे असे म्हणावे लागेल. प्रांतांच्या पुनर्घटनेसंबंधात श्री. काकासाहेब गाडगीळ यांनी तयार केलेला ठराव आणि त्यातील आंध्र निर्मितीनंतर त्या प्रयोगाचे 'स्टॅबिलायझेशन' नंतर इतर प्रांतांचा विचार करण्याची सूचना याचा अर्थ भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्याचा विचार केंद्रीय नेते करीत असल्याचेच दर्शवितो. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीवर थंड पाणी ओतण्याचा हा प्रकार आहे असा यशवंतराव या ठरावाचा अर्थ स्पष्ट करतात. आंध्र प्रदेशमधे या नव्या निर्णयानंतर ते राज्य स्थिर पायावर उभे राहीपर्यंत इतर सर्व प्रांतांनी ताटकळत रहावयाचे किंवा त्यांना ताटकळत ठेवावयाचे आणि भाषावार प्रांतरचना हा विषयच बासनात गुंडाळून टाकावयाचा वर्किंग कमिटीचा कुटील डाव होता. गाडगीळ यांच्या ठरावाला 'स्टॅबिलायझेशन' या शब्दाऐवजी यशवंतरावांनी 'फॉर्मेशन' हा शब्द उपयोजण्याची उपसूचना देऊन केंद्रीय नेत्यांचा मुखवटा उघडा पाडण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांची उपसूचना बहुमतांने फेटाळली गेली तरी आंध्रप्रांत निर्मितीसाठी जे तत्त्व मान्य करण्यात आले त्याच तत्त्वानुसार संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात यावी अशी वर्किंग कमेटीला जाणीव करून देण्याचे श्रेय श्री. चव्हाण यांनी मिळविले. महाराष्ट्राची जी नेते मंडळी हैद्राबादमधे उपस्थित होती त्यांनी श्री. गाडगीळ यांच्याशी ठरावाच्या पूर्वदिवशी चर्चाही केली होती तरीही उपसूचना मांडण्याबाबत श्री. हिरे यांना पंडितजींकडे मध्यस्थी करावी लागली. उपसूचनेच्या बाजूने जे मतदान झाले ते अगदीच नगण्य मानता येणारे नाही. उपसूचना नापास होऊनही इतर प्रांतांना विचाराला दिशा देण्याचे कार्य या उपसूचनेने केल्याचे नंतरच्या काळात प्रचितीस आले. हे प्रचितीला आणून देण्यांत महाराष्ट्र आघाडीवर राहिला. मान्य केलेल्या तत्त्वानुसार प्रश्नाचा निर्णय करावा हे हैद्राबादमध्ये स्वीकारलेले सूत्र संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीअखेरपर्यंत यशवंतरावांनी अबाधित राखल्याचे नंतरच्या त्यांच्या हालचाली, भेटीगाठी आणि श्रेष्ठींशी झालेल्या चर्चा सांगतात.
------------------------------------------------------------