यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ८७

चीनशी झालेल्या युद्धात भारतीय सैन्यास माघार घ्यावी लागली होती. याची चौकशी करण्यासाठी हेन्डरसन-ब्रुक्स यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. तिचा आहवाल आला होता आणि तो संपूर्ण स्वरूपात प्रसिद्ध न करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. अहवाल आल्यावर यशवंतरावांनी तो बारकाईने वाचून, त्यातील मुख्य मुद्दे ग्रथित होतील अशा रीतीने त्याची संक्षिप्त आवृत्ती तयार केली. नेहरूंनी आहवाल व ही आवृत्ती वाचली आणि आवृत्तीत थोड्या सुधारणा केल्या, पण बाकीचे टिपण चांगले असल्याचे सांगितले. या अहवालात चिनी युद्धाच्या काळांत राजकीय नेतृत्वाच्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मतप्रदर्शन असू शकेल. त्या युद्धाला आता चार दशके होऊन गेल्यानंतरही तो पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध झालेला नाही. अशा या अहवालावर सविस्तर चर्चा घडवून आणण्यास विरोधी पक्ष उत्सुक असला तर नवल नाही व चूकही नाही. पण राजकीय व इतर काही गोष्टी बाहेर येणे हे नेहरू व त्यांच्या मंत्रिमंडळास योग्य वाटले नसावे. तसे पाहिले तर पुढील काळात काँग्रेसेतर पक्षांच्या आघाड्यांची मंत्रिमंडळे केंद्रात अधिकारावर आली होती. पण त्यांनीही हा अहवाल प्रसिद्ध केला नाही. तेव्हा लष्करी दृष्ट्याही काही गोष्टी बाहेर येणे सोयीचे नव्हते की काय, असा प्रश्न पडतो.

राज्यसभेत हा अहवाल सादर केल्यानंतर २० सप्टेंबर १९६३ रोजी त्यावर चर्चा झाली आणि यशवंतरावांनी उत्तरादाखल भाषण केले. त्याचे सभासदांनी स्वागत केले. नंतर दुस-या दिवशी राष्ट्रपती भवनात एक-दोन मंत्र्यांचा शपथविधी होता. तो पार पडल्यानंतर राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यशवंतरावांपाशी आले आणि त्यांनी राज्यसभेतील भाषणाची तारीफ नेहरूंच्या समोरच केली. त्यानंतर लोकसभेतील चर्चेच्या वेळी आपण भाषण करावे काय? असे नेहरूंनी विचारले. यशवंतरावांनी नम्रपणे ते करू नये असे सांगितले, तुम्ही भाग घेतला तर तुमच्यावरच टीका होईल; तेव्हा तुम्ही ती कशाला ओढवून घेता? आम्ही आहोत. कृष्ण मेनन यांनी केलेल्या आपल्यावरील टीकेला उत्तर द्यावे काय, हा नेहरूंचा दुसरा प्रश्न होता. त्यामुळे तर मोठेच वादळ उठेल असे यशवंतरावांनी सांगितले व प्रश्न इथेच संपला. ही माहिती राम प्रधान यांनी त्यांच्या वर उल्लेखिलेल्या पुस्तकात दिली आहे.

हेन्डरसन-ब्रुक्स समितीच्या अहवालावरील चर्चेत नाथ पै, फ्रॅन्क अॅन्थनी, इत्यादींची अभ्यासपूर्ण वक्तृत्वपूर्ण भाषणे झाली. दोघांनीही चीनच्या आक्रमणाच्या वेळी भारत तयारीत नव्हता, हे सरकारच्या अहवालाच्या आधारे सिद्ध होत असल्याचे दाखवून दिले. त्या वातावरणात सरकारची बाजू मांडणे सोपे नव्हते. विरोधकांचा रोख या माघारीच्या बाबातीत दोषी कोण, हे स्पष्ट व्हावे या मागणीवर होता. यशवंतरावांनी सांगितले की, चौकशीचा हेतू आपल्या संरक्षणसिद्धतेत कोणत्या उणिवा आहेत ते शोधून काढून त्यांवर उपाय करणे हा होता. कोण दोषी यावर लक्ष केंद्रित केल्यास हा मूळ हेतू बाजूला पडेल. चीन वरचढ ठरण्याची मुख्यत: तीन कारणे होती. एक म्हणजे चीनचे लष्करी प्राबल्य. गेल्या तीस वर्षे तो सैन्य तयार करत व वाढवत आला आहे. दुसरे कारण, त्याला भौगोलिक परिस्थिती अनुकूल होती. तिसरे कारण म्हणजे हुकूमशाही देश, लोकशाही देशापेक्षा अशा संघर्षाच्या पहिल्या अवस्थेत नेहमीच विजय मिळवत असल्याची उदाहरणे घडली आहेत. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी शत्रूला घालवून देण्याचा आदेश दिला याबद्दल टीका झाली होती. यशवंतरावांनी तिला उत्तर देताना सांगितले की, राजकीय नेतृत्वाने याच प्रकारचा आदेश द्यावा हे अपेक्षित होते. नाहीतर चिनी सैन्याचे स्वागत करायचे होते काय? पण आदेश दिल्यानंतर केव्हा व कोठे प्रतिकार कारायचा हा लष्करी कक्षेतला भाग झाला. एकदा लष्कराला आदेश दिल्यानंतर राजकीय नेत्यांनी लढाईच्या कामात कसलाही हस्तक्षेप केला नाही. बी. एम. कौल यांच्यावर टीका झाली खरी, पण वालँग भागात त्यांनी चांगली लढाई दिली, हेही लक्षात घेतले पाहिजे. यशवंतरावांचे भाषण सभागृहाने चांगल्या रीतीने ऐकून घेतलं. किंबहुना, या भाषणानंतर यशवंतरावांनी विरोधाची धार कमी करण्यात यश मिळवले आणि आत्मविश्वासही मिळवला.

इतक्या दिवसांच्या अभ्यासानंतर संरक्षणसिद्धतेच्या बाबातीत काय उणिवा राहिल्या, याची यशवंतरावांना चांगली कल्पना आली होती. संरक्षणसाहित्याच्या उत्पादनात कमतरता होती आणि त्यासंबंधी खरी माहिती सरकारला दिली जात नव्हती. मेनन यांनी खात्यातील वातावरण दूषित केल्यामुळे नीतिधैर्य नष्ट झाले होते आणि म्हणून अनेक दृष्टीने खात्याची पुनर्रचना निकडीची झाली होती. संरक्षण खात्याचा कारभार हाती आल्यावर यशवंतरावांनी यालाच प्राधान्य दिले. कृष्ण मेनन यांना संरक्षणसाहित्य खरेदी करण्यासाठी अर्थमंत्री या नात्याने मोरारजीभाई देसाई वेळेवर व पुरेसे आर्थिक साहाय्य देत नव्हते, विशेषत: परकी चलनाचा पुरवठा पुरेसा नव्हता. अनेक डाव्या प्रवृत्तीच्या लोकांनी हा मुद्दा मांडून मोरारजीभाईंवर टीका केली होती पण संरक्षण खात्याच्या फायली पाहिल्यावर यशवंतरावांना असे काही आढळले नाही. उलट मेननच अनेकदा मंत्रिमंडळापुढे आपल्या मागण्या मांडत नसत किंवा त्याकरता विलंब लावत असे दिसले. कलकत्त्याजवळच्या इशापूर इथल्या संरक्षणसाहित्याच्या कारखान्यात स्वयंचलित बंदूक तयार करण्याचे प्रयोग होत होते. पण काही लष्करी अधिकारी बेल्जियम कंपनीच्या बंदुका आयात करण्याचा आग्रह धरत होते. मग राम प्रधान यांनी इशापूर कारखान्यास भेट देऊन अधिका-यांशी चर्चा केली. नंतर कॅबिनेट सेक्रेटरीने सर्व पुरावा तपासावा असे ठरले. त्याने इशापूरमध्ये उत्पादन करण्याची योजना योग्य असल्याची शिफारस केल्यावर यशवंतरावांनी ती योजना मंजूर केली. मेनन यांना हे करता आले असते. २२ नोव्हेंबर १९६३ हा भारतास एक काळा दिवस ठरला. त्या दिवशी जनरल दौलत सिंग, जनरल विक्रम सिंग, जनरल नानावटी व हवाई दलाचे एअर व्हाइस मार्शल पिंटो यांचे हेलिकॉप्टर पूंच भागात कोसळून सर्व ठार झाले. जनरल चौधरी यांनी ही बातमी यशवंतरावांना फोनवरून दिली. वास्तविक एकाच विमानातून इतक्या सेनाधिका-यांनी प्रवास करण्यास मनाई होती. पण या अधिका-यांनी ती मोडली आणि ही दुर्घटना घडली. पिंटो यांना यशवंतराव मुंबईपासून आळखत होते. ही भयंकर बातमी यशवंतराव ऐकत असाताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत असल्याचे राम प्रधान यांनी नमूद केले आहे.