पिकासो हा तर लोकविलक्षण कलाकार. अत्यंत वादळी. चांगला नव्वद वर्षे जगला. तब्येतीने अत्यंत धडधाकट. उमेदवारीच्या काळातली दारिद्र्याची काही वर्षे सोडली तर एरवी त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. नावलौकीक आणि अफाट प्रसिद्धी होती. तो जिवंतपणीच एक मोठी दंतकथा होता. त्याच्याबद्दल जेवढे लिहिले गेले तेवढे क्वचितच कुणाबद्दल लिहिले गेले हे असेल. त्याची प्रेमप्रकरणे, बायका, मैत्रिणी, याबद्दल खूपच लिहिले गेले हे खरे. तो काही भणंग, उपाशी, व्यसनी, उपेक्षित, वाळीत टाकलेला असा नव्हता. तो ज्या हॉटेलमध्ये बसून त्याच्या मॉडर्न आर्ट करीत असे त्या हॉटेलात जाऊन मी तो बसत असलेली जागा पाहून आलो आहे. पिकासो हा आमच्या काळतला- विसाव्या शतकातला - अतिशय महत्त्वाचा जगप्रसिद्ध चित्रकार होता. पिकासो म्हणजे संपूर्ण शतक आहे. गेल्या शतकाअखेरीचा इंप्रेसिनिझमने पॉप ऑप कलेबर्गत अनेक अनेक बदल तो पाहत होता. त्याने ते पाहिले त्यात स्वतः भाग घेतला. संपूर्ण विसावे शतक त्याने व्यापले. कलेच्या क्षेत्रातला एवढा दिग्गज माणूस. पिकासो म्हणजे विसाव्या शतकाचा विचार. कलेच्या क्षेत्रातच नव्हे तर इतरही क्षेत्रांत विशेषतः सामाजिक राजकीय उलथापालथीचा विचार. लक्ष्मण, तो कम्युनिस्ट होता, मार्क्सवादी होता, तोही त्या कालखंडातल्या राजकीय विचारांचा भाग होता. अत्यंत बंडशोर शैलीचा हा चित्रकार. प्रमाणित फूटपट्ट्या कशाच्याच त्याला वापरता येत नाहीत. पिकासोबद्दल खूप लिहिले गेले. माझ्या पिढीतल्या अनेकांना तो ठाऊकही नाही. माझ्याही सारे वाचनात नाही आले. त्याच्या दोन मैत्रिणंनी लिहिलेल्या आठवणी आहेत. परॉन्सवाज जिलो हिने कार्लटेन लेक ह्या अमेरिकन लेखकाच्या मदतीने लिहिलेले 'माय लाइफ विथ पिकासो' हे पुस्तक सनसनाटी म्हणता येईल असे आहे. त्यामुळे ते जगभर आणि आपल्याकडेही खूप वाचले गेले. मीही ते वाचले आहे. पण त्यात युरोपीय समाज न समजावून घेता चर्चा करणे व्यर्थ आहे. त्यासाठी त्या समाजाची एथिक्स समजावून घ्यायला हवीत. पिकासोच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पदर, अनेक कंगोरे आहेत हेही आपण समजावून घेतले पाहिजे. आंबटशौकीन लोकांनी त्याच्या चित्रांपेक्षा त्याचे खाजगी आयुष्य, त्याच्या बायका, मुले, सवयी, मित्रमैत्रिणी या बद्दलच खूप चर्चा केली लिहिले. पिकासो हा स्पेनमध्ये जन्मला. तो पक्का स्पॅनिश होता. डॉन जोझे म्हणजे पाब्लो पिकासोचे वडील. स्पेनमधल्या मालागा शहरात हे राहत असत.
साहेब, पण हे इंप्रेशनिझम म्हणजे काय ?
कसे बरे सांगावे, पण तुम्ही चळवळे आहात. इम्प्रेशनिझम म्हणजे अधुनिक चित्रकलेच्या इतिहासातली सर्वात महत्त्वाची चळवळ. समोर दिसणार्या दृश्याचा मनावर तात्काळ होणारा परिणाम, तात्काळ कागदावर वा कॅनव्हासवर उतरवणे. वस्तूच्या पृष्ठभागावरच्या छायाप्रकाशाच्या छटा आणि सावल्यांचे विश्लेषण करणे. स्टुडिओतून बाहेर पडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम करणे ही या चळवळीची काही वैशिष्ट्ये होती. त्याचबरोबर संपूर्णतः समकालीन दैनंदिन जीवनातले विषयही चित्रात आणले गेले. त्यातून पुढे अनेक चळवळींचा, विचारांचा आणि विविध शैलींचा उगम झाला. गेल्या शंभर वर्षांवर इम्प्रेशनिझमचा निर्विवाद प्रभाव होता. यातले महत्त्वाचे चित्रकार होते मोने, माने, इन्वा, झिझले, पिसारो, दगा, सेझॉन, बुंदे, मोरिसो.
साहेब एवढी परकी भाषेतली नावे तुम्ही कशी काय लक्षात ठेवता ? एकदा भेटलेला माणूस पुन्हा कितीही वर्षांनी भेटला तरी त्याला तुम्ही नावाने हाक मारता, हे कसे काय जमते ? म्हणजे नेमके काय केल्याने हे सारे लक्षात राहते ?
साहेब हसले. लक्ष्मण, हे आमचे सिक्रेट आहे. मनाच्या जडणघडणीतून होत असावे असे समजा. शेतकरी नाही का कितीतरी वाण न शिकताही लक्षात ठेवतो, तसेच. पाब्लो हा विलक्षण व्यक्तिमत्त्व लाभलेला कलंदर कलावंत होता. त्याला आपले नियम लावून उपयोग नव्हता, नाही. त्याच्या प्रेमांनी नेहमीच त्याच्यामधली निर्मितीची शक्ती जागृत ठेवली. कामजीवनाचा आनंद घेण्याची शक्ती आणि निर्मितीतली समृद्धी या गोष्टी त्याच्या बाबतीत हातात हात घालूनच येतं. त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीबरोबर त्याच्या प्रतिभेचा नवा बहर जगाने पाहिला. त्याच्या कामातल्या प्रत्येक महत्त्वाच्या कालखंडाला त्या त्या स्त्रीचे नाव द्यायला हवे. स्त्री ही त्याचे विचार आणि कलाकृतीच्या दृष्टीने आवश्यक असे तत्त्व होती. तो ग्राफिक्स तर फार उत्तम करीत असे.
साहेब, ग्राफिक्स म्हणजे काय ?