१७
-------------
वस्तुत: यशवंतराव हे संयुक्त महाराष्ट्राचे कट्टे पुरस्कर्ते. असं असूनहि विशाल दवैभाषिक त्यांनी स्वीकारलं; इतकंच नव्हे तर तें चालवण्याची जाबाबदारी आपल्या शिरावर घेतली! मुख्यमंत्रिपदाचाच काटेरी मुगुट जाणतेपणान त्यांनी स्वीकारला. संयुक्त महाराष्ट्राचा वणवा पेटलेला असतांना आणि मोरारजींनी प्रसंगोपात त्या वणव्यांत तेल ओतून चांगला भडकवून ठेवला असतांना, यशवंतरावांनी त्या आगींत उडी घ्यावी याचा अनेकांना अचंबा वाटला. मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासानं त्यांनी हें केलं का? इष्ट साध्य करून घेण्यासाठी, मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यामागे राजकीय चतुराईचा तो डावपेंच होता का? का लोकसभेनं दिलेला पर्याय स्वीकारून, त्याची इमानानं अंमलबजावणी करत करतच लोकशाही-पद्धतीनंच, लोकसभेला, वरिष्ठ नेत्यांना, संयुक्त महाराष्ट्राच्या पर्यायापर्यंत नेऊन भिडवायचं यासाठी अवलंबलेला तो ‘खास’ महाराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा पवित्रा होता? या आणि अशा प्रकारच्या सवालांचीं उत्तरं यशवंतरावांनी तो काटेरी मुगुट डोक्यावर ठेवून पुढे स्वत:च्या कृतीनंच दिलीं.
दिल्लीहून येणा-या लाटा थोपवण्यासाठी आणि महाराष्ट्र जागच्या जागीं स्थिर रहाण्यासाठी प्रसंगीं नम्रता स्वीकारल्याच्या घटना जुन्या ऐतिहासिक काळांतहि घडल्या आहेत. दिल्लीहून सुटलेल्या आदेशाचं महाराष्ट्रांत आताहि नम्रपणानं पालन होऊं लागलं. पण त्यामागचा अंतिम हेतु कोणता होता तें आज्ञापालनकर्त्यालाच माहीत असावं. हेतूची पूर्तता झाल्यानंतरच त्या आज्ञापालनाचा अर्थ इरेजनांना उमगला. १९५६ ते १९६० या काळांत यशवंतरावांनी दिल्लीशी प्रतारणा तर कधी केली नाहीच, शिवाय महाराष्ट्रांतहि कमालीचा विवेक पाळून, महाद्वैभाषिक कां राबवलं पाहिजे याची शिताफीनं ते वकिली करत राहिले. द्वैभाषिकाचं मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर सौराष्ट्रापासून सावंतवाडीपर्यंत आणि विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत वायुवेगानं त्यांनी दौरे केले. या दौ-यांत प्रत्येक ठिकाणीं त्यांनी व्यक्त केलेले विचार समजावून घेतले तर यशवंतरावांच्या दूरदृष्टीचाच प्रत्यय त्यांतून येतो.
१ नोव्हेंबर १९५६ ला महाद्वैभाषिक अस्तित्वांत आलं. मुंबई राज्याचे त्या वेळचे राज्यपाल डॉ. हरेकृष्ण मेहताब यांनी १४ ऑक्टोबरला सूत्रं खाली ठेवलीं आणि सरन्यायाधीश महंमदअल्ली करीम छगला यांनी हंगामी राज्यपालपदाचीं सूत्रं स्वीकारलीं. ३१ ऑक्टोबरला रात्रीं ११-५५ वाजतां मुंबईतील राजभवनासमोरील भव्य पटांगणआंत सरन्यायाधीश एन. एच्. सी. कोयाजी यांच्या उपस्थितींत नियोजित राज्यपाल श्री. छगला यांचा शपथविधि झाला आणि नंतर छगला यांनी नव्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. १ नोव्हेंबरला द्वैभाषिक राज्याच्या मंत्रिमंडळांतील १५ मंत्री आणि ८ उपमंत्री यांचा शपथविधि होऊन मुख्य मंत्री या नात्यानं यशवंतरावांची पिहली राजवट सुरू झाली.
नव्या राज्याचं स्वरूप जितकं चित्तवेधक तितकंच गुंतागुंतीचं होतं. सौराष्ट्र, कच्छ, विदर्भ आणि मराठवाडा हे नवे प्रदेश या राज्यांत आता समाविष्ट झाले होते. ताडाच्या झाडांनी वेष्टिलेला सुंदर समुद्रकिनारा, गिरनार पर्वत, घनदाट जंगलं आणि वाळवंटाचा भव्य प्रदेश, लहानमोठ्या खाड्या, भव्य असा पश्चिम घाट आणि दख्खनचं पठार हें सौराष्ट्राचं वैशिष्ट्य. सौराष्ट्रांतील सखल प्रदेशांतली काळी जमीन कपाशीच्या पिकासाठी महशूर आहे. मुंबई राज्य हें कापड-धंद्याचं एक महत्त्वाचं केंद्र. सौराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश मुंबई राज्यांत सामील झाल्यानं कापड-धंद्यांत मुंबई राज्य हे आता अग्रस्थानीं येणार होतं. सौराष्ट्राचं पूर्वीचं राजधानीचं शहर राजकोट, मुंबईपासून विमानानं दोन-सव्वादोन तासांच्या प्रवासाच्या टप्प्यांतलं हें शहर आता राज्याचा एक भाग बनलं होतं.
अरबी समुद्रांतलं एक लहानसं द्वीपकल्प म्हणजेच कच्छ होय. कच्छ हें एक संस्थान होतं. भुज ही कच्छची राजधानी. कच्छचा प्रमुख व्यवसाय शेती. गुरांची पैदास करणं हा स्वाभाविक व्यवसायाचा भा. दक्षिणेस व पश्चिमेस कच्छचं आखात आणि अरबी समुद्र. पूर्वेला रणचं वाळवंट व त्याच्या पलीकडे सौराष्ट्र व उत्तर-गुजरातचा प्रदेश. कच्छचं वाळवंट म्हणजे एक भौगोलिक चमत्कार आहे. पावसाळ्यांत अथांग पाणी आणि इतर वेळीं कोरडं ठणठणीत वाळवंट! कच्छच्या पश्चिम –किना-यावर कांडला हें नव्यानंच बांधण्यांत आलेलं बंदर. हें दुस-या क्रमांकाचं बंदर मानलं जात असे. कांडला बंदर आणि सौराष्ट्राच्या उत्तर-टोकावरील ओखा बंदर हीं दोन बंदरं आता नव्या मुंबई राज्यांत समाविष्ट झालीं होतीं.