यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ५-२

नंतर काही वर्षांनी मी आणि ताई दिल्लीला गेलो होतो.  ताईंनी यशवंतरावांना फोन केला.  त्यांनी भेटायला बोलावलं.  तसे आम्ही त्यांच्या घरी गेलो.  त्या वेळी ताईंच्या मनात एक मोळी काळजी होती.  प्राप्‍तिकराचे नियम बदलल्यामुळे कैलास ट्रस्टवर एक लाखाच्यावर प्राप्‍तिकराची मागणी आली.  ज्या रकमेसोबत मागणी होती, ती रक्कम दुष्काळी कामासाठी देणग्या मिळवून खर्च झाली होती.  पण प्राप्‍तिकर अधिकार्‍यांनी काही तांत्रिक मुद्दे काढून खर्च झालेली रक्कम, व्याज, दंड असा आकार केला.  बोलणार्‍या ताई हे सारं वेणूताईंना सांगत होत्या, यशवंतराव ऐकत होते.  बोलताना ताई म्हणाल्या, ''कोणत्या अर्थमंत्र्यांनी हा गाढवपणा केला कुणास ठाऊक ?''  मी ताईंना खुणवू लागलो.  तसं यशवंतरावांनी मला गप्प बसायला खुणवलं.  ताईंचं म्हणणं शांतपणे ऐकू घेतलं, मग उठून उभे राहिले, ताईंच्या पुढ हात जोडून उभे राहात म्हणाले, ''ताई, तो गाढव अर्थमंत्री आपल्यापुढे हात जोडून उभा आहे.''  ताईंचा राग पळाला.  त्या काही बोलणार तेवढ्यात यशवंतराव म्हणाले, ''अहो ताई, प्रेमाने शिव्या देणारी बहीण आहे ते तुमच्या बोलण्यानं कळलं.''

शंकरराव आडिवरेकरांवर असंच भावासारखं प्रेम ते करीत.  मी कधीही भेटलो तर प्रथम विचारीत, ''अरे, बिजीची प्रकृती कशी आहे ?  खूप दिवसांत भेट नाही.''

यशवंतराव राजकारणात होते आणि सरकारी धोरणे ते आपल्या भाषणात, लेखनात मांडीत. पण व्यक्ती म्हणून ते उत्तम वक्ते होते.  खूप खूप वाचीत.  जे नवे शिकायला मिळेल ते शिकत.  तयावर चर्चा करीत.  भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं.  आम्ही तासनतास एखाद्या ग्रंथावर बोलायचो.  एकदा ते म्हणाले, ''नारायण, मला खूप लिहायचंय.  पण स्वतः लिहिणं वेळेमुळे जमत नाही.''  मग चर्चा झाली.  शेवटी म्हणाले, ''दिल्लीला राहून तू माझ्याबरोबर काम करायला तयार असलास तर इंग्रजी-मराठी दोन्ही भाषांत आपण लेखन पुरं करू.''  मी हो म्हटलं.  पुण्याहून काही दिवसांनी आठवणीचं पत्र लिहिलं.  त्याचं उत्तर आलं, ''अडचण आहेच.  जमले ते मी स्वतःच करतो.''

काही लेखन त्यांनी केलंही, पण त्यात यशवंतराव ही व्यक्ती मला दिसली नाही.  भेटीत मी म्हटलं तसं म्हणाले, ''अरे परिस्थिती बदलली आहे.''  मी काहीच बोललो नाही.  मी पुष्कळदा त्यांना म्हणे, ''राजकीय पुढारी यशवंतराव चव्हाण म्हणून फार काळ वावरत लेखन करायचं त्यापेक्षा कराडच्या विठाबाई चव्हाणांचा मुलगा म्हणून बैठक मारून मोकळ्या मनाने लिहा.''  विठाबाईंच्या गुणी यशवंतने ते केलं नाही.  परिस्थितीमुळे शक्यही झालं नसेल.  पण ते गेले तेव्हा वाटलं, ''यशवंतरावांना बैठक मारून मनमोकळेपणाने लिहिणं शक्य झालं नाही.  सारं शब्दसामर्थ्य बरोबर घेऊन गेले.''