संयुक्त जाबाबदा-यांपैकी जंगल (फॉरेस्ट) खात्याची जाबाबदारीहि या काळांत यशवंतरावांकडेच होती. वनमहोत्सवाचा जमाना त्यापूर्वींच सुरू झालेला होता आणी लोकांच्या दृष्टीनं वनमोहत्सव हा एक चेष्टेचा विषय बनूं लागला होता. वनांचं संरक्षण आणि वन्य पशुपक्ष्यांचं संरक्षण याकडे पहाण्याची यशवंतरावांची दृष्टि मानवी होती. जंगलांची वाढ करणं आणि त्यांचं संरक्षण करणं याचा धागा त्यांनी मानवी जीवनाशीं जोडला.
अन्नधान्याची स्वयंपूर्णता राष्ट्रीय योजनेंत कायम टिकवायची असेल तर जंगल-संपत्तीचं काळजीपूर्वक संरक्षण करून, वाढहि केली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. वृक्षांची लागवड करतांना निवड कशी करावी यावरहि त्यांचा कटाक्ष होता. ग्रामीण भागांत जळणासाठी शेणाचा उपयोग मोठ्या प्रमाणांत केला जातो. जळण्यासाठी खर्ची पडणा-या शेणाची बचत करून त्याचा शेतीस खतासाठी अधिक उपयोग करायचा, तर जळणासाठी उपयुक्त ठरणा-या वृक्षांची लागवड अधिक प्रमाणावर करण्याचा नवा दृष्टिकोन समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वनमहोत्सवाची भारताची जुनी सांस्कृतिक परंपरा असून ग्रामीण भागांतील पंरपरागत वृक्ष-पूजेची आठवणहि त्यांनी ताजी ठेवली आणि राज्यांत वृक्षराजी वाढण्याच्या योजनेला त्यांतून चांगलीच चालना मिळाली.
अस्तित्वांत असलेल्या जंगल-संपत्तीला संरक्षण देतांना, जंगलाच्य आश्रयानं वस्ती करणा-या वन्य-पशुपक्ष्यांचं संरक्षण होण्यासाठी त्यांनी कायदेशीर उपाय-योजन केली. वन्य-पशुपक्ष्यांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं कायदे करणारं मुंबई राज्य हें त्या काळांत पहिलं राज्य ठरलं. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी यशवंतरावांनी कारभारयंत्रणाहि स्थापन केली. शिका-याजवळ परवाना असल्याशिवाय कोणत्याहि वन्य पशूची किंवा पक्ष्याची शिकार करतां येणार नाही, असा या कायद्याचा दंडक होता. वन्य-पशूंसाठी आश्रयस्थानं निर्माण करण्याची तरतूदहि या संरक्षणविषयक कायद्यांत करण्यांत आली.
वन्य-पशुपक्षी क्रूर असले तरी मानवाला मात्र ते उपयोगी पडतात आणि मानवाबरोबर सहजीवन जगण्याची कला त्यांना अवगत असतेच. मानवाचं जीवन समृद्ध करण्यांतहि त्यांचा हातभार लागतो. साप विषारी, खरा, पण तोच रानांतले उंदीर मारून पिकांचा बचाव करतो. वाघ रानडुकरांना मारून पीक वाचवतो. चित्ता माकडांचा बंदोबस्त करतो, असं यशवंतराव समर्थन करत होते.
मानवी जीविताला व मालमत्तेला हानिकारक ठरलेल्या प्राण्यांची शिकार करण्यास मात्र तसा परवाना धारण करण्याच्या अटीवर त्यांनी मोकळीक ठेवली. ‘वाइल्ड लाइफ प्रिझर्व्हेशन’ अधिका-यास असे परवाने देण्याचा अधिकार या कायद्यांत नमूद करण्यांत आला. जंगली प्राण्यांचं संरक्षण करा हा एक साधा विचार लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांनी त्याला मानवतेचा साज चढवला. सहजीवन जगण्याची काल वन्य-पशूंनाहि अवगत असते असं सांगतांना, राज्याचा गाडा सरळ मार्गावरून चालण्याच्या दृष्टीनं, माणसामाणसांत तर सहजीवन अधिक शक्य आहे याबद्दलची त्यांना जाणीव करून द्यायची असावी.
जंगली प्राण्यांना ख-या किंवा भ्रामक भीतींतून स्वत:चं संरक्षण करणं भाग पडतं. माणसामाणसांतहि कधी कधी असं घडतं. संघटनेंत आणि सामाजिक क्षेत्रांत काम करतांना असे अनुभव यशवंतरावांच्या संग्रहीं जमा झालेले होतेच. योग्य संधि मिळतांच हें गाठोडं सोडून त्यांतील एक एक चिजा कमी करण्याचा आणि त्याच त्या गोष्टीची वाढ होत रहाणार नाही यासाठी निश्चित स्वरूपाचे निर्णय करण्याचा पायंडा त्यांनी आपल्या खात्याच्या कारभारांत पाडलेला आढळतो.
१९४६ मध्ये पार्लमेंटरी सेक्रेटरीपदाच्या रूपानं यशवंतरावांचं नेतृत्व मुंबईंत पोंचलं होतं. १९५२ साली. त्यांच्याकडे मंत्रिपद आल्यांनंतर महाराष्ट्राच्या पातळीवर तें नेतृत्व क्रमाक्रमानं वृद्धिंगत होऊं लागलं; आणि त्यानंतरच्या चार वर्षां म्हणजे १९५६ पर्यंत प्रशासकीय गुणांनीहि तें उजळून निघालं. पुरोगामी, ध्येयवादी प्रशासक असा त्यांचा सर्वत्र नांवलौकिक वाढला.