गांधी, नेहरू, राधाकृष्णन्, काकासाहेब गाडगीळ, धनंजयराव गाडगीळ प्रभृती समकालीनांविषयी, किंवा खाडिलकर, केळकर, खांडेकर, माडखोलकर वगैरे लेखकांविषयी, तसेच शिवाजी, शाहू, विठ्ठल रामजी शिंदे या वंद्य विभूतीमत्त्वांविषयी यशवंतरावांनी प्रसंगोपात्त लिहिले आहे. ब-याचदा त्यांनी सांगितलेले अनेक तपशील जुनेच असले, तरी त्यांच्या लेखना-भाषणात संबंधित व्यक्तींविषयी एखादेच असे अन्वर्थक विधान यशवंतराव टाकतात, की त्यातून त्या व्यक्तीमत्त्वाचे खास वैशिष्ट्य चपखलपणे श्रोत्यांपुढे वा वाचकांपुढे उभे राहाते किंवा काही ठिकाणी अशा एखाद्या समर्थक व्यक्तिगत आठवणीचा ओझरता उल्लेख यशवंतराव करतात आणि तेवढ्यामुळे त्या व्यक्तीमत्त्वाचे आगळेपण अधोरेखित होऊन जाते.
राधाकृष्णन् यांच्याबद्दल लिहिताना वॉशिंग्टनमध्ये भेटलेल्या एका साठपासष्टवर्षीय वृद्धाची आठवण यशवंतरावांनी सांगितली आहे. 'राधाकृष्णन् यांच्या कधीतरी ऐकलेल्या भाषणावरून कधीही न पाहिलेल्या गंगेचा ओघ कसा असेल, याची कल्पना आली होती', असे एक वाक्य उच्चारून तो म्हातारा निघून गेला होता. (कित्ता, १४२).
लालबहादूर शास्त्री एखादे काम एखाद्यावर सोपवल्यानंतर त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकीत, त्याला हवे ते अधिकार देत. या त्यांच्या उमदेपणामुळे व मोकळेपणामुळे कामाला हुरूप येत असल्याचे सांगून यशवंतराव लिहितात,
''(त्यामुळे) माझ्यासारख्या दरबारी वृत्ती नसलेल्या माणसालाही काम करणे सोयीचे होई.'' (कित्ता, १५९).
शाहू महाराजांविषयीच्या लेखात, गोविंदराव टेंब्यांना 'शिवसंभव' नाटकाच्या वेळी आपल्या जवाहरखान्यातले खास शाही दागिने वापरण्यासाठी शाहूंनी दिले होते, आणि ते नाटक बघताना त्यात जेव्हा शिवजन्माचा प्रसंग येतो. तेव्हा ''शाहू महाराज भर नाट्यगृहात आपल्या आसनावरून उभे राहिले आणि त्यांनी नाटकातल्या शिवाजी महाराजांना लवून मुजरा केला.'' (कित्ता १७३) अशा शेलक्या आठवणी यशवंतरावांनी सांगितल्या आहेत.
विठ्ठल रामजी शिंद्यांना आपल्या गावी आणल्याची लहानपणची आठवण तर त्यांनी अनेक संदर्भात पुनःपुन्हा सांगितली आहे. हजार शब्दांमधूनही व्यक्त होणार नाही, असे या व्यक्तिमत्त्वाचे महात्म्य या छोट्या-छोट्या आठवणींतून मांडण्याचे कसब साहित्यिक यशवंतरावांना उत्तम साधले होते.
एकेका मिताक्षरी वाक्यात संबंधित व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्व उजळून काढण्याची त्यांची हातोटीही अशीच लक्षणीय होती.
''पुण्याच्या बुद्धिवैभवाचे प्रतीक आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचे आधारस्तंभ'' असे तात्यासाहेब केळकरांचे वर्णन त्यांनी केले आहे (कित्ता, २३५).