यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ७-२

यशवंतरावांना सत्तेचा गर्व कधी झाला नाही.  आपल्या बरोबरच्या लोकांना त्यांनी कधी मी मंत्री आहे याची जाणीव होऊ दिली नाही किंवा करून दिली नाही.  सत्तेवर नसतानाही त्यांनी कोणाला मी अमुक एक होतो असे सांगितले नाही.  ते नेहमीच हाताखालच्या लोकांशी सौम्यतेने व जिव्हाळ्याने वागत.  वड्याचे तेल वांग्यावर कधी जर काढले गेले तर त्यांना त्याची जाणीव व्हायची.  १९८० ते १९८२ च्या काळात मजेदार गोष्ट घडली.  श्री. शरद पवार, यशवंतराव ज्या काँग्रेसमध्ये होते त्याचे महाराष्ट्रात नेतृत्व करीत होते.  शेतकर्‍यांचे प्रश्न घेऊन श्री. शरद पवार महाराष्ट्रातून दिंडी घेऊन नागपूरला निघाले होते.  या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.  यशवंतरावांनी थोड्या वेळासाठी का होईना या दिंडीत सामील व्हावे अशी श्री. शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली.  श्री. यशवंतराव शरद पवार यांच्या कार्याला प्रोत्साहन देत होते.  यशवंतरावांनी नागपूरपूर्वी या दिंडीत भाग घ्यायचे ठरविले आणि ते नागपूरला गेले.  तेथून ते १०० ते १२५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अमरावती येथे गेले.  दुसर्‍या दिवशी सकाळी ते दिंडीत सामील व्हायला गेले आणि तिथेच पोलिस अधिकार्‍यांनी दिंडीत सामील होणार्‍यांना पकडायचे आदेश आहेत असे यशवंतरावांना सांगितले.  यशवंतरावांना हा अन्याय होत आहे याची जाणीव झाली.  तरीपण शांतपणे त्यांनी अधिकार्‍यांना आदेशातील शब्द नीट वाचून मग पुढील कार्यवाही करण्यास सुचविले.  पोलिस अधिकार्‍यांनी त्यांना स्पष्ट आदेश असल्याचे सांगितले.  इतरांना या कार्यवाहीची चीड आली, पण यशवंतराव शांतपणे बसमध्ये बसले.  एवढेच नव्हे तर दिंडीतील इतरांना दुपारच्या वेळी दिलेली भाजी पुरी सर्वांसोबत आवडीने खाल्ली.  दिवसभराच्या प्रवासात त्यांनी कुठे ब्र काढला नाही.  तसे पाहिले तर दुसर्‍याच्या कारभारात हस्तक्षेप न करण्याचा यशवंतरावांचा स्वभाव होता.  एकदा ते गंगोत्रीस हेलिकॉप्टरने सरकारी कामानिमित्त गेले होत.  हिमालयाच्या रांगांत हेलिकॉप्टर साधारणतः दरीतून आपला प्रवास करते.  गंगोत्री सोडताना पाऊस पडत होता.  पावसात हेलिकॉप्टर प्रवास करीत होते.  साधारणतः ४० ते ४५ मिनिटाच्या प्रवासानंतर काही अंतरावर काळे ढग दिसू लागले.  पायलटने आपल्या शेजारच्या सहकार्‍याला पुढे काही दिसते का विचारले.  त्याने नाही म्हणताच १५ सेकंदांत हेलिकॉप्टर मागे वळविले.  पायलटशेजारी यशवंतराव बसले होते.  हेलिकॉप्टर मागे परतत आहे याची त्यांना कल्पना आली.  पण का हे लक्षात आले नाही.  त्यांनी शेजारच्या पायलटकडे सुद्धा बघितले नाही.  समोर पाहात राहिले.  मंत्री आपणास आता परत का फिरता असे विचारतील म्हणून पायलट त्यांच्याकडे पाहात होता.  पण यशवंतराव समोर पाहात होते.  ५-७ मिनिटांनंतर एक शाळेचे मोठे मैदानपाहून हेलिकॉप्टर खाली उतरविले.  यशवंतराव खाली उतरले.  तरीपण यशवंतरावांनी त्याला विचारले नाही.  शेवटी तोच म्हणाला, सर, पुढे खराब हवा असण्याची शक्यता होती.  ढगातून प्रवास करणे जोखमीचे होते म्हणून परत आलो.''  यशवंतराव म्हणाले, ''हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही सुपिरिअर आहात.  माझ्यापेक्षा तिथे तुमची जबाबदारी मोठी आहे.  तुम्ही योग्य तोच निर्णय घ्याल म्हणून मी बोललो किंवा विचारले नाही.६  मोटारीतही यशवंतराव गाडी चालू असताना ड्रायव्हरला काही बोलत नसत.  सौ. वेणूताईंची स्वतंत्र गाडी होती.  ड्रायव्हरही स्वतंत्र होता.  त्याला गाडी वेगात चालविण्याची सवय होती.  अर्थात काळ वेळ पाहून.  एकदा यशवंतरावांना महत्त्वाच्या बैठकीसाठी जायचे होते.  वेळ अतिशय थोडा होता.  ते खाजगी गाडीतून गेले.  ड्रायव्हरला, उशीर झाला आहे याची कल्पना होती.  त्याने इतक्या वेगात गाडी नेली की यशवंतराव वेळेवर पोहोचले.  परंतु परत आल्यानंतर त्यांनी सौ. वेणूताईंना सांगितले की तुमच्या ड्रायव्हरला गाडी थोडी हळू चालवायला सांगा.  अर्थात त्याने वेळेवर नेल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यास ते विसरले नाहीत.

यशवंतरावांच्या राहणीत सत्तेवर असताना व नसताना फारसा काही फरक पडला नाही.  त्यांना कडक परीटघडीचे कपडे आवडायचे.  साधारणतः दिवसातून ते दोनदा कपडे बदलत.  ही सवय सत्तेवर नसतानाही यशवंतरावांना होती.  साहित्य, माणसं, प्रवास यातच यशवंतराव सत्तेवर नसताना वेळ घालवू लागले.  विशेषतः या कालावधीत त्यांनी लिखाण बरेच केले.  लहान मोठे लेख, प्रस्तावना त्यांनी बर्‍याच लिहिल्या. आत्मचरित्राचा विचार घोळत होता पण त्यासाठी लागणारी मनःशांती नव्हती.  ती मिळाली जेव्हा त्यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा.  त्यांचा काँग्रेस प्रवेश विवाद्य ठरला.  ही नाराजी पत्रद्वारे, अग्रलेखाद्वारे व्यक्त झाली.  प्रत्यक्ष यशवंतरावांना भेटून काहींनी सांगितली.  पण नेहमीच्या सवयीप्रमाणे कोणतीही गोष्ट नीट विचार केल्याशिवाय करायची नाही या स्वभावाप्रमाणे यशवंतरावांनी आपल्या मनातील कॉम्प्युटरपुढे हा प्रश्न मांडला.  सर्व बाजूंनी त्यांनी विचार केला.  विरोधी पक्षाची भूमिका, त्यांचं भवितव्य पाहून यशवंतरावांनी काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करावयाचे ठरविले.  अर्थात याचा फायदा त्यांच्या अनुयायाना मिळाला.  किंबहुना, अवघडलेल्या स्थितीतून त्यांना बाहेर पडता यावे म्हणून त्यांनी हा मार्ग मुख्यतः स्वीकारला.  आता पक्षासाठी व देशासाठी काही करता आलं तर करायचं ही दिशा त्यांनी या कालावधीत ठरविली.  म्हणूनच आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर, त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळूनही सरकारची एक पैशाचीही वस्तू त्यांनी बंगल्यात येऊ दिली नाही.  एव्हढेच नव्हे तर सरकारी टेलिफोनही त्यांनी घेतला नाही.  त्यांचा स्वतःचा टेलिफोन हा बर्‍याच वेळा खराब असायचा.  विशेषतः सौ. वेणूताईंच्या आजारपणात तो खराब झाला की फार त्रास व्हायचा म्हणून सरकारी टेलिफोन घ्यावा असे सुचविण्यात आले.  परंतु यशवंतरावांनी स्पष्ट नकार दिला.  त्यामुळे रात्री बेरात्री सुद्धा बंगल्यासमोरच्या टॅक्सी स्टँडवर जाऊन टेलिफोन करावा लागायचा.