केंद्राचे नक्षलवाद्यांसंबंधीचे धोरण काय होते असे विचारता चव्हाण म्हणाले, ''आम्ही नक्षलवाद्यांच्या चळवळीची आर्थिक व सामाजिक कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला. मी अधिक मूलगामी पद्धतीने या प्रश्नाचा विचार करू इच्छीत होतो. राज्यसरकार अर्थातच तातडीच्या प्रश्नांचा अधिक विचार करतात. पण आम्हाला केंद्र सरकारमध्ये त्याचा राष्ट्रीय भूमिकेतून विचार करावा लागतो व त्यातून मार्ग काढावा लागतो. राज्य सरकारला हे प्रश्न सोडविण्यासाठी काही मदत करता येईल का हेही पाहावयाचे असते.''
चव्हाणांच्या मते नक्षलवादींतील परिस्थिती ही आजच्या भारताची प्रातिनिधिक आहे. नक्षलवाद हा ऐतिहासिक परिस्थितीचा परिपाक आहे. ध्येयप्रणालीतील फरकाने तो निर्माण झाला. नक्षलवाद्यांना वाटते की भारतात आता क्रांतीला अनुकूल असा हा काळ आहे. माझ्यापुढे प्रश्न होता तो या नव्या समस्येला तोंड कसे द्यायचे हा. शेतकर्यांचा प्रश्न सोडविण्याची ती आता ध्येयवादी विचारसरणी झाली आहे. माओने चीनच्या ग्रामीण भागात क्रांतीला सुरुवात केली म्हणून नक्षलवादी आंदोलन खेड्यात सुरू झाले. माओची विचारसरणी व त्याचे तंत्र नक्षलवादी अनुसरत आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेनजीकचे क्षेत्र त्यांनी चळवळीसाठी निवडले याचे कारण एका बाजूला चीन आहे दुसर्या बाजूस पाकिस्तान आहे. आपल्याला चीनमधून चोरून शस्त्रे आणता येतील ही मनीषा ते सदैव बाळगत असत. त्यामुळे क्रांतीला अनुकूल अशी मानसिक परिस्थिती निर्माण होईल असे त्यांना वाटते. पण त्यांना अपेक्षित असलेला परिणाम अद्याप दिसून आलेला नाही.
''सरकार नक्षलवादी चळवळ काबूत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण ज्यामुळे ही चळवळ निर्माण झाली ती कारणे नाहीशी करणे महत्त्वाचे आहे. जेथे जेथे शोषण होत आहे ते थांबविणे हे महत्त्वाचे आहे. पिळवणूक व अन्याय यामुळे अशा विचारसरणी प्रभावी होत असतात. म्हणूनच काँग्रेसच्या पुरोगामी कार्यक्रमावर मी जास्त भर देत असतो.''
चव्हाणांची कसोटी पाहणारा दुसरा प्रश्न याच काळात तीव्र झाला तो म्हणजे हिंदु-मुस्लिमांच्या जातीय दंगलीचा. प्रथम श्रीनगर, त्यानंतर बिहारमध्ये रांची, आंध्र, उत्तरप्रदेश, गुजराथ, महाराष्ट्र या सर्व राज्यांत दंगलीं झाल्या. यासंबंधी आपले मत व्यज्ञात करताना चव्हाण म्हणाले, ''मुख्यतः राजकीय पक्षच एक जमात किंवा जात यांना चिथावणी देतात. त्यामुळेच या दंगली होतात. १९६० नंतर राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी धार्मिक भावना चेतवल्या आहेत. म्हणून हे दंगे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे राजकीय पक्षांना सत्ता मिळविण्याचे साधन म्हणून धर्माचा वापर करण्यास मनाई करणे. जनसंघ हा जातीय भावना वाढविण्यास मुख्यतः जबाबदार आहे. दोन जमातींमधील परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच बंद झाली आहे. त्यामुळे मनात असलेली कटुता वारंवार वर येते.''
शब्दांकन : भा. कृ. केळकर