इतिहासाचे एक पान. ११५

मुंबईत गोळीबार होऊन कित्येक लोक ठार करण्यांत आले, पण त्या वेळीं मोरारजींना उपोषणाचा मार्ग सुचला नाही. गुजरातला ते स्वतःचं घर समजत असल्यामुळे तिथे प्राणाची बाजी लावली तर शांतता निर्माण होईल असा त्यांचा समज होता, पण तो भ्रम ठरला. महाराष्ट्रांतून समितीनं मात्र मोरारजींच्या या आपपरभावाचा निषेधच केला.

एक गोष्ट सत्य होती की, आँक्टोबरपासून अस्तित्वांत येणार असलेलीं तीन राज्यं संपुष्टांत आलीं होती. व्दैभाषिक निश्चित झालं होतं. त्याचा मुहूर्त ठरून आता तें राज्य फक्त अस्तित्वांत यायचं तेवढं राहिलं होतं. काँग्रेसे-पक्षांतर्गत तरी निदान, पर्याय निर्माण करण्याच्या वादावर पडदा पडला होता, धांवपळ संपली होती. आता धांवपळ सुरु करावी लागणार होती दी व्दैभाषिकाचा नेता निश्चित करण्यासाठी, मुख्यमंत्री ठरवण्यासाठी. त्यासाठीच मग डावपेचांची आखणी सुरु झाली. काँग्रेस नेत्यांनी आणि लोकसभेनं महाराष्टाच्या आणि गुजरातच्या गळ्यांत व्दैभाषिक अडकवून तेमोकळे झाले परंतु महाराष्ट्रांतील नेत्यांना विशेषतः मोरारजींना मात्र घरघर लागली.

१६ आँक्टोबर १९५६ ला दैभाषिकाचा निर्णय झाला, परंतु व्दैभाषिकाचं वारं वाहूं लागल्यापासून, ७ आँगस्टपासूनच, महाराष्ट्रांत काँग्रेस आणि विरोधी पक्ष यांच्यांत वेगळ्याच हालचाली सुरु झाल्या होत्या. १९५७ मधील सार्वत्रि निवडणुकीचा विचार संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सुरु होऊन अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून, सार्वत्रिक निवडणूकीसाठी म्हणून समितीच्या वतीनं सर्वांचा मिळून एक सामायिक कार्यक्रम, जाहीरनामा निश्चित करण्यांत समितीचे नेते गुंतले होते, तर काँग्रेस-जनांमध्ये व्दैभाषिकाचा असेंब्लींतील नेता कोण असावा, यासंबंधीची धांवपळ सुरु झाली होती.

वस्तुतः मार्चपासूनच काँग्रेस-अंतर्गत निरनिराळ्या गटांत नेते कोण असावेत याच्या गुप्त चर्चा सुरू झाल्यानं, समजोत्याची आशा दुरावत चालली होती. हा सामना अटीतटीचा होणार असं गृहीत धरूनच त्या दृष्टीनं प्रत्येक गट शक्तिसंचय करण्याच्या कामांत गुंतला होता.

शंकरराव देव यांना याची जाणीव झाली होती. त्या वेळीं यशवंतराव चव्हाण याच्याशीं ब्रिजलाल बियाणी आणि देवीसिंग चौहान यांनी जवळीक निर्माण केली होती. चव्हाण नेते म्हणून निवडले गेले, तर आपल्यापैकी कांहींची वर्णी लागावी हा बियाणी आणि देवीसिंग यांचा हेतु असल्याचंहि बोललं जात होतं.

देवकीनंदन नारायण आणि देवगिरीकरहे दोघे एकत्रित राहून चव्हाण आणि बियाणी यांना सहकार्य करूं लागले. भाऊसाहेब हिरे यांना शंकरराव देव आणि काकासाहेब गाडगीळ यांचा पाठिंबा होता. या निवडणुकींत, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, गुजरात, सौराष्ट्र, कच्छ या सर्व भागांतील आमदारांच्या मतांचं दान कसं पडेल त्यावर सर्व अवलंबून होतं. त्यामुळे, प्रादेशिक शक्ति, आपल्यामागे मोठ्या प्रमाणांत उभी करणं यावरच नेतेपदाच्या इच्छुकाला सर्व लक्ष केंद्रित करणं क्रमप्राप्त ठरलं.त्या दृष्टीनं आखणी सुरु राहिली. मराठवाडा काँग्रेसचे नेते स्वामी रामानंद तीर्थ हे होते. त्यांच्या इशा-यानुसार मराठवाड्यांतील मतदान होणार असल्यानं, तें एकमुखी होऊं नये यासाठी गोपाळराव खेडकर यांनी मराठवाड्यांतील बाबासाहेब सावनेकर आणि भगवंतराव गाढे यांच्याशीं संधान बांधून ठेवलं. या सर्व हालचाली पाहून नेतेपदाच्या सामन्यांत, हिरे यांना चीतपट करण्याची तयारी सुरू असल्याबद्दल रामराव देशमुख यांनी शंकरराव देव यांना जागं केलं. विदर्भांतील दुसरे एक नेते मा. सा. कन्नमवार यांच्या मुंबईंतील भेटीगाठीहि त्या दृष्टीनं महत्त्वाच्या मानल्या जाऊं लागल्या. सुरूवातीला तरी चव्हाण, बियाणी, कन्नमवार आणि मराठवाड्यांतील रामानंदांच्या विरोधी असलेला गट एकत्र आला असल्याचं स्पष्ट झालं. भाऊसाहेब हिरे यांच्या विरोधांत आता एक भक्कम फळी तयार होऊं लागली होती. सत्तेपासून  दूर असलेल्या काँग्रेस-जनांना मात्र या अंतर्गत हालचालींची विशेष माहिती नव्हती.