यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ८९

यशवंतरावांना या प्रकारचा अनुभव येणार हे सरकारी वर्तुळातही अपेक्षित होते. त्यांच्या आधी कृष्णम्माचारी यांची अमेरिकेची भेट निष्फळ झाली होती. रशियाकडून मिग विमाने भारताने घेणे अमेरिकेला पसंत पडले नव्हते. भारतासारख्या गरीब देशास अशी आधुनिक विमाने कशाला हवीत व कशी परवडतील, असा अमेरिकन आधिका-यांचा प्रश्न होता. कृष्णम्माचारी व यशवंतराव यांच्या भेटीपूर्वी चीनच्या आक्रमणानंतर कुन्ही कृष्णन अमेरिकेस गेले असता, बी. के. नेहरू यांनी फिलिप टाल्बट यांच्याशी त्यांची भेट घालून दिली होती. टाल्बट हे तेव्हा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात उपपरराष्ट्रमंत्री होते. पत्रकार म्हणून ते भारताशी परिचित होते. कुन्ही कृष्णन यांना ते म्हणाले की, तुमचे जवाहरलाल नेहरू हे हळूहळू मादाम चँग कै शेक होऊ लागले आहेत. नेहरूंची लोकप्रियता झपाट्याने घसरत असून अमेरिकन सरकार त्यांना मोठे नेते मानेनासे झाले आहे. (चव्हाण अँड द ट्रबल्ड डिकेड, पृ. १०८.) या टाल्बट यांच्यासारख्या अधिका-यांची परंपराच चालू राहिल्यामुळे, भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांबाबतचे अमेरिकन सरकारांचे मूल्यमापन अनेकदा चुकत गेले.

जॉन्सन यांच्याबरोबर २८ तारखेला भेट होण्याच्या आदल्या दिवशीच्या पहाटेस, पंडित जवाहरलाल नेहरूंचे निधन झाल्याची बातमी यशवंतरावांना दिल्लीहून कळवण्यात आली. यशवंतरावांनी त्यांचे सचिव राम प्रधान यांना बोलावले. हे दु:खद वृत्त सांगत असताना यशवंतरावांना अश्रू आवरत नव्हते. नेहरू हे आपल्या पक्षाचे नेते व देशाचे पंतप्रधान एवढीच यशवंतरावांची भावना नव्हती. सर्व देशाचे एकमेव नेते असे नेहरूंचे स्थान होते. शिवाय यशवंतरावांप्रमाणे देशातल्या लक्षावधी तरुणांची वैचारिक घडण नेहरुंचे जीवन, व्यक्तित्व आणि लिखाण यांच्यामुळे घडली होती. यामुळे केवळ देशाच्याच नव्हे, तर स्वत:च्या जीवनातले एक महत्त्वाचे पर्व संपले याची दुखद जाणीव नेहरूंच्या निधनामुळे झाली. अमेरिकन सरकारकडे नेहरूंच्या निधनाचे वृत्त आलेच होते. तेव्हा मॅक्नामारा यांनी अमेरिकन हवाई दलाच्या खास विमानाची व्यवस्था केल्याचे कळवले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री डीन रस्क, राजदूत चेस्टर बौल्स, बी. के. नेहरू हे यशवंतरावांच्या बरोबर दिल्लीस जाण्यास निघाले. विमानाच्या प्रवासात यापुढे भारताचे राजकारण कोणती दिशा घेणार, नेहरूंनंतर कोण पंतप्रधान होईल, इत्यादीबाबत चर्चा होणे अपरिहार्य होते. वास्तविक नेहरूंनंतर कोण? या प्रश्नाची चर्चा इंग्लंड, अमेरिका इत्यादी देशांतली वृत्तपत्रे या आधी तीनचार वर्षे उघडपणे करू लागली होती. भारतात उघड चर्चा झाली नाही, तरी अनेक वर्तुळांत ती होतच असे. हॅन्गन यांच्या आफ्टर नेहरू हू? या पुस्तकात लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी इत्यादींच्या बरोबर यशवंतरावांचेही नाव होते. लेखकाने म्हटले होते की, पंतप्रधान होण्यासाठी लागणारे गुण यशवंतरावांपाशी आहेत. केंद्र सरकारात त्यांना दोनतीन वर्षे काम केल्यावर त्यांची यासंबंधीची योग्यता अधिकच वाढेल.

अमेरिकेहून परतताना याच विषयावर कोणत्या प्रकारची बोलणी रस्क, बोल्स, बी. के. नेहरू यांच्यासमवेत झाली, याची माहिती यशवंतरावांनी जयंत लेले यांना दिली. ते म्हणाले, नेहरूंचा राजकीय वारस निवडताना काँग्रेसचे नेते एकोपा ठेवतील यात काहीच शंका नाही, असे आपण विश्वासपूर्वक सांगितले. इंदिरा गांधी पंतप्रधानपदावर येतील काय, हा प्रश्न निघाला तेव्हा यशवंतराव म्हणाले की, आपल्याला ती शक्यता वाटत नाही. नेहरूंच्या निधनानंतर लगेच पंतप्रधानपद त्या स्वतःच घेणार नाहीत व ते बरेही दिसणार नाही. मतदान वगैरे न घेता पंतप्रधानाची निवड करणे श्रेयस्कर असून, एकोपा पाळणे हे काँग्रेसच्या व देशाच्या हिताचे ठरेल व तसेच होईल. पुढे लालबहादूर शास्त्री यांची निवड याच रीतीने झाली.

ही निवड करण्याच्या कामी काँग्रेसचे अध्यक्ष कामराज यांनी प्रमुख भूमिका बजावली. मोरारजीभाईंना त्यांचा विरोध होता. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात अतुल्य घोष, स. का. पाटील इत्यादी होते. त्यांचे मत कामराज यांच्यासारखेच होते. यामुळे मतदान न घेता पंतप्रधानपदाचा वारस निवडायचा प्रस्ताव मान्य झाला. तो आपल्याला डावलण्यासाठी असल्याचे मोरारजींनी ओळखले; पण त्यांनी काही खळखळ केली नाही. लालबहादूर शास्त्री यांना उत्तरप्रदेशच्या काँग्रेस खासदारांचा पाठिंबा होता. शिवाय त्यांनी कामराज यांच्याशीही संबंध प्रस्थापित केले होते. मग लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. ती होण्यापूर्वी शास्त्री यांनी इंदिरा गांधींना हे पद घेण्याबद्दल विचारले होते, तेव्हा त्यांनी नकार दिला. मंत्रिमंडळात ज्येष्ठताक्रमाने नंदा यांचा दुसरा क्रम लावला होता. मोरारजीभाईंना आपल्याला ते पद मिळावे असे वाटत होते. पण नंदांना बाजूस करण्यास शास्त्री तयार नसल्यामुळे मोरारजींचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. यशवंतरावांकडे संरक्षणमंत्रिपद राहिले. इंदिरा गांधी या मंत्रिमंडळात माहिती व आकाशवाणी खात्याच्या मंत्री म्हणून नेमल्या गेल्या होत्या. काहीही करून त्यांचा आपल्या मंत्रिमंडळाशी संबंध हवा, अशी शास्त्री यांची भूमिका होती.