विरंगुळा - ३६

बेगमपेठला उतरून घेण्यासाठी रामगोपाळ लक्ष्मीनारायण मिलचे मालक व हैद्राबादचे आमचे यजमान आले होते. रात्री गावात एक चक्कर लावली. संध्याकाळी श्री. वर्तकांनी आपले तिळगूळ जेव्हा बाहेर काढले तेव्हा लक्षात आलं की आज 'संक्रांत' आहे. 'तिळगूळ घ्या गोड बोला.'

सकाळी नानल नगरकडे गेलो. महाराष्ट्र प्रांतिकचे ऑफिसमध्ये तेव्हा हळूहळू प्रतिनिधी येऊ लागल्याचे दिसले. श्री. बाळासाहेब देसाई भेटले. काहीतरी किरकोळ गोष्टीमुळे अकारण नाराज दिसले. त्यांना घेऊन नानल नगरच्या पाठीशी असलेल्या 'गोवळकोंडा'स गेलो. जुने ऐतिहासिक ठिकाण एवढेच या ठिकाणचे महत्त्व.

दुपारी ३ वाजता ए. आय. सी. सी. सुरू झाली. नेहमीचे, परराष्ट्रीय धोरण, दक्षिण आफ्रिका, पंचवार्षिक योजनेवरचे कंटाळे ठराव होते. खानबहादूर गफारखान यांच्या 'बंदी' बाबतचा दु:ख व्यक्त करणारा व त्यांना अभिवादन करणारा ठराव अधिक युक्त होता. उशिरा का होईना भारताने आपली भावना व्यक्त करणे जरूर होते. पंडितजींचे भाषण छोटेसेच परंतु हृदयस्पर्शी झाले. एकंदरीत आजचे काम अगदीच अनौपचारिक व शिळे शिळे वाटले. उद्या कदाचित भाषाविषयक प्रांतरचनेवरील ठराव 'नॉन ऑफिशल' आणला गेल्यास कारवाईमधे काही जिवंतपणा येईल.
------------------------------------------------------------

१६ जानेवारी

उस्मानिया विद्यापीठाच्या आवारात श्री. किडवाई राहातात असे श्री. ए. पी. जैन यांचेकडून समजले म्हणून त्यांना भेटण्यासाठी सकाळी ७.३० वाजता प्रस्थान ठेवले. मोटारीचा मद्रासी ड्रायव्हर हैद्राबादला नवखा होता. त्यामुळे तो सारथी आणि मी हैद्राबादचा शोध घेण्याकरिता बाहेर पडल्यानंतर त्याला आंधळ्या कोशींबिरीचे स्वरूप आल्यास नवल काय? पाच मैलाचा प्रवास पंधरा मैलाचे तेल जाळून आम्ही सुमारे एक तासात पुरा केला. किडवाईजी भेटले. कार्यक्रम नक्की केला. त्यांचे येथे मद्रासचे माजी गृहमंत्री डॉ. सुब्बरामन भेटले. त्यांच्या चिरंजिवासंबंधीच्या गप्पा निघाल्या. हे मोठे सुसंस्कृत मद्रासी कुटुंब आहे. त्यांचा मुलगा कुमारमंगलम् हा प्रख्यात कम्युनिस्ट कार्यकर्ता आहे. त्यांची एक मुलगी कम्युनिस्ट आहे. तिचा गेल्या सार्वत्रिक निवणुकीत पराभव करण्यासाठी कोण यातायात करावी लागली याची मजेदार हकीगत त्यांनी सांगितली.

ए. आय. सी. सी. त विषय नियामक समितीचे काम मागील अंकावरून पुढे सुरू झाले.

प्रांताच्या पुनर्रचनेसंबंधीचा ठराव श्री. काका गाडगीळांनी आज मांडला. या ठरावासंबंधी त्यांच्याशी व श्री. हिरे यांच्याशी कुंटे, मी, भारदे व बॅ. जी. डी. पाटील यांनी अगोदर चर्चा केली होती. या ठरावासंबंधी आम्हाला फारसा उत्साह नव्हता. आंध्र निर्मितीनंतर त्या प्रयोगाचे 'स्टॅबिलायझेशन' नंतर इतर प्रांतांचा विचार करावयाचा असे धोरण ठरावात नमूद करण्यात आले आहे. एका अर्थाने संयुक्त महाराष्ट्र निर्मितीवर थंड पाणी ओतण्याचा हा 'अप्रत्यक्ष' प्रयत्न काकांनी आपण काहीतरी कमाई करून मिळविलेला विजय असे भासविण्याचा प्रयत्न केला.