राज्य-सरकारच्या नोकरांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं सांगूनच कार्यक्षम राज्यकारभाराचं आश्वासन त्यांनी जनतेला दिलेलं होतं. लोकांचे समाधान हीच अखेर कार्यक्षम कारभाराची कसोटी असल्यामुळे सरकारी वरिष्ट अधिकारी हा राज्ययंत्रणेंतला जो मुख्य घटक त्याची वागणूक कशी असावी, त्यानं कोणतीं पथ्यं पाळावींत याबाबत यशवंतरावांनी कलेक्टरांच्या एका परिषदेंत आपली भूमिका मोकळेपणानं सांगितली होती. जिल्हाधिकारी हा राज्यकारभाराच्या यंत्रणेचा आंस असतो. यशवंतरावांनी या संदर्भांत कलेक्टरांना अशी जाणीव दिली की, राज्याला भव्य पुरुषाची उपमा दिली तर कलेक्टर म्हणजे या भव्य पुरुषाचे नुसते डोळे किंवा कान नव्हेत, तर बाहू सुद्धा आहेत. जर त्यांनी चुकीच्या दृष्टीनं कार्य केलं, ऐकण्यासारखं आहे तें ऐकलं नाही किंवा चुकींच ऐकलं, पहाण्यासारखं आहे तें पाहिलं नाही किंवा चुकीच्या दृष्टीनांतून पाहिलं, तर राज्याचं भवितव्य निराशाजनक ठरतं.
अधिका-यांची वागणूक कशी असावी यासंबंधी ते सांगतात की, समाजवादी किंवा समाजवादी धर्तींच्या समाजांतील आपला आर्थिक किंवा इतर कोणताहि व्यवहार हा व्यक्तिगत लाभाच्या हेतूनं केलेला नसला पाहिज; तर त्याचा हेतु सर्व समाजाचा लाभ हा असला पाहिजे. समाजवादी धर्तीची समाजरचना हें राष्ट्रीय धोरण म्हणून एकदा मान्य झाल्यानंतर, समाजांत कमींत कमी विषमता असावी आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करून घेण्यास पुरेपुर वाव असला पाहिजे; याचाच अर्थ ‘सर्वांना सारखी संधि मिळणं,’ हें महत्वाचं उद्दिष्ट ठरतं. म्हणून कलेक्टरांनी राज्याचीं हीं मूलभूत तत्त्वं समोर ठेवून ज्या ज्या वेळीं त्यांना जिल्ह्यांत एखादा प्रश्न निर्माण होईल किंवा ज्या ज्या वेळीं एखाद्या गोष्टीबद्दल शंका वाटूं लागेल त्या त्या वेळीं या मूलभूत तत्त्वांचा त्यांनी विचार करावा.
दिरंगाई ही केवळ कलेक्टरांपुरतीच मर्यादित नसते याची यशवंतरावांना माहिती होती. विभागीय कचेरी, खातेप्रमुखांच्या कचे-या, आणि सचिवालयाच्या पातळीवरहि दिरंगाई होतच असते; परंतु कलेक्टर-कचेरी व त्या खालच्या कचे-या येथील कामाशीं जनतेचा प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे येथील दिरंगाई लोकांना चांगलीच जाणवते आणि त्यांतून जनतेच्या मनांत कारभाराविषयी चीड निर्माण होते. ही दिरंगाई रहाणार नाही आणि जनतेला चीड व्यक्त करण्याची वेळ येणार नाही या जबाबदारीची जाणीव त्यांनी कलेक्टरांना स्पष्ट शब्दांत करून दिली.
महसूलखातं म्हणजे लाचलुचपतीचं आगर मानलं जातं. लाचलुचपतीबाबत काळजीपूर्वक वागणूक ठेवून कलेक्टरांनी दक्ष राहिलं पाहिजे याची जाणीव देतांना त्यांनी सांगितलं की, लाचलुचपतीला जागाच रहाणार नाही असं वातावरण निर्माण केलं पाहिजे. पोलिस-अधिका-यांनी लाचलुचपतीची प्रकरणं शोधून काढून, लाचलुचपतीस जबाबदार असणारास शिक्षा करणं म्हणजे लाचलुचपतीचं निर्मूलन करणं नव्हे. प्रत्येकानंच ती जिथे जिथे असेल तिथेच तिचं उच्चाटन करण्यासाठी जबाबदारी स्वीकारून कारभारांतील हा मोठा दोष नाहीसा केला पाहिजे.
राज्यकारभारांतले नवीन प्रश्न व कामं समाधानकारक सोडवण्यासाठी योग्य अशी यंत्रणा निर्माण करण्याचं आणि जिल्ह्यांतल्या कारभार-यंत्रणेंत संपूर्ण बदल करण्याचंच धोरण यशवंतरावींनी आपल्या कारकीर्दीत अनुसरलं. याचा परिणाम असा झाला की, सरकारी दिरंगाईच्या किंवा गैरकारभाराच्या भांडवलावर जगणारांना, सरकारला विरोध करण्यासाठी म्हणून निरनिराळीं क्षेत्र धुंडाळण्यासाठी वणवण करावी लागली आणि तें करूनहि त्यांना हिरमुसलं होऊन स्वस्थ रहावं लागलं.