इतिहासाचे एक पान. २१८

“माझ्यापुढील कामाचं मला तीन त-हेनं दर्शन घडत आहे. उद्याच्या महाराष्ट्र राज्याचा कारभार उत्तम, चोख झाला पाहिजे. पंचवार्षिक योजनेचं बाळ, पाळण्यांत पाय दाखवून नवमहाराष्ट्राची ग्वाही देणारं झालं पाहिजे आणि आपण तीन भाऊ अनेक शतकांनंतर प्रथम एकत्र येत आहोत त्यांचं एकसंध मन तयार झालं पाहिजे. राजकीय, सामाजिक, साहित्यिक सर्वच क्षेत्रांत एकात्मभावनेचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. त्याचबरोबर पुढची दहा-पंधरा वर्षं तरी महाराष्ट्रांत औद्योगिक शांतता हवी. संपाची भाषा आपण बंद केली पाहिजे. याचा अर्थ अन्याय, अडचणी मुकाट्यानं सहन कराव्यात असा नव्हे. हक्कासाठी जरूर भांडा; यशवंतरावांशी भांडा, महाराष्ट्र सरकारशी भांडा, पण महाराष्ट्राचं राज्य रांगतं आहे तोवर संपाचं हत्यार वापरताना महाराष्ट्राचा त्रिवार विचार करा. या राज्याचा कर्णधार असं संबोधून, तुम्ही माझ्याकडून भलत्या अपेक्षा करूं नका. आमचे प्रश्र्न सुटले नाहीत अशा तक्रारी पावलोपावली माझ्याकडे येतील-पण आमच्यापुढे सामान्य जनतेच्या अपेक्षांचं रामायण उभं आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्ति करणं हा आपल्या राज्याचा मानबिंदु असेल. म्हणून प्रत्येकानं आपल्या क्षेत्रांत जबाबदारीनं काम केलं पाहिजे.

“महाराष्ट्र राज्याचा उत्सव शिवछत्रपतींच्या जन्मदिवशी सुरू होत आहे हा एक अपूर्व योगायोग आहे. शिवनेरीच्या माथ्यावर जिजामातोश्री बालशिवाजीला घेऊन उभ्या आहेत. त्यांतलं मर्महि लक्षांत घ्या. जिजामातोश्री शिवनेरीवर आल्या हे या स्थळाचं परम भाग्य. पण त्या आल्या त्या वेळी त्यांच्या पाठीवर त्यांचेच वडील आणि भाऊ पाठलाग करत घोडदौडीनं येत होते, हा इतिहास आहे. नवमहाराष्ट्राच्या मागे त्याचे मामा आणि आजोबा पाठलाग करत येत आहेत असं होता कामा नये. सह्याद्रीच्या सान्निध्यांत आज मराठी मन महाराष्ट्राच्या इतिहासानं भरून गेलं आहे. या सर्व जुन्या स्मृतींची पवित्र आठवण करून मी परमेश्र्वराची प्रार्थना करतो की, देवा, आम्हांला अशी दानत आणि शक्ति दे की, हे महाराष्ट्र राज्य जनतेचं राज्य होईल. ते राज्य लोककल्याणाकरिता झटेल आणि भारताच्या नकाशावरील ता-यांत नव्या तेजस्वी ता-याची भर टाकील.”

शिवनेरीवर नवमहाराष्ट्र राज्याचा उत्सव सुरू झाला होता; परंतु महाराष्ट्राच्या सा-या तीन कोटि जनतेला या उत्सवाचा प्रत्यक्ष लाभ घेतां येणं शक्य नव्हतं. राज्याच्या सर्व भागांतले लोक प्रातिनिधिक स्वरूपांत आले होते तरीहि ही संख्या कित्येक हजारांवर पोचली होती. शिवजयंतीचा त्या दिवशीचा उत्सव मात्र महाराष्ट्राच्या कोनाकोप-यांत सुरू होता. उत्सवांत लोक दंग झालेले असतानाच, नव्या महाराष्ट्र राज्याची आणि महाराष्ट्राच्या महत्तमतेची आकाशवाणी त्यांना ऐकायला मिळाली. शिवनेरीवर जे येऊ शकले नव्हते त्यांच्यामार्फत आपला आवाज, आपल्या भावना पोचवण्यासाठी यशवंतरावांनी त्या दिवशी म्हणजे २७ एप्रिललाच आकाशवाणीच्या माध्यमाचा उपयोग करून घेतला होता.

विविधतेनं नटलेलं महाराष्ट्र राज्य पुढच्या तीन दिवसांत आता प्रत्यक्ष अवतरणार होतं. महाराष्ट्राच्या निसर्गाच्या रचनेत जशी विविधता आहे तशी माणसांत सुध्दा आहे. उत्तरेस सातपुडा आणि पश्र्चिमेस सह्याद्रि यांची उत्तुंग शिखरं, त्यांच्या उतरणीवर घनदाट जंगलांनी निर्माण केलेलं हिरवं सौंदर्य, वर्धा-वैनगंगेच्या खो-यांतले जागोजागचे जलाशय आणि मनाला प्रसन्न करणारी पळसाच्या लाल फुलांनी डंवरलेली रानं, पश्र्चिमसागराचं अथांग दर्शन घडवणारा कोकणचा किनारा, गोदावरीनं समृध्द व पुनीत केलेली मराठवाड्याची भूमि, तेथील तेजस्वी भूतकाळ आणि संस्कृति, नागपूरच्या परिसरांतील आशिया खंडांत उत्तम ठरलेल्या संत्र्यांच्या बागा, रत्नागिरीकडल्या हापूस आंब्याच्या आमराई, विदर्भ-मराठवाड्याच्या काळ्याभोर जमिनींत फुललेला पांढराशुभ्र कापूस, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत डोलत असलेले रसदार गोड उसाचे मळे, अशी ही महाराष्ट्राची सुंदर विविधता ! यशवंतरावांनी आकाशवाणीवरून या विविधतेचं इतक्या सरतेनं वर्णन केलं की, या विविधतेत महाराष्ट्रांतल्या जीवनाच सौंदर्य साठवलेलं असल्याचा त्यांतून पडताळा येत राहिला.