पुढे त्याच कोकण-सेवक जहाजावर काँग्रेस कार्यकारिणी व अन्य प्रमुख नेत्यांना बोलावले. कामराज, संजीव रेड्डी, स.का. पाटील इ. सर्व आले. साहेबांचे येणे ऐनवेळी रद्द. या कोकण जहाज सेवेमुळे महाराष्ट्र सरकार व चौगुलेसमूह यात खाडी निर्माण झाली. केंद्रात परिवहनमंत्री सारखे बदलत होते. राजबहादुर, प्रा. व्ही. के.आर.व्ही. राव, संजीव रेड्डी आणि कमलापति त्रिपाठी असे ६ वर्षांत ४ मंत्री झाले. परंतु त्या खात्याचे सचिव डॉ. नागेन्द्र सिंग आणि उभय पक्षांचे, म्हणजे महाराष्ट्र सरकार व चौगुले यांचे अनधिकृत सल्लागार साहेब केंद्रीय मंत्री होतेच. दरवेळी त्यांच्याकडे गेलो की म्हणत ''नाईकांनी प्रश्न काढला तर मी माझे मत सांगेन.'' पण श्री. वसंतराव नाईक असे वस्ताद की, ते प्रश्न काढीतच नसत. आमच्या आवाहनांचा विशेष परिणामच निघत नसे. अखेर भारत सरकारने कोकण-सेवेचे राष्ट्रीयीकरण केल. बोटी गेल्या त्या दिवशी साहेबांकडे सहज गेलो. नेहमीप्रमाणे हसून म्हणाले, ''घ्या पोतदार, सिगरेट घ्या.'' (त्या काळी ते क्वचित ओढत). कोकण-सेवेचा विषयच नाही. कित्येकदा वाटे अवघड प्रश्नांना साहेब सफाईने बगल देतात की काय !
महाराष्ट्रातील उद्योगपतींपैकी श्री. शंतनुराव किर्लोस्कर, श्री. आबासाहेब गरवारे, बेळगावचे श्री. बा. म. गोगटे (हे बालमित्र म्हणून नेहमी असत), भारत फोर्जचे श्री. कल्याणी, श्री. रामकृष्ण बजाज, श्री. माधवराव आपटे तसेच गोव्याचे श्री. चौगुले-साळगावकर-धेंपे त्रिमूर्ती साहेबांना प्रसंगवत भेटत असत. पण त्यांचा ओढा तरुण पिढीकडे अधिक असे. श्री. भाऊसाहेब नेवाळकरांचे पुत्र श्री. अनिल व श्री. गोगटे, श्री. चौगुले, श्री. साळगावकर यांच्या तरुण पिढीबद्दल साहेब नेहमी चौकशी करीत. मी पाहिले की, बेनेट कोलमनच्या श्री. अशोक जैनांकडे अधिक प्रेमदृष्टी असण्याचे कारणदेखील साहेबांच्या शब्दात ''तडफदार तरुण उद्यमी'' हेच असेल. तीच गोष्ट कामगार नेत्यांची. विरोधी पक्षातील श्री. मधु लिमये, श्री. मधु दंडवते, श्री. जॉर्ज फर्नांडिस किंवा त्या काळच्या काँग्रेसमधील 'तरुण तुर्क' चंद्रशेखर-धारिया-कृष्णकांत साहेबांना जवळचे वाटत. मतभेद शिंक्यावर टांगले जात. अगदी मनमोकळी चर्चा होई.
पत्रकारांपैकी जुन्या पिढीतील गाडगीळ-पाध्ये-महाजनी परिचित. पण प्रमाचे झुकते माप युवा मंडळी मुकुंदराव किर्लोस्कर, नारायण पुराणिक, माधव गडकरी, गोविंद तळवलकर आदींकडे. हा साहेबांच्या लोकसंग्रहाचा भाग. यांतही काही सूत्र शोधू लागल्यास मान्यार्थाने काही नाही. अंतरीची तळमळ केवळ इतक्या वर्षात खाजगी बैठकीत दोनतीनदा कारखानदारांबद्दल साहेबांचे वक्तव्य ऐकण्याची संधी मिळाली. (जाहीर भाषणे अनेक, पण औपचारिक) एका कामगारनेत्याला किंचित स्वर चढवून ते सांगत होते : ''भांडवलदार म्हणजे दुभत्या गाई; पवित्र (होली काऊ) नव्हे ! पण आमच्या सरकारला कसाईही होता येणार नाही. समोपचाराने घ्या. नाहीतर सारेच हातचे जाईल.''
राजकीय, सामाजिक, आर्थिक नि साहित्य क्षेत्रातील नव्यात नवी प्रकाशने श्री. चव्हाणांच्या टेबलावर असत. वाचन अथांग, मनन भरपूर. मात्र कुठलेही साचेबंद किंवा लेबल-बाज धोरण नाही. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कै. भाऊसाहेब बांदोडकर यांना साहेब म्हणाले : ''त्याचं असं आहे भाऊ, जेथे ज्या प्रकारचे उद्योगधंदे निघू शकत असतील ते स्थापित होऊ देत. ज्यांना काढावयाचे असतील त्यांना काढू द्यावे. सरकारने शक्य तेवढे उत्तेजन द्यावे. मी तर म्हणेन सुशिक्षित बेकारांना काम मिळो म्हणजे झालं !'' अर्थात हे फार धोपट सहजोद्गार होते. एका परदेशी औषध कंपनीच्या शिष्टमंडळाशी बोलतानासुद्धा साहेब खोलवर शिरले नाहीत. शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर म्हणाले, ''आमचे तरुण तंत्रदृष्ट्या शिकवून किती वर्षांत तयार कराल ? अन्य मुयांपेक्षा आमच्या लोकांची कुशलता वाढविण्यास मी अधिक महत्त्व देतो. डेव्हलपमेंट ऑफ ह्यूमन रिसोर्सेस.'' अशा प्रकारे नाही म्हटले तरी साहेब गाभ्याला हात घालीत. हा कमकुवतपणा नसून कार्य-कुशलता आहे. उगीच शब्दावडंबरापेक्षा किती तरी श्रेयस्कर. हेच त्यांच्या राजकीय वा आर्थिक नीतीचे सूत्र वाटते. मानवी आधार !