यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ८८

संरक्षणखात्यातील अनुभवावरून यशवंतरावांचे मत असे झाले की, आंतरराष्ट्रीय गुप्त माहिती काढण्याची यंत्रणाही सुधारण्याची आवश्यकता आहे. गृहखात्याकडून लष्करी बाबतीतील गुप्त माहितीचा विभाग संरक्षणखात्याकडे देणे युक्त असे त्यांना वाटले. त्यांनी तसा प्रस्ताव नेहरूंकडे पाठवला. नहरूंनी त्यांना सांगितले की, तत्त्वत: हा प्रस्ताव रास्त आहे. पण तसे करायचे तर गृहमंत्री लालाबहादूर शास्त्री यांची संमती घ्यावी लागेल. ती घेण्यासठी शास्त्री यांच्याशी बोलण्याची सूचना नेहरूंनी केली. पण शास्त्री यांना भेटून त्यांच्या खात्याचा विभाग काढून घेण्यासंबंधी चर्चा करणे, यशवंतरावांना अवघड वाटल्यामुळे हा प्रश्न अनिर्णित राहिला.

नंतर केंद्र आणि राज्यातील काँग्रेसच्या काही जेष्ठ मंत्र्यांनी आपल्या अधिकारपदाचा राजीनामा देऊन पक्षकार्य करण्यासाठी एक योजना नेहरूंनी संमत केली. कामराज तिचे जनक असल्यामुळे ‘कामराज योजना’ म्हणून ओळखली जाते. कामराज योजनेत इंदिरा गांधींचा हात होता काय, असे विचारल्यावर यशवंतराव म्हणाले, त्यांचा थोडाफार हात असावा. आपले व इंदिरा गांधींचे संबंध चांगले विश्वासाचे झाले होते. कामराज योजनेच्या दिवसांत त्या माझ्या घरी आल्या असता आम्ही बाहेर फे-या मारत होतो, तेव्हा त्यांनी मला विचारले की, तुम्ही गृहमंत्रीपद का घेत नाही? त्यावर मी उत्तर दिले की, मी महाराष्ट्रातून इथे आलो ते संरक्षणखाते घेण्यासाठी. तेव्हा ते बदलणे योग्य नाही. विशेष काही कारण घडले तर गोष्ट वेगळी. इतके बोलून मी विचारले की, पिताजींनी असा उल्लेख केला काय? त्यावर त्या म्हणाल्या, नाही. त्यांच्याशी बोलण्याआधी तुमचे मत काय आहे, हे आपल्याला कळले पाहिजे अशी पुस्ती त्यांनी जोडली. यशवंतरावांनी नंतर असेही सांगितले, की त्या वेळच्या एका बोलण्यात त्यांनी इंदिरा गांधींना सांगितले, की तुम्ही पंतप्रधान व्हायला हवे आणि त्यासाठी आतापासून तुम्ही तुमचे बस्तान बसवले पाहिजे व तुम्हाला पंतप्रधान व्हायचे असेल तर तुम्ही आपली मते बोलून दाखवण्याची आवश्यकता आहे. मात्र आपल्याला पंतप्रधान व्हायचे नाही, असे इंदिरा गांधी निक्षून म्हणाल्या.

चीनने आपले सैन्य उत्तर सीमेवरून काढून घेण्याचे जाहीर केल्यानंतर, संरक्षणसिद्धता वाढवण्याचे प्रयत्न कोणत्या दिशेने करायचे याबद्दल अभ्यास करण्यासाठी काही तज्ञ-समित्या नेमल्या होत्या. तसेच चिनी आक्रमणाच्या काळात अमेरिका व इंग्लंड यांचे संबंधित अधिकारी चर्चेसाठी दिल्लीला येऊन गेले होते. अमेरिकेचे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांचे लष्करी सल्लागार वॉल्टर रोस्टॉव व परराष्ट्रमंत्री डीन रस्क यांनी दिल्लीला भेट दिली. माउंटबॅटनही येऊन गेले. अमेरिका व इंग्लंड यांच्या सरकारांचा चिनी आक्रमणाच्या काळातला उत्साह कमी झाला होता. त्यांनी मग भारताची खरोखर गरज किती, चीनचे एकंदर धोरण काय राहील, भारतास मोठ्या प्रमाणावर लष्करी मदत दिल्यास चीनची पावले कशी पडतील आणि पाकिस्तानवर काय परिणाम होईल इत्यादी प्रश्न उपस्थित केले. यावरून अमेरिका व इंग्लंड यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मदत होण्याची अपेक्षा करण्यात अर्थ नाही असा निष्कर्ष यशवंतरावांनी काढला.

असे असले तरी जी मदत होईल ती घ्यावी असे मंत्रिमंडळाने ठरवले आणि मग यशवंतरावांनी १९६४ सालच्या ‘मे’मध्ये अमेरिकेला भेट दिली. वॉशिंग्टनला जाऊन पेन्टागॉनच्या अधिका-यांशी व विशेषत: संरक्षणमंत्री रॉबर्ट मॅक्नामारा याच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. वॉशिंग्टनमध्ये भारताचे राजदूत बी. के. नेहरू यांनीही वाटाघाटीत भाग घेतला होता. मॅक्नामारा यांनी अनेक प्रश्न विचारले. परंतु एकंदर रागरंग, भारतास एफ-१०४ अशी लढाऊ विमाने मिळणे अवघड आहे असा होता. ही विमाने खरेदी करण्याकरता अमेरिकन काँग्रेस पुरेसे आर्थिक साहाय्य मंजूर करणार नाही असे मॅक्नामारा यांनी सांगितले. यामुळे अत्यंत आधुनिक लष्करी साहित्य सामग्री देण्याची अमेरिकन सरकारची तयारी नसल्याचे स्पष्ट झाले. यशवंतराव यामुळे नाराज झाले आणि आपली ही नाराजी त्यांनी डीन रस्क यांच्य़ाशी बोलताना लपवून ठेवली नाही. भारताने आधुनिक सामग्री देण्याची विनंती केली असता ज्या रीतीने तिचा विचार झाला, त्यामुळे आपण निराश झालो असे ते म्हणाले. यानंतर अमेरिकेतील संरक्षण उत्पादनाचे काही कारखाने, लष्करी महाविद्यालये इत्यादी पाहण्यासाठी यशवंतराव गेले. २८ तारखेला त्यांची अध्यक्ष जॉन्सन यांच्याबरोबर भेट ठरली होती. भारतात परतल्यावर काही दिवसांनी कुन्ही कृष्णन यांनी त्यांची भेट घेतली तेव्हा अमेरिकन अधिका-यांना पाकिस्तानचीच विशेष काळजी असल्याचा आपला ग्रह झाल्याचे यशवंतराव म्हणाल्याची आठवण, कुन्ही कृष्णन यांनी दिली आहे.