प्रकरण - २०
-----------------
भाग्यवती शिवनेरी !!
२७ एप्रिल १९६०. सह्याद्रीच्या विविधशक्ति आज शिवनेरीवर सिध्द होत्या. तीनशे वर्षांपूर्वी मातोश्री जिजाबाईसाहेबांनी श्रीशिवाजीला जन्म दिला त्या वेळी शिवनेरीवर, सह्याद्रीच्या सर्व शक्तींचं दर्शन असंच एकदा घडलं होतं. आज पुन्हा तसंच दर्शन घडत होतं.
शिवनेरीवर त्या दिवशी सर्व शक्तींची पूजा झाली. शिवनेरीची पूजा म्हणजे सह्याद्रीची पूजा – मातृभूमीची पूजा, भारतमातेची पूजा. महाराष्ट्र हा सह्याद्रीचीच पूजा करतो; कारण महाराष्ट्राचा जन्म-दाता सह्याद्रीच. हा समर्थ महाराष्ट्र-पिता भारताचा मूलाधार आहे.
महाराष्ट्राचा सह्याद्रि हा हिमालयाइतका विशाल आणि उत्तुंग नाही. त्याचं सौंदर्य अद्वितीय नाही, पण अव्वल दर्जाचं आहे. कैलास हिमालयावर आहे. शंकराचं हे प्रमुख स्थान. हिमालय हा देवतात्मा, तर सह्याद्रि हा वीरात्मा. त्याचा पिंड स्वातंत्र्योन्मुख आणि युध्द-प्रधान. सह्याद्रीचं माहात्म्य फार थोर. अनंतकाळापासून सह्याद्रीवर सागर धडका मारत आहे, पण तो कोसळलेला नाही. गंगा-यमुनेच्या मैदानांतून अगदी अलीकडे, मोंगलापर्यंत अनेक आक्रमकांनी महाराष्ट्राच्या या सह्याद्रीवर धडका मारल्या, पण सह्याद्रि नमला नाही. मागे सरल्यासारखं भासलं असेल, तर ते अधिक जोरानं उसळी घेण्यासाठी! प्रतिकारासाठी ! स्वातंत्र्य हाच त्याचा स्थायीभाव असल्यानं धडका मारणारेच कपाळमोक्ष करून घेऊन परत फिरले.
या सह्याद्रीनं महाराष्ट्राच्या भूमीची आणि मनोभूमीचीहि घडण केलेली आहे; महाराष्ट्राचं मन बाह्यतः खडबडीत, पण अंतर्यामी स्वामीनिष्ठ; बाह्यतः कोरडं, पण अंतर्यामी वत्सल; आत्मसमर्पणाला सदैव सज्ज! स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता सदैव सिध्द अशी ही मनोभूमि! सह्याद्रीनं आपल्या शिरावर शंकराची आणि आदिशक्तीची मंदिरं उभारूं दिली. द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी अधिक संख्येनं ज्योतिर्लिंग सह्याद्रीच्या माथ्यावरच आहेत. सह्याद्रीची ही सर्व शिखरं पावित्र्याची प्रतीकं आहेत; परंतु राष्ट्राच्या रक्षणासाठी मंदिराहून किल्ले अधिक उभारण्यास सह्याद्रीनं जागा दिली आहे.
छत्रपति शिवरायानं स्वसंपादित सर्व धनाचा विनियोग किल्ल्यांच्या उभारणींत केला. म्हणूनच पुढे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचं रक्षण होऊ शकलं. शिवाजीराजा हा सह्याद्रीचा सुपुत्र, सह्याद्रीच्या प्रेरणेनचं शिवाजीराजानं जागोजाग दुर्ग उभारले, गड-कोट बांधले, मावळ्यांचं – शेतक-यांचं – बहुजन समाजाचं शौर्य जागं केलं आणि महाराष्ट्राला, हिंदुस्थानला स्वातंत्र्याचा संजीवनी मंत्र दिला. या गड-कोटांची व्यावहारिक उपयुक्तता काळानं, विज्ञानानं नष्ट केली असली, तरी स्वातंत्र्यप्रेरणेची ही प्रतीकं आजही प्रतिकारशक्ति शाबूत ठेवत आहेत. या प्रतीकांचं माहात्म्य आणि जिजाऊ-शिवराय यांचा शिवनेरीवरील अखंड सुप्त निवास लक्षांत घेतां, नव्या महाराष्ट्र राज्याची, महाराष्ट्राचं स्वतंत्र राज्य स्थापन झाल्याची घोषणा महाराष्ट्राला ऐकवण्यासाठी यापरतं अन्य पवित्र स्थान ते कोणतं ॽ
महाराष्ट्राचं ऐक्य नैसर्गिक आहे. महाराष्ट्र हा एक संपूर्ण सजीव घटक आहे. या ऐतिहासिक सत्याचं दर्शनच त्या दिवशी शिवनेरीवर घडलं. हिंदुस्थानच्या शासनसंस्थेत आणि राष्ट्राच्या सांस्कृतिक, आर्थिक जीवनांत महाराष्ट्राला आता त्याच्या महात्म्याच्या प्रमाणांत स्वतंत्र राज्याचं महत्व प्राप्त झालं होतं.
संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला ही घोषणा ऐकण्यासाठी त्या दिवशी शिवनेरीवर सारा महाराष्ट्र लोटला होता. लोकांचा अथांग सागर पसरला होता. कृष्णथडी, भीमथडी, गंगाथडी सर्व एकत्र मिळाल्या होत्या. शिवाजीनं महाराष्ट्राची राजकीय उंची वाढवली त्या वेळी रायगडावर असाच मेळावा जमा झाला होता. तीनशे वर्षानंतर आज तेच सुरम्य दर्शन शिवनेरीवर घडलं.