यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ९४

समरसून हा प्रसंग सांगून चव्हाण लिहितात,

''मी पितृवंचित आहे.  लहानपणीच वडील वारले, पण या वयातही आपल्याला खाऊ द्यायला कुणीतरी आहे, या भावनेने माझे मन भरून आले.  माझे अश्रू मी थांबवू शकलो नाही.'' (कित्ता).

पत्नीच्या संदर्भात यशवंतरावांनी फारच त्रोटक लिहिले असले तरी त्यांच्या मनातले खूप काही त्यांचे ते शब्द व्यक्त करून जातात.  यशवंतरावांच्या व्यस्त सार्वजनिक जीवनात काहीसे दुर्लक्षित जीवन वाट्याला आलेल्या वेणूताईंचे व्यक्तिमत्त्व किती परिपक्व आणि उदात्त होते, हे यशवंतरावांनी अक्षरशः चार-दोन वाक्यांत सांगितले आहे.  लग्न झाल्यावर अल्पावधीतच भूमिगत जीवनाची ससेहोलपट यशवंतरावांच्या मागे लागली आणि सुखवस्तू घरातून आलेल्या वेणूताईंना करावासाचे खडतर जीवन काही काळ कंठावे लागले आणि नंतरही त्या खडतरपणाने केलेला आरोग्याचा चोळामोळा त्यांना जन्मभर पुरला.  त्यामुळे वेणूताईंविषयी बोलताना यशवंतरावांचा सूर हळवा व अपराधी होतो.  ते लिहितात,

''नव्या संसाराची स्वप्ने रंगवण्याच्या वयात तिला तुरुंगाची हवा चाखावी लागली.  तीही तिने माझ्याशी लग्न केले, या एकाच अपराधाबद्दल !  मला जास्त वाईट वाटले, ते तिच्या लग्नानंतरच्या पहिल्याच कौतुकाच्या संक्रांतीवर तुरुंगाची संक्रांत आली, म्हणून.  पण तिने ह्या निराशेचा कडवटपणा कधीही जिभेवर येऊ दिला नाही.'' (ॠणानुबंध ६७).

१९९३ साली वेणूताई गंभीर आजारी होत्या.  भूमिगत यशवंतरावांना ते कळले आणि त्यांच्या मनाची जी घालमेल झाली, ती ते पुढील शब्दांत व्यक्त करतात :

''लग्न झाल्यापासून तिला सुखाचे दिवस असे दिसलेच नव्हते.  सतत मनस्ताप आणि काळजी.  तिच्या संसाराची सुरुवातच अशी दुःखमय झालेली, त्यात तुरुंगवासाचा त्रास, माझ्या मोठ्या बंधूंचा मृत्यू, माझे मलाच अपराध्यासारखे वाटू लागले.'' (कित्ता, ७१).

पण अशा काही उदास मूडस् बरोबरच  पत्नीच्या संदर्भात त्यांनी लिहिलेला एखादा प्रसंग पुढीलप्रमाणे दिलखुलासपणे थुईथुई कारंजेही उडवून जातो.  

१९४६ या निवडणुकीच्या यशानंतर मी माझ्या आईच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला.  त्यानंतर अनेक महिलांनी येऊन मला ओवाळले.  माझी पत्नी सौ. वेणूबाई हिनेही येऊन मला ओवाळले.  तेव्हा माझे डोळे पाणावले.  मी तिलाच ऐकू जाईल असे सांगितले,

'वेणूबाई या यशात तुझाही वाटा आहे.'

''ती किंचित हसली आणि म्हणाली, 'अशी वाटणी करायची नसते.' '' ('कृष्णाकाठ' ३०९).