वेरूळचे कैलास लेणे पाहिल्यानंतरचा अनुभवही त्यांनी असाच लोभस व रेखीव शब्दांत पकडला आहे. कैलास पाहताक्षणी त्यांना भोवतालच्या चराचराचे विस्मरण झाले होते. मन भारावले होते. परमानंदाचा तो अत्युत्कट क्षण त्यांना भासला. श्रेष्ठ कलाकृतींमध्ये जीवन फुलवण्याची केवढी अमर्याद शक्ती असते, याचा जणू साक्षात्कार त्यांना कैलासदर्शनाने झाला होता.
जीवनातील बरेवाईट प्रसंग ऊनसावल्यांच्या खेळाकडे पाहावे, तसे नियतीचा खेळ म्हणून पाहताना यशवंतराव आढळतात. १९४६ साली साता-याहून मुंबईला नवा पदभार सांभाळण्यासाठी डेक्कन क्वीनने ते निघाले असता एकेक बोगदे पार करीत गाडी जात होती. ''कधी अंधार, तर कधी प्रकाश असा खेळ खेळत आमचा प्रवास चालला होता,'' असे नोंदवून यशवंतराव प्रश्न उभा करतात, ''पुढच्या जीवनाचे प्रतीक तर नव्हते ?'' या प्रश्नावरच त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला खंड संपतो. आणि आयुष्यातल्या ज्या छायाप्रकाशाचे नाट्य ते पुढच्या खंडात रंगवणार होते, त्याला आपण मुकलो, या जाणिवेने वाचक हळहळतो. ('कृष्णाकाठ', ३१४).
विषय कोणताही असो, त्याला लालित्याची डूब देऊनच यशवंतराव श्रोत्यांच्या वा वाचकांच्या समोर ठेवीत असत. त्यांची भाषणे ही तर प्रत्ययकारी प्रतिमांच्या व काव्यमय ओळींच्या उधळणीने परिप्लुत असायची. महाराष्ट्रातील शेती मुख्यत्वे कोरडवाहू आहे, हे रूक्ष विधान सगळेच पुढारी आपल्या कानीकपाळी ठोकीत असतात. पण तेच जेव्हा यशवंतरावांच्या तोंडून प्रगटते तेव्हा त्याचे रूप असे होते :
''मथुरेची गवळण पाणी भरून डोक्यावर हंडा घेऊन निघाली आणि घरी येऊन पाहते, तो आपल्या डोक्यावरच्या हंड्यामध्ये पाणी नाही, तसे आपल्या शेतीचे झाले आहे. दरवर्षी मृग नक्षत्रापासून हस्त नक्षत्रापर्यंत भरलेल्या नक्षत्रांच्या बाजारामध्ये आपल्या डोक्यावर भांडे घेऊन जाते. बिचारी आमची शेती; पण त्यात शेवटी काहीच शिल्लक राहत नाही.'' ('सह्याद्रीचे वारे', १२८). आमच्या महाराष्ट्राच्या शेतीचा हा मथुरेचा बाजार झाला आहे.
कृषी विद्यापीठांमधले ज्ञान सर्वच शेतकर्यांपर्यंत पोचायला हवे, असे सांगताना ते सहज बोलून जातात,
''नद्यांचे पाणी फक्त काठावरच्यांना मिळते, तसे कृषी विद्यापीठांचे होऊ नये.''
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून त्यांना देशाच्या संरक्षणमंत्रिपदावर जावे लागले, तेव्हाची आपली मनोवस्था 'सासरी जावेसे वाटते; पण माहेर तर सुटत नाही', अशा शब्दांत त्यांनी व्यक्त केली आहे. ('युगांतर', १०).
लालित्याचा स्पर्श होऊन उमटलेले त्यांचे हे शब्द ऐकणा-याला सांगायचे ते तर अचूक सांगतातच, पण सांगणा-याचे अंतर्मनही त्याच्या पुढ्यात उकलून ठेवतात. प्रतिपाद्य विषयाबद्दलचा त्यांचा जिव्हाळा या लालित्यपूर्ण मांडणीतून अधोरेखित केला जातो.