शिवाजीपार्कवर त्या दिवशी सर्वत्र आनंदीआनंद पसरला होता. दहा लाखांवर जनसमुदाय शिवाजीपार्कवर लोटला होता. मुंबई शहर सागरानं वेढलेलं असलं, तरी जनसागरानं त्याच्याशी आज स्पर्धा सुरू केली होती. सर्व जातींचे, धर्मांचे, व्यवसायांचे, गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, कामगार, उद्योगपति, राजकारणी अशांचा हा दरबार होता. मंगल वाद्यं वाजत होती. राष्ट्रीय ध्वज फडफडत होते. सर्वत्र उत्साह आणि आनंद ओसंडला होता.
मुंबईच्या शिवाजीपार्कवरील समारंभ हा जनता-समारंभ होता. नव्या राज्याच्या उद्घाटनाचा सरकारी अधिकृत समारंभ हा राजभवनाच्या पटांगणांत मध्यरात्री १२ वाजता झाला. ठीक १२ वाजून १ मिनिटानं पंडितजींनी संयुक्त महाराष्ट्राचं उद्घाटन केलं. प्रतीकरूपानं हे उद्घाटन झालं.
नव्या महाराष्ट्र राज्याचं, संयुक्त महाराष्ट्राचं प्रतीक – महाराष्ट्राचा नकाशा – तिथे तयार
होता. विद्युतदीपांनी चमचमणा-या या नकाशावरील रेशमी आवरण पंडितजींनी स्वहस्ते बाजूला सारतांच उपस्थितांना आणि स्वतः पंडितजींनाहि नवमहाराष्ट्राचं दर्शन घडलं आणि सबंध शामियान्यांत आनंदाच्या लहरी पसरल्या.
राजभवनावरील सारच वातावरण या वेळी भावनोत्कटतेनं रोमांचित झालं होतं. समुद्रावरून राजभवनाच्या परिसरांत शिरणा-या वा-याच्या थंड लहरी उपस्थितांना सुखावत होत्या. जगप्रसिध्द सनईवादक बिसमिल्लाखान यांच्या सनईतून निघणारे मंजुळ स्वर पाहुण्यांचं स्वागत करत होते. महाराष्ट्राचं स्वतंत्र राज्य जन्माला आलं आहे- उठा, जागे व्हा, तयार रहा, असं आवाहन करणारे महाराष्ट्र-गीताचे सूर मागोमाग वातावरणांत पसरले. महाराष्ट्र-कोकिळा लता मंगेशकर यांनी नंतर भूपाळ्या आणि ज्ञानोबारायांचे ‘पसायदान’ म्हटलं.
कार्यारंभी आराधना करण्याची परंपरा ही जुनी आहे. परमेश्र्वराच्या कृपाछत्राखाली आपण सदा असावं हा या आराधनेचा हेतु असतो. महाराष्ट्राचे महान् संत ज्ञानोबाराय यांनी ज्ञानेश्र्वरी लिहून झाल्यावर समाजाची परिस्थिति, विचार, लोकाचार ह्यांस अनुसरून शेवटी पसायदान म्हटलं. संयुक्त महाराष्ट्र-निर्मितीचा ग्रंथ आता पुरा झाला होता आणि जनतेच्या हाती तो आता सुपूर्द होणार होता. राज्यकर्त्यांना या प्रसंगी ज्ञानोबारायांच्या पसायदानाची आठवण होणं स्वाभाविक होतं. लता मंगेशकर यांची ‘पसायदान’ म्हणण्यासाठी योजना झालेली होती –
आता विश्र्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ।।
जे खळाची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचे ।।
दुरिताचे तिमिर जावो। विश्र्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जो वांच्छिल तो ते लाहो । प्राणिजात ।।
लता मंगेशकर यांच्या सुरेल कंठांतून पसायदान स्त्रवूं लागतांच यशवंतराव तल्लीन होऊन गेले. अंतर्मुख बनून जणू ते उद्याच्या महाराष्ट्राचं चित्रच पहात होते.
ज्ञानदेवांनी आपला ग्रंथ संपवतांना परमेश्र्वरापाशी पसायदान म्हणजे हा प्रसाद मागितला – जे वाईट लोक आहेत त्यांची वक्रदृष्टि म्हणजे पापबुध्दि, पापी विचार नाहीसे व्हावे ; सत्कृत्यांत त्यांचं मन लागावं, सर्व मनुष्यांत प्रेम वाढावं, जगांतलं अज्ञान नाहीसं व्हावं आणि सदासर्वकाळ ईश्र्वरभक्तांचा समुदाय, भगवज्जनांच्या मंडळ्या, भूतलावर नांदाव्या.