सूक्ष्म अनुभवग्रहण व प्रभावी आविष्करण
अनुभवग्रहणाची व आविष्करणाची यशवंतरावांची शैलीही सव्यसाची व संवेदनक्षम साहित्यिकाला साजेशीच होती. जतींद्राने तुरुंगात उपोषण करून आत्मार्पण केल्याची बातमी वाचून तरुण यशवंतरावांची जी मनःस्थिती झाली होती, तिचे पुढील वर्णन अत्यंत प्रत्ययकारी उतरले आहे.
''देहाचे व्यापार सुरू होते, परंतु मनाचे व्यवहार उधळले होते. परमदुःखाच्या खोल गर्तेत मी कुठे तरी पडलो आहे, असे स्पंदन मनात कुठे तरी चालू होते.... बधिर झालेल्या मनाने मी तसाच चालायला लागलो आणि चालता चालता रडायलाही लागलो.... गावातील घरे ओलांडून मी पुढे चाललो होतो, मी निर्मनुष्य घरे मला भयाण वाटली. सायंकाळी नदी ओलांडून जाताना नेहमी घरट्याकडे परतताना भेटणारे पक्ष्यांचे थवे मला त्या दिवशी आढळले नाहीत. रानात भिरभिरणारा वारा सुस्तावला होता. झाडेझुडपे स्तब्ध झाली होती. सारे वातावरण कुंद बनले होते. माझ्या मनाचे प्रतिबिंब मला जणू चराचरात दिसते होते.'' (ॠणानुबंध, १५).
त्या अंधा-या रात्रभर उपाशी पोटाने यशवंतराव अनिमिष नेत्रांनी तारकापुंजात जतींद्राचा शोध घेत जागे राहिले होते.
सावरकरांच्या कवितेवर लुब्ध असण्याच्या काळात सावरकरांना प्रत्यक्ष भेटता आले याचा किती उत्कट आनंद आपल्याला झाला होता, याचे जवळपास पन्नास वर्षांनंतर तितकेच सविस्तर तपशीलांसह वर्णन यशवंतरावांनी केले आहे. समुद्र आणि सावरकर या दोहोंबद्दल कमालीचे आकर्षण असणा-या यशवंतरावांना एकाच यात्रेत या दोहोंना भेटता आले, याचा त्यांना झालेला आनंद अनिर्वचनीय होता. ते लिहितात, समुद्र नजरेच्या टप्प्यात येताच-
''मन हरखून गेले, प्रसन्न झाले. त्याचा केवढा अवाढव्य विस्तार होता ! सकाळच्या प्रहरी शांत वातावरणात समुद्र पाहिला. त्यामुळे त्याचे विशाल रूप कार्तिक - मार्गशीर्ष महिन्यात दिसणा-या निळ्याभोर आकाशासारखे वाटले. किती तरी वेळ मी आणि राघूअण्णा तेथे सागरतीरी बसून होतो. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. लाटांची धीरगंभीर गाज वातावरणात भरून राहिली होती. समुद्रावरून नजर काढावीशी वाटत नव्हती.'' ('कृष्णाकाठ', ८७).
सावरकरांशी झालेला संवाद शब्दशः लिहून काढल्यानंतर ते म्हणतात,
''सागर आणि सावरकर हे रत्नागिरीत एकाच वेळी पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे रत्नागिरीची माझी आठवण ह्या भेटीशी कायमची संलग्न झाली आहे. (कित्ता, ८९).