मराठवाड्याचा वैचित्र्यपूर्ण भूभागहि आता या राज्यांत समाविष्ट झाला होता. मराठवाड्याचा कांही भाग डोंगराळ, जंगलमय आणि कांही सृष्टिसौंदर्यपूर्ण. सर्वच जमीन सुपीकव संपन्न. दुर्मिळ सृष्टिसौंदर्य हें औरंगाबाद जिल्ह्याचं वैशिष्ट्य होय. विदर्भाचं २.३६ कोटि एकर क्षेत्र नव्या मुंबई राज्यांत विलीन झालं. यांतील १.२६ कोटि एकरांत शेती हा प्रमुख व्यवसाय असून ८८.२२ लक्ष एक क्षेत्रांत जंगल पसरलं होतं. याशिवाय विदर्भांतील १२.९१ लक्ष एकर क्षेत्र लागवडीला योग्य असं होतं. नागपूर शहर ही मध्यप्रदेशची राजधानी. हें शहर आता मुंबई राज्यांत दाखल झालं होतं.
मुंबई राज्यांत आलेला नवा प्रदेश अशा प्रकारे भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण तर खराच, शिवाय या प्रत्येक भागाचा इतिहासहि असाच मननीय आहे. सौराष्ट्राला सुन्राष्ट्र- चांगलं राज्य- असं नामाभिधान पूर्वीच प्राप्त झालेलं आहे. यादव मथुरेहून इथे आले आणि त्यांनी द्वारका ही राजधानी स्थापन केली. इ. स. पूर्वी ३८६ पासून ख्रिस्ताब्द ३८० पर्यंत सौराष्ट्रावर मौर्य आणि क्षत्रपाचं राज्य होतं. सौराष्ट्राच्या इतिहासाला या दरम्यान सुरूवात झाली. आठव्या शतकांत रजपुतांनी सौराष्ट्रावर स्वारी केली व शेकडो स्वतंत्र राज्यं स्थापन केलीं. १९४८ पर्यंत हीं राज्यं अस्तित्वांत होतीं. १९४८ मध्ये या सर्वांचंच एक संयुक्त राज्य निर्माण केलं गेलं.
कचछच्या इतहासांतहि यादवांच्या काळापासून किती तरी राजघराण्यांचा इतिहास सापडतो. १५४८ मध्ये जादेजा घराण्याचं राज्य इथं स्थापन झालं. भुज ही तेव्हापासूनची राजधानी. जहाज-बांधणी व समुद्रपर्यटनाची कला तिथे या काळांत कळसाला पोंचल्याचं आढळतं. हीं जहाचं मध्यपूर्वेपर्यंत आणि आफ्रिकेपर्यंत पश्चिमेला इंग्लंड, पूर्वेला इंडोनेशियन बेटापर्यंत जात असत. १९४८ मध्ये कच्छ हेंहि भारतीय संघराज्यांत विलीन करण्यांत आलं आणि तिथे चीफ कमिशनरचा प्रांत अस्तित्वांत आला.
मराठवाड्याचा इतिहासहि इ. स. पूर्व २५६ पासून उपलब्ध आहे. अशोकाच्या शिलालेखावरून दक्षिणेकडील लोकांना राष्ट्रीक, पोटेनिक, अपरान्त, आंध्र आणि भोज वगैरे नांवांनी संबोधलं जात असावं असं दिसतं. प्राचीन काळीं मराठवाड्यांतल्या राष्ट्रीकांनी सध्याच्या मराठवाड्याचे जिल्हे मिळून दक्षिणेमध्ये राज्य केलं. गोदावरीच्या काठावरील पैठण गावच्या आजूबाजूच्या भागांत रहाणा-या पोटेनिकांना पैठणक असंहि म्हणत. अपरान्त हे लोक उत्तर-कोकणांतील होत. गोदावरी आणि कृष्णानदीच्या मधल्या पठारावर आंध्र लोकांची वस्ती होती. देवगिरीचा यादवराजा पांचवा, भिल्लमा, यानं नंतरच्या चालुक्य राज्याच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील प्रदेशांवर चढाई केली. सिंधाण (इ. स. १२१० ते १२४७) हा यादव-कुलांतला अतिशय पराक्रमी राजा इथे होऊन गेला. वाड्मय व विद्या यांचा तो चाहता होता. मराठवाड्याची ही परंपरा आजहि कायम आहे.
विदर्भाला तर वेदकालापासून दिव्य असा भूतकाल आहे. प्रणय आणि साहस यांचं मूर्तिमंत प्रतीक असं रूक्मिणी-स्वयंवर विदर्भांतच घडलं. सप्तवाहन, वकतक, नल, राष्ट्रकुल वगैरे अनेक राजांनी या प्रदेशावर राज्य केलं. हा सारा इतिहास आणि भूगोल आता मुंबई राज्याच्या वांट्याला आला.
या ऐतिहासिक द्वैभाषिकाचं मुख्यमंत्रिपद यशवंतरावांनी स्वीकारलं आणि लगेचच त्यांच्या कसोटीचा काळ सुरू झाला. पुनर्रचनेपूर्वीच्या मुंबई राज्यांतील विजापूर, धारवाड, कारवार आणि बेळगाव हे जिल्हे विशाल म्हैसूर राज्याला जोडण्यांत आले होते. तर अबूरोड तालूका राजस्थानांत सामील करण्यांत आला होता. बेळगाव जिल्ह्यांतला चंदगड तालुका मात्र कोल्हापूर जिल्ह्यांत घालण्यांत आला होता. मराठवाड्यांत, अहमदपूर, निलंग व उद्गीर हे तालुके उस्मानाबाद जिल्ह्यांत समाविष्ट झाले आणि इस्लामपूर सर्कल, किनवत तालुका, राजुरा तालुका हे नांदेड जिल्ह्यांत आले. नांदेड जिल्ह्यांतला बिचकोंडा, जुक्कल वगैरे भाग नव्या आंध्र राज्यांत गेला. इतिहास आणि परंपरा यांच्या संयोगामुळे मुंबई-महाराष्ट्र हे एक महान् आणि समृध्द असं राज्य जन्माला आलं.
राज्यांची पुनर्रचना झाली तरी त्या रचनेंत मुंबई राज्याचं संमिश्र स्वरुप कायमच ठेवण्यांत आलं होतं. राज्यापुढे अनेक प्रश्न होते. पण त्यांपैकी महत्त्वाचा प्रश्न राष्ट्रीय ऐक्यासंबंधीचा होता. नव्या मुंबई राज्यानं केवळ कारभार आणि प्रादेशिक फेरफार या बाबातींतच ऐक्य संपादन करण्याचा एक मार्ग दाखवला असं नसून व्यक्तिगत, संस्थाविषयक आणि राष्ट्रीय अशा अनेक क्षेत्रांच्या बाबातीत आदर्श घालून दिला. शेती, उद्योगधंदे, व्यापार, सामाजिक सुखसोयी, सांस्कृतिक सोयी आणि राष्ट्रीय विकासाचीं कार्य या बाबतींत मुंबई राज्य हें नेहमीच अग्रभागीं असलेलं राज्य होतं आणि तसंच रहाणं अटळ ठरलं.