यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ५-१

दोन दिवसांनी म. प्र. काँ. कमिटी 'लोकमान्या'ची जबाबदारी घेऊ शकत नाही असा नाईक-निंबाळकरांनी निरोप दिला.  पुन्हा यशवंतरावांकडे गेलो.  यशवंतराव म्हणाले, ''सरकारची आणि माझी मदत मिळेल असे समजून चालायला हरकत नाही, तू आणि तुझे सहकारी काय करायचे ते ठरवा, मग पुन्हा भेट.''  वास्तविक सर्व मराठी वर्तमानपत्रे तेव्हा यशवंतरावांच्यावर तुटून पडत होती.  रोज ते ही सर्व टीका वाचत होते, ऐकत होते तरीही म्हणाले, ''मदत करीन.''  मी सरळ विचारले, ''तुमच्यावर आम्ही टीका केली तरी.''  यशवंतराव हसून म्हणाले, ''टीका करा की, शिव्या देऊ नका म्हणजे झाले.''  शिवराळ शिव्यांचा संदर्भ माझा आणि के. आचार्य अत्रे ह्यांचा जो संबंध होता त्याबाबत होता.  

यशवंतराव व्यक्तिशः फार भावनाप्रधान होते.  कृष्ण मेनननंतर ते संरक्षणमंत्री झाले.  १९६२, १९६५ व १९७१ ह्या चीनने आक्रमण व भारत-पाक युद्धात मी गेलो.  १९६२ साली यशवंतराव पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बरोबर तेजपूरला आले.  पंडितजी फार थकलेले, कष्टी दिसत होते.  मी यशवंतरावांना विचारले, ''काय झाले ?''  यशवंतराव म्हणाले, ''प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर भेट, सांगतो.''  काही वेळाने आम्ही सारे वार्ताहर प्रेस कॉन्फरन्सला गेलो.  माझ्या गळ्यात कॅमेरा होता.  तसेच आणखी काही देशी-परदेशी वार्ताहरांच्याजवळी कॅमेरे होते.  मला पाहताच यशवंतराव उठले आणि मला बाजूला बोलावून म्हणाले, ''नारायण, पंडितजी हॉस्पिटलमध्ये गेले होते.  फार हळवे आहेत.  त्यांच्या मनाला यातना झाल्याचं मी पाहिलं.  तेव्हा सांगतो ते ऐक.  त्यांचे फोटो घेऊ नकोस आणि फोटो घ्यायचे नाहीत असं इतरांना सांग.  प्रेस कॉन्फरन्स संपल्यावर वेळ असला तर बोलू.''

मी सगळ्यांना सांगितलं.  पण स्वतः मात्र मी पंडितजींचे, मला वाटतं चोरून दोन फोटो घेतले.  प्रसिद्ध केले नाहीत, पण पुण्याला आल्यावर प्रती तयार केल्या व दिल्लीला गेल्यावर यशवंतरावांना दाखवल्या.  ते म्हणाले, ''तू फोटो घेतलेस ते पंडितजींच्या लक्षात आलं.  पण ते काही बोलले नाहीत.  तू प्रसिद्ध करणार नाहीस असं मी त्यांना सांगितलं होतं.''

१९६५ च्या युद्धात यशवंतरावांनी मला एक व्यक्तिगत पत्र दिलं होते.  त्यात मला सर्व प्रकारे मदत द्यावी असं लिहिलेलं होतं.  आवश्यक वाटलं तरच मी पत्राचा उपयोग करी.

त्यांच्या मदतीमुळे रणांगणावरचे सेनानी मोकळेपणाने बोलत.  १९६५ साली पहिली फेरी करून आघाडीवरून मी परत आलो तो संतापून.  संध्याकाळी यशवंतरावांना भेटलो.  मला विचारलं, ''काय काय केलंस ?''  मी मोकळेपणाने सांगितलं, चिडून म्हटलं, ''आमचे काही अधिकारी चैनी, भेकड, हलकट आहेत.''  मग उदाहरण दिली.  यशवंतराव म्हणाले, ''तू जनरल चौधरींना भेटणार आहेस का ?''  मी म्हटलं, ''भेटायचं ठरलं पण 'वेळ नाही' असं उत्तर देतात.''  यशवंतरावांनी डोंगरेंना वेळ ठरवायला सांगितली.  रात्री जन. चौधरींना भेटलो.  तासभर मोकळं बोलणं झालं.  दुसर्‍या दिवशी दिवसभर यशवंतराव नव्हते.  संध्याकाळी ''भेटायला बोलावलंय'' म्हणून डोंगरेंचा फोन आला.  गेलो.  यशवंतराव पार बदलले होते, दुःखी होते.  मला म्हणाले, ''आज मी व्यक्तिगत अनुभव घेतला.  जखमी सैनिकांना भेटायला आघाडीवरच्या हॉस्पिटलमध्ये गेलो.  एक आवाज आला, 'मामा, मला ओळखलं नाही.'  मागे पाहिलं, कराडचा तरणा बांड पोरगा.  खूप जखमी झाला होता.  युद्धातली ही व्यक्तिगत दुःख.''  काही वेळाने म्हणाले, ''डोंगराईला जा.  तू ताबडतोब गेलास तर तुला सगळी माहिती मिळेल अन् प्रत्यक्ष पाहता येईल.''

१९७२ च्या दुष्काळाच्या वेळी काही कारणांनी यशवंतराव औरंगाबादला आले.  बरोबर वसंतराव नाईक व इतर मंत्री होते.  दुष्काळाच्या परिस्थितीवर लेख लिहिण्यासाठी मी खानदेशात फिरून वेरूळला आलो.  तेव्हा ताई बस्तीकरांनी (वेरूळच्या कैलास ट्रस्टचा संस्थापक)  मला यशवंतराव आल्याचं सांगितलं.  ताईंची व यशवंतरावांची ओळख जुनी.  ताईंनी कैलास ट्रस्टची योजना आखली तेव्हा यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  त्यांच्याच कार्यालयात ताई, शंकरराव आडिवरेकर, यशवंतराव त्यांना बिजी म्हणत आणि मी बसून चर्चा करून ट्रस्टच्या कार्याचं स्वरूप ठरवलं होतं.  यशवंतराव त्या अर्थाने ताईच्याच सारखे कैलास ट्रस्टचे संस्थापक होते.  मी आणि ताई खुल्ताबादला जाऊन सरकारी अतिथिगृहात यशवंतरावांना भेटलो.  ताई मुद्दाम मागे राहिल्या.  मी पुढे गेलो.  मला पाहताच ''अरे इथे कसा'' विचारीत ते जवळ आले.  भोवताली खूप राजकीय पुढारी मंडळी बसली होती.  मी म्हटलं, ''फार वेळ घेत नाही, पण आठवण देतो.  कैलास ट्रस्ट वेरूळला काम करतो, ताई तिथेच आहेत.  पण राजकारणात तुम्हाला हे काही आठवलं नसणार.''  ''विसरलो आणि चूकही झाली,'' यशवंतराव म्हणाले, ''तू एकटाच चिडून आलास का ताई पण रागावल्या आहेत ?''  मी ताईंना पुढे यायला सांगितलं.  ताईंना पाहताच ''ताई, चुकलो पण चूक सुधारतो.  आम्ही सर्व उद्या सकाळी वेरूळला येणार आहोत'' आणि तसे ते आलेही.