इतिहासाचे एक पान. ११९

१४
--------------

मुंबई विधानसभा काँग्रेस-पक्षाच्या नेतेपदावर यशवंतराव चव्हाम यांची निवड होऊन त्यांनी मुख्य मंत्रिपदाचीं सूत्रं स्वीकारतांच अंधारांत चाचपडत असलेल्या महाराष्ट्रांतील काँग्रेसला आता एक प्रकाशकिरण लाभला.

महाराष्ट्रावर सर्वत्र वेळीं ढग पसरले होते. वादळ घोंगावत होतं. जनसागर उफाळला होता. अशा या आणीबाणीच्या वेळेला यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या द्वैभाषिकाच्या नावेचं सुकाणूं आपल्या हातीं धरण्याचं धाडस केलं होतं. जबाबदारीचं हें ओझं आपल्या खांद्यावर पेलण्याचं धाडस त्यांनी केलं याचं सर्वांनाच कोडं होतं.

द्वैभाषिक राज्याची व्याप्ति मोठी होती. सौराष्ट्रांतल्या राजकोटपासून खाली कोकणांतल्या रत्नागिरीपर्यंत आणि पूर्वेला आंध्रापर्यंत पसरलेला हा प्रचंड मुलूख! प्रत्येक मुलखांतला निसर्ग वेगळा, त्यांचे प्रश्न वेगळे, एका बाजूला श्रीमान उद्योगपति, त्यांची श्रीमंती रहाणी आणि करणी. दुस-या बाजूला नुसती लंगोटी घालून हिंडणारा शेतकरी, आदिवासी! याच्या जोडीला नोकरीच्या आधारानं केवळ जगणारा, परंतु बुद्धिवैभवाची परंपरा मनांत बाळगणारा मध्यमवर्ग. विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पसरलेला कुलश्रेष्ठ श्रीमंत शेतकरी. शोध करूनहि साम्य सापडणार नाही असं हें राज्य. हें राज्य चालवायची जबाबदारी तरूण यशवंतरावांनी स्वीकारावी याचं अनेकांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं.

कारण सारा महाराष्ट्र मनानं फाटला होता. गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, विदर्भ, मराठवाडा, मुंबई या काठ्यांच्या आधारावरच द्वैभाषिकाचा गोवर्धन उभा करण्याची करामत घडली होती. यांतल्या कोणत्या काठ्या कधी बाजूला होतील आणि या पर्वताचे कडे कोसळतील याची कांही शाश्वती नव्हती. नाव वल्हवतांना कोणत्याहि क्षणाला ती भोव-यांत सापडावी असाच हा प्रवाह होता. वल्हें मारून हात दमावेत आणि दमछाक व्हावी अशीच स्थिति; परंतु या नव्या नावाड्यानं सुकाणूं अशा खुबीनं वळवत ठेवलं की, सा-या भोव-यांना तर वळसे मिळालेच; शिवाय धारदार प्रवाह तोडून नाव किना-यापर्यंत सुखरूप पोंचली. अंतर कापण्यास चार वर्षें खर्च झालीं हें खरं, पण मुंबईला संयुक्त महाराष्ट्राच्या बंदरांतच नावाड्यानं अखेर ही नाव नांगरली आणि मगच सुकाणूंवरील हात काढला.

महाराष्ट्राचं नेतृत्व स्वीकारण्याचा मनांत एकदा निर्धार केल्यानंतर पुढच्या सर्व वाटचालींचीं गणितं यशवंतरावांनी करून ठेवलीं असलीं पाहिजेत. संयुक्त महाराष्ट्राचा आणि मुंबईचा प्रश्न सुटायचा तर सर्वप्रथम मोरारजींना बाजूला करणं आवश्यकच होतं. नेतेपणाच्या निवडणुकींत प्रथम तें घडलं. नेतेपदावर निवड झाल्यानंतर मात्र राजकीय आणि शासकीय कारभाराचं मोठं आव्हान समोर आलं. महाराष्ट्रांत त्या अगोदर बाळासाहेब खेर आणि मोरारजी देसाई यांनी कारभाराची एक चौकट तयार केलेली असल्यानं त्यांत बदल घडवायचा तर तो दमदारपणानं, धिमेपणानं करावा लागणार होता. कारण द्वैभाषिकासमोर सामाजिक, आर्थिक, राजकीय आव्हानं तर होतींच, शिवाय सर्वांत महत्त्वाचं आव्हान भावनात्मक ऐक्य निर्माण करण्याचं होतं. हें सर्व व्हायचं तर नवं मंत्रिमंडळ एकदिलाचं राहील आणि कोणत्याहि प्रसंगांत सारे सहकारी एकसंध साथ देतील यावर लक्ष केंद्रित करणंहि आवश्यक होतं.

मंत्रिमंडळांतल्या मंत्र्यांची निवड ही त्याची पहिली कसोटी होती. मुख्य मंत्री या नात्यानं महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर यशवंतरावांचा हा पहिलाच प्रवेश होता. त्यांच्याबद्दल अनेकांच्या अनेक कल्पना असणं शक्य होतं. मुख्य मंत्री म्हणून तर ते नवखेच होते. खेर किंवा मोरारजी यांच्याप्रमाणे राजकारणांतले डावपेच त्यांच्याजवळ नाहीत; डावपेच माहीत नसेलला, पण कुणाबद्दल मनांत असूया न बाळगणारा साधा कार्यकर्ता हीच त्यांच्याबद्दलची प्रारंभींची प्रतिमा बाळगणारे आश्चर्यचकित झाले.