इतिहासाचे एक पान. २२२

या समारंभापूर्वी पसायदान म्हणावं ही कल्पना स्फुरली याचं कारण स्पष्ट होतं. दोष पहाण्याची वृत्ति माणसांमध्ये फार असते. कोणा मनुष्य परहिताच्या बुध्दीनं स्वतः त्रास सोसून एखाद्या सत्कार्यास प्रवृत्त होतो. वास्तविक परहितासारखं स्वहित नाही, परहित हेच खरं स्वहित, याची जाणीव पुन्हा एकदा या शुभ प्रसंगानं, या सत्कार्याच्या वेळी करून देण्याचा हा प्रयत्न होता. नव्या महाराष्ट्रांत ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ अशी स्थिति निर्माण व्हायची तर ‘दुरिताचे तिमिर जावो’ यासाठी  सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत, यासाठी हे आवाहन होतं.

पसायदान ऐकत असतांना यशवंतरावांच्या नेत्रकडा ओलावल्या. ज्ञानेश्र्वरांप्रमाणेच तुकारामबुवांनी –

ऐसे भाग्य कई लाहाता होईन ।
अवघे देखे जन ब्रह्मरूप ।।

असा आशीर्वाद देवापाशी मागितला होता. तुकारामबुवांच्या अभंगाच्या या ओळी त्या वेळी यशवंतरावांच्या मनानं गुणगुणल्या असाव्यात.

पं. नेहरू या समारंभास आलेले होते. महाराष्ट्राच्या लाख-लाख जनतेच्यातर्फे त्यांचे आभार मानतांना पसायदानाची प्रार्थना यशवंतरावांनी बोलकी केली. पंडितजींना उद्देशून त्यांनी सांगितलं, “आमच्या जुन्या परंपरांना अनलक्षून ‘दुरिताचे तिमिर जावो’ हे वरदान मी मागत आहे. जे अमंगल असेल त्याचा अंधकार दुनियेतून नाहीसा होवो व सत्याचा विजय होवो, हे तत्वज्ञान आणि हे आशीर्वाद महाराष्ट्राला संतांकडून मिळाले आहेत. समानतेचं तत्व त्यांनी आम्हांला शिकवलं आहे आणि अन्यायाचा प्रतिकार करायलाहि त्यांनीच शिकवलं आहे.

“देशावर प्रेम करावं आणि स्वराज्य आपला मंत्र मानावा, हा संदेश आम्हांला आमच्या नेत्यांनी दिला आहे. या संदेशाच्या पार्श्र्वभूमीवर म. गांधींचं कर्तृत्व आणि म. गांधींचं व्यक्तिमत्व यांतून आपणां सर्वांना मिळालेला दिव्य संदेश महाराष्ट्र कधीहि विसरणार नाही याची ग्वाही या परम मंगल प्रसंगी मी आपणांस देऊं इच्छितो.

“महाराष्ट्राचं हे जे राज्य निर्माण झालं ते मराठी जनतेच्या कल्याणाचं काम तर करीलच, परंतु मराठीभाषकांच्याजवळ जे देण्यासारखं आहे, त्यांच्या जीवनामध्ये जे चांगलं आहे, जे उदात्त आहे, त्याचा त्याग जर करायचा असेल, तर तो आम्ही भारतासाठी प्रथम करूं. कारण आमचा हा पहिल्यापासून विश्र्वास आहे की, भारत राहिला तर महाराष्ट्र राहील. भारत मोठा झाला, तर महाराष्ट्र मोठा होईल. भारताचं आणि महाराष्ट्राचं हित जेव्हा एकरूप होतं तेव्हा भारतहि मोठा होतो आणि महाराष्ट्रहि मोठा होतो, हा इतिहास महाराष्ट्राच्या रक्तारक्तांतून भिनलेला आहे.

“भारताचं प्रतीक उंच-उंच शिखरं असलेला बर्फाच्छादित हिमालय आहे, तर दोन-दोनशे, तीन-तीनशे इंच पावसाचा मारा आपल्या डोक्यावर घेणारा काळ्या फत्तराचा सह्याद्रि महाराष्ट्राचं प्रतीक आहे; आणि जर कधी भारताच्या हिमालयावर संकट आलंच तर आपल्या काळ्या फत्तराची छाती हिमालयाच्या रक्षणाकरिता सह्याद्रि उभी करील, असं मी आपणांला आश्र्वासन देतो.”