परंतु कर्तृत्वाच्या मोठेपणाचा अन्वयार्थ लावत बसणा-या महाराष्ट्रांतल्या मंडळींनी यांतूनहि वाद निर्माण करण्याची संधि साधली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतरावांनी महाराष्ट्रांत आणला असे त्यांचे अनुयायी म्हणूं लागतांच, दुस-या बाजूला विरोधाचा संचार होणं स्वाभाविकच होतं. तसा तो होण्यांत कोणाला दोषहि देता येणार नाही. महाराष्ट्र निर्माण होत आहे असं निश्चित झाल्यापासून, हें श्रेय कोणाचं व तें कोणाला किती द्यायचं, याबद्दल महाराष्ट्रांत चढाओढ सुरू झाली होती. संयुक्त महाराष्ट्र समितीनं, महाराष्ट्र राज्य-निर्मितीसाठी प्रचंड चळवळ सुरू करून सा-या महाराष्ट्राचं मन जागं केलेलं होतं. सत्ताधारी काँग्रेस-पक्षाच्या धोरणाविरुद्ध प्रत्येक क्षेत्रांत लढा उभा करून तो बव्हंशीं जिंकला होता. त्यामुळे महाराष्ट्र-निर्मितीच्या श्रेयाचा मोठा वांटा हा समितीला द्यावाच लागेल. स्वतः यशवंतरावांनीहि समितीच्या कर्तृत्वाचं यश मोकळेपणानं मान्य केलेलं होतं; परंतु नव्या राज्य-निर्मितीचं सर्व श्रेय स्वतःकडे घेण्यासाठी काँग्रेस-जन आतुर बनले होते. यशवंतरावांचं नेतृत्व महाराष्ट्रांत प्रस्थापित झालेलं होतंच तेव्हा त्यांच्या नेतृत्वाला हें श्रेय देण्यांत त्यांच्यांत मग अहमहमिका सुरू झाली आणि त्यांतून संयुक्त महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’ यशवंतरावांनी आणल्याच्या घोषणा सुरू झाल्या. त्यांतूनच मग या श्रेयाच्या मोठेपणाचा अन्वयार्थ लावण्याचा वाद सुरू झाला.
मराठी जनतेनं पक्षाचे, जातीचे, लहानमोठेपणाचे सर्व मतभेद दूर ठेवून संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर एकजूट दाखवली होती आणि खरं श्रेय जनतेचं होतं. स्वतः यशवंतरावांची तीच भावना होती, त्यांनी ती बोलूनहि दाखवली होती. पुनर्रचना-विधेयक, विधानसभेंत सादर करतांनाच “हा लोकांचा विजय आहे” असाच त्यांनी नव्या राज्य-निर्मितीचा अर्थ सांगितला. खरं म्हणजे यशवंतरावांनीच सारं श्रेय जनतेला दिल्यानंतर वाद निर्माण होण्याचं कारणच उरल नाही; परंतु वाद सुरू होण्यापूर्वीच तो निकालांत काढण्याइतका महाराष्ट्र लेचापेचा नाही, पूर्वीहि नव्हता आणि अजूनहि नाही. श्रेयाचा वाद सुरूच राहिला.
त्या वादाचे निष्कर्ष कांहीहि असोत; एक गोष्ट मान्य करावी लागते की, महाराष्ट्र राज्याची निर्मिति ज्या वातावरणांत झाली, ज्या पद्धतीनं झाली त्याचं मोठं श्रेय यशवंतरावांना द्यावं लागेल. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला तर महत्त्व आहेच, परंतु ही निर्मिति ज्या पद्धतीनं केली गेली त्या पद्धतीला सर्वांत अधिक महत्त्व आहे. लोकशाही-पद्धतीला अनुसरून आणि भारतीय संदर्भाशीं सुसंगत अशा रीतीनं चर्चा होऊन, वाटाघाटींनी हें राज्य जन्माला आलं. नव्या राज्याला मात्र, त्याच्या जन्मापासूनच अनुकूल वातावरण लाभलं त्याला यशवंतराव चव्हाण यांचं नेतृत्व कारणीभूत होतं. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सद्भावनेच्या वातावरणांत त्यांनी हा प्रश्न वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं सोडवला आणि सर्व शंका, संदेह, अविश्वास यांचं निराकरण केलं आणि महाराष्ट्रांत आत्मविश्वास निर्माण केला. स्वतः हा आत्मविश्वास बाळगूनच यशवंतराव संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यासाठी मग शिवनेरीवर पोंचले.