७. सत्तेवर नसलेले यशवंतराव (राम खांडेकर)
सत्ताकारण आणि राजकारण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हणणे चुकीचे होणार नाही. ज्या नाण्याच्या या दोन बाजू भक्कम आहेत अशी नाणी बर्याच कालावधीपर्यंत चलनात राहतात असाच अनुभव आहे. अर्थात याला अपवादही आहेत. केवळ राजकारण खेळणारी मंडळी फार काळ प्रकाशात असलेली दिसत नाहीत किंवा केवळ सत्ता मिळालेली मंडळी फारशी लोकप्रिय झालेली दिसत नाहीत. ज्या व्यक्तीच्या या दोन बाजू भक्कम आहेत त्याला इतर गुणांची जोड मिळाली तर ती व्यक्ती अविस्मरणीय अशीच असते. यशवंतराव चव्हाण यांची गणना यात करावी लागेल.
यशवंतराव जवळपास ३० वर्षे सत्तेवर होते. या काळात असंख्य लोक त्यांना भेटत होते, त्यांच्याजवळ येत होते. साधारणतः सत्तेवरून माणूस खाली आला की लोक त्याच्याकडे ढुंकूनही पाहात नाहीत असा अनुभव आहे. पण यशवंतरावांच्या बाबतीत असे झाले नाही. थोडा फार फरक पडला असेल. माणसांचा राबता चालूच होता. विरोधी पक्षाचे लोकही त्यांच्याकडे येत होते आणि तासनतास बसत होते. यशवंतरावांशी झालेल्या चर्चेतून त्यांना विचारांची शिदोरी मिळत होती. सत्तेवर नसतानाही यशवंतरावांना अनेक कार्यक्रमांची बोलावणी येत होती. महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरचे लोकही भेटून त्यांना आमंत्रण देत होते. कवी, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी यशवंतरावांकडे आपल्या विषयासंबंधी चर्चा करीत होते. खरे म्हणजे आता यशवंतराव विचारांनी मोकळे झाले होते. ते यात जास्तीत जास्त रस घेऊ लागले होते. यशवंतराव सत्तेवर नाहीत म्हणून लोकांनी त्यांना सोडले नव्हते. या कालावधीत यशवंतरावांचा पत्रव्यवहार जवळपास जशाचा तसाच होता. प्रत्येक पत्राला उत्तर गेले पाहिजे हाच यशवंतरावांकडचा प्रघात होता. तो त्यांनी पुढेही चालू ठेवला. फरक एवढाच होता की कधी कधी मराठी पत्रांना इंग्रजीत पोच जाऊ लागली. कारण दिल्लीत मराठी शीघ्रलेखक किंवा टंकलेखक कमी आहेत. याचा खुलासा यशवंतरावांनी अनेकदा केलाही होता.
१९७७ च्या फेब्रुवारीत काँग्रेसला हादरा देणार्या निवडणुकी झाल्या. त्यानंतर यशवंतराव दिल्लीत आले. निवडणुकीच्या निकालाचा त्यांनाही धक्काच बसला होता. आल्याबरोबर त्यांनी प्रथम आपल्या खाजगी सचिवांना बोलावून घरातील सर्व सरकारी कागदपत्रे त्यांच्या स्वाधीन केली. गुप्त कागदपत्रे कोणाला पाठवावयाची याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर बंगल्यावरील स्वीय सहायकास सरकारी फर्निचर वगैरे ताबडतोब परत करण्याच्या सूचना दिल्या. घरातील एअर कंडिशनर्स कमी करण्यात आले. सरकारी अंगरक्षक, पोलिस, कर्मचारी यांना प्रेमाने निरोप दिला. सत्तेवर नसलेल्या यशवंतरावांनी आपल्या पुढील जीवनाचा, दिनचर्येचा आराखडा तयार केला. पहिले तीन-चार महिने काँग्रेस पक्षाच्या अनेक बैठकी झाल्या. पराभवाची मीमांसा, पुढील कार्यक्रम याबाबत चर्चा झाल्या. श्रीमती इंदिरा गांधींचा पराभव झाल्यामुळे लोकसभेत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व यशवंतरावांकडे आले. पक्षाच्या कार्याला वेळ देऊन राहिलेल्या वेळात यशवंतराव दोन सख्यांच्या सहवासात आपला वेळ घालवू लागले. संघटना व देश यांच्या भवितव्याबाबत त्यांना चिंता होती. परंतु त्यांच्या सख्या त्यांना पुष्कळदा यापासून दूर नेत होत्या. यशवंतरावांच्या दिवाणखान्यात दोन सोफ्याच्या खुर्च्या होत्या. यशवंतरावांची एक सोफ्याची खुर्ची निश्चित केलेली होती. त्यांच्या डाव्या बाजूला जी खुर्ची होती त्यावर वेणूताई बसायच्या. ही स्थाने निश्चित केलेली होती. खुर्चा बदलून ही उभयता बसली असे कधी झाले नाही. साहेब दौर्यावर असतानाही कधी वेणूताई साहेबांच्या खुर्चीवर बसल्या नाहीत. एवढेच नव्हे तर सौ. वेणूताईंच्या निधनानंतर ही खुर्ची नेहमी रिकामीच राहिली. साहेब फारसे त्या खुर्चीवर बसले नाहीत किंवा त्यांनी ती खुर्ची बाहेर ठेवली नाही. यशवंतरावांच्या डाव्या बाजूला त्यांची सखी वेणूताई होत्या तर उजव्या बाजूला एका छोट्या टेबलावर दुसरी सखी होती. ती म्हणजे पुस्तके. या टेबलावर २५-३० पुस्तके, ६-७ मासके नीट लावून ठेवलेली असत. सौ. वेणूताई व यशवंतराव यांना त्यांचा संसार सुरू झाल्यापासून एवढा निवांत वेळ प्रथमच मिळत होता. वेणूताईंची दिनचर्या याही काळात फारशी बदलली नव्हती. पण यशवंतरावांच्या जीवनात फार फरक पडला.