यशवंतराव संरक्षणमंत्री होणार ही बातमी अधिकृतरीत्या प्रसारित झाल्याबरोबर सा-या महाराष्ट्रात आनंद व अभिमानाची लाट पसरली. यशवंतरावांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून अजून पाच वर्षे राहावे असे वाटत असतानाच त्यांची संरक्षणमंत्रिपदाची निवड झाली. मग त्यांनी राज्यात काही ठिकाणी भेटी दिल्या त्यांच्या स्वागताला पूर आला होता. विधानसभेत निरोपाची भाषणे सर्व पक्षांच्या नेत्यांनी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन-काळात आचार्य अत्रे यांनी यशवंतरावांवर टीकेचा भडिमार करताना कसलाही धरबंद ठेवला नव्हता. पण यशवंतराव संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला जात असल्याबद्दल विधानसभेत निरोपाचे भाषण करताना अत्रे म्हणाले : “नामदार यशवंतरावांच्या अंगात काही अलौकिक गुण आहेत- त्यांचा स्वभाव, त्यांचे वागणे, त्यांचे चालणे व त्यांचे बोलणे असे आहे की, त्यांचे शत्रुत्व करू इच्छिणा-या माणसालासुद्धा यशस्वीपणे फार काळ त्यांचे शत्रुत्व करणे शक्य होत नाही, असे मी माझ्या अनुभवावरून सांगतो! नामदार यशवंतराव हे शंभर टक्के मराठी माणूस आहेत. कराडला बोलताना ते म्हणाले की, मला जर यश मिळाले नाही तर मी आत्मसमर्पण करीन! यातच मराठी माणसाचे मन, त्याचा स्वाभिमान आणि त्याच्या मनगटातील कणखरपणा हा दिसून येत आहे. त्यांच्यासारखा शंभर टक्के स्वाभिमानी माणूस आज (संरक्षणमंत्री म्हणून) दिल्लीच्या दरबारात जात आहे- ते आपल्या नावाप्रमाणे काम यशस्वी करूनच जेव्हा महाराष्ट्रात परत येतील, तेव्हा तीन कोटी महाराष्ट्रीय जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही!” पुढे अत्रे यांनी आपले एक नाटक यशवंतरावांना अर्पण केले, आणि काही व्यक्तिगत प्रश्नांसंबंधीही ते यशवंतरावांशी चर्चा करत असत. नाशिकच्या लोकसभा मतदार संघातून यशवंतराव निवडणुकीसाठी उभे राहिले तेव्हा राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांनी आपला उमेदवार उभा न करून, यशवंतरावांना बिनविरोध निवडून दिले. त्यानंतरच्या नाशिकच्या सभेत बोलताना कुसुमाग्रज म्हणाले. भूगोलात कृष्णा व गोदावरीचा संगम झाला नसला तरी तो आज झाला आहे.
मुंबई सोडण्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन मारोतराव कन्नमवार यांची मुख्यमंत्री म्हणून एकमताने निवड झाली. या रीतीने सर्व महाराष्ट्राच्या सद्भावना पाठीशी घेऊन यशवंतराव २० नोव्हेंबरला संध्याकाळी दिल्लीत पोचले. गेल्या गेल्याच आपल्यापुढे अडचणी उभ्या राहणार याची त्यांना थोडी कल्पना होती. बिजू पटनाईक व कृष्णम्माचारी हे दोघेही संरक्षणमंत्री होण्यासाठी अधीर असल्याची कल्पना नेहरूंनीच त्यांना दिली होती. पण दिल्लीत पाऊल ठेवल्यापासून या दोघांच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल असे वाटले नव्हते. २० तारखेच्या रात्री दहाच्या सुमारास बिजू पटनाईक त्यांना भेटायला आले. पटनाईक यशवंतरावांना म्हणाले, ‘तुम्ही भारताच्या संरक्षणासाठी दिल्लीत कशासाठी आलात? तुम्हांला देशाचे रक्षण करायचे असेल तर ते मुंबईतून करता येईल, कारण दोनतीन दिवसांत चिनी सैन्य मुंबईपर्यंत येईल. यावर यशवंतरावांनी उत्तर दिले की, आपण सेनापतीच्या आज्ञा मानतो व सेनापतीने मला दिल्लीत येण्याची आज्ञा केली आहे. पटनाईक यांचा पुढचा प्रश्न असा, की तुमची काय योजना आहे? यशवंतराव म्हणाले की, आपल्याला खात्याची सूत्रे घेऊ द्या, मग योजना ठरवता येईल. ही कठीण परिस्थिती कशी हाताळणार? हा आणखी एक प्रश्न. यशवंतरावांनी उत्तर दिले, की आपण लष्करी माणूस नाही. आपल्याला या विषयाची माहिती नाही; पण परमेश्वरकृपेने आपण काहीतरी करून दाखवू. यानंतरही पटनाईक तासभर बोलत होते. ते बोलणे भाषणवजा होते. शेवटी जाताना ते म्हणाले, आपण तुमचे मित्र आहोत आणि तुम्हांला यश चिंतितो. मग रात्री दोनच्या सुमारास पी. टी. आय. च्या वार्ताहराचा फोन आला. तो म्हणाला, एक चांगली बातमी आहे. चीनने स्वतःहून आपले सैन्य सीमेवरून काढून घेण्याचे जाहीर केले आहे. हा एक नाट्यमय क्षण होता. दुस-या दिवशी सकाळी यशवंतराव शपथविधीसाठी राष्ट्रपतीभवनावर गेले. तिथे नेहरूंनी तुम्ही काही शुभदायक घेऊन आला आहात असे म्हणून स्वागत केले. नेपोलियन विचारत असे की, सेनाधिकारी नशीबवान आहे काय? नेहरूंना कदाचित याचे स्मरण झाले असावे. शपथ घेतल्यावर नेहरू स्वतः संरक्षणखात्याच्या मुख्य कार्यालयात यशवंतरावांना घेऊन गेले. तिथे नेहरूंनी त्यांना पुन्हा शुभेच्छा दिल्या आणि अर्ध्या तासात लोकसभेत येण्यास सांगितले. यशवंतरावांना घेऊन नेहरूंनी लोकसभेच्या सभागृहात प्रवेश केला तेव्हा सर्वांनी उत्स्फूर्त स्वागत केले. दिल्लीला संरक्षणमंत्री म्हणून जाण्यापूर्वी यशवंतरावांची पुण्यात सत्काराची सभा झाली. त्या वेळी ‘प्रावदा’मध्ये रशियन सरकारचे मत व्यक्त करणारा लेख आला होता. त्यात चीन हा आपला भाऊ आहे तर भारत हा मित्र, असे विधान होते. यशवंतरावांनी या विधानासंबंधात लेले यांना अशी माहिती दिली की, आपल्याला या विधानाचा राग आला. अखेरीस एकाच विचारसरणीमुळे रशियनांचे हे मत बनले असेल, पण हा लाल नेपोलियनवाद झाला. (लाल नेपोलियनवाद हा रॉय यांनी पूर्वी वापरलेला शब्द आहे.) आपण इतरही टीका केल्याचे सांगून यशवंतराव म्हणाले की, आपल्या भाषणाचा वृत्तान्त दिल्लीच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध होऊन तो नेहरूंच्या पाहण्यात आला. नेहरूंनी याबद्दल यशवंतरावांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. उत्तरादाखल यशवंतरावांनी सांगितले की, रशियनांशी आपण चांगले संबंध ठेवले पाहिजेत हे आपल्याला पटते, पण या टीकेमुळे आपल्यातला राष्ट्रवादी जागा झाला. नेहरू म्हणाले, तुमच्या भावना समजण्यासारख्या आहेत. पण तुम्ही संरक्षणमंत्री आहांत. या प्रकारची राजकीय वक्तव्ये करणे उचित नाही. हे अर्थात तिथेच संपले.