ही १९६७ साली निवडणूक होती. मालोजीराजे हे राजकारणातलं बडं प्रस्थ होतं. मोरारजीभाई देसाई आणि महाराजसाहेब यांचे फार चांगले संबंध होते. तरीही त्यांना पक्षाचं तिकीट मिळालं नाही. त्यानं शहरात वातावरण फारच तापलं होतं. सारं शहर महाराजांचं. क्वचितच कुणीतरी काँग्रेसचं काम करी. प्रचारकही मिळत नव्हते. फलटण खंडाळा मतदारसंघात खंडाळ्याचा ग्रामीण भाग आबासाहेब वीरांनी काँग्रेसमय केला होता. लढत मोठी अटीतटीची झाली. भोईटेसाहेब अगदी हजार-दोन हजार मतांनी निवडून आले. गावातली दंगल आजही माझ्या लक्षात आहे. आबासाहेब वीरांनी केलेलं भाषण फारच गाजलं होतं. राजांच्या विरोधी एवढी कडक भाषा त्यांनी वापरली होती, की त्यामुळे दंगल झाली. या सभेनंतर माझा फलटणशी फारसा संबंध राहिला नाही. राजकारणाचा तर कुतूहल म्हणूनही संबंध राहिला नाही.
अलीकडे मी भोईटे साहेबांना भेटलो. खूप छान बोलले. आता वयोमानानुसार थकलेत. आम्ही माध्यमिक शाळेत त्यांच्या शेजारी राहून शिकलो होतो. तेव्हाचे भोईटेसाहेब तरुण, तडफदार, देखणे. आता भेटायला गेलो तर ते सायंकाळचा फेरफटका मारायला विमानतळाकडे गेलेले. मी आल्याचं कळवायला त्यांचा मुलगा गेला. मी बसून होतो. ते तात्काळ मोटारसायकलवरून घरी आले. थकलेले, कृष्णकाया, आवाज मात्र होता तसाच. आम्हाला मोकळं वाटावं म्हणून अंगणातच खुर्च्या मांडल्या. दोघांचा जिव्हाळ्याचा विषय अर्थातच 'यशवंतराव'. अतिशय आनंदात होते. चव्हाणसाहेबांच्या आठवणी निघाल्या की, ते खुलतात. मोकळे होतात. पहिल्यांदा राजकारणात कसे आले, तिथपासून सांगू लागले. त्यातला बराच भाग मी आधीच तुला सांगितला आहे. त्यांनी सांगितलेला आता पुढचा भाग बघ-
''मी पंचायत समितीचा सभापती झालो. कायदा नव्यानं आलेला. ग्रामपंचायती लोकांनी निवडून दिलेल्या. स्वातंत्र्य गावाच्या दारात आलेले. अतिशय उत्साहानं निवडणुका झाल्या. गावचे पाटील, वतनदान, देसाई, देशपांडे, कुलकर्णी, सरंजामदार ही जुनी रचना मोडीत काढून चव्हाणसाहेबांनी नवीन लोकांकरवी, लोकांनी लोकांसाठी बहुमतानं निवडून दिलेली पंचायत निवडून आणली. गुप्त मतदानाचं मोठं कौतुक होतं. लोक आपल्या मर्जीनुसार शिक्का मारून लोकप्रतिनिधी निवडू लागले. तालुक्याचा कारभार पंचायत समिती बघू लागली, तर जिल्ह्याचा कारभार जिल्हापरिषद पाहू लागली. शिक्षण, आरोग्य, शेती या सर्व क्षेत्रांत वेगानं विकास सुरू झाला. मी कामाला सुरुवात करणार, त्याआधी साहेबांचे आशीर्वाद घ्यायला मुंबईला गेलो. सचिवालयात त्यांना भेटलो. ते म्हणाले, 'बसा थोडा वेळ. मग बरोबर जाऊ.' आम्ही दोघंच गाडीत होतो. 'कृष्णचंद्र, आता तुम्हाला माझे काम करावयाचं आहे. तालुक्यातला माणूस अन् माणूस जोडायला हवा. पण, आता माझ्याकडे येऊ नका. माझा फारसा उल्लेख करू नका. ते सारं मनात ठेवा. प्रत्येक कार्यक्रमाला राजेसाहेबांना बरोबर ठेवा. त्यांचा सन्मान करा. त्यांच्याच सल्ल्यानं काम करा. आपले लोक रागावतील. साहजिकच आहे ते.
ते माझ्यावर सोडा. मी समजावेन त्यांना. पाच वर्ष जीवतोड मेहनत करा. गावागावापर्यंत पोहोचा. हे करताना तुम्ही माझे आहात हे विसरून जा.' साहेबांना मी म्हणालो, 'साहेब, हे कसं शक्य आहे ?' ते म्हणाले, 'राजकारणात सारं जमवावं लागतं. सारंच काही मनासारखं होत नाही. तुम्ही लोकांमध्ये राहा. तक्रारी माझ्याकडेच येतील. मी सांगेन आपल्या लोकांना.' वडिलांनी मुलांना कानगोष्टी सांगाव्यात तसं त्यांनी सांगितलं. मी नाराजीनंच तयार झालो. फलटणला परत आलो. वसंतराव जानवले महाराजांचे जवळचे कार्यकर्ते. त्यांच्यामार्फत महाराज साहेबांशी सतत संपर्क ठेवला आणि साहेबांनी सांगितल्यानुसार कामाला लागलो. बघता बघता पाच वर्ष संपत आली. मी साहेबांना मुंबईला जाऊन भेटत होतो. साहेब दौर्यावर आले तरी फारशी घसट करत नव्हतो. आमचे लोक तक्रारी करत. पण, साहेबांनी मला कधीही काही त्यासंबंधी सांगितलं नाही. ६७ च्या निवडणुकांचे नगारे वाजू लागले. विधानसभेला तिकीट मागण्याचा प्रश्नच नव्हता. महाराजच उमेदवार असणार, हे गृहीत होतं. मी काही उभा राहणार नव्हतो. एकदा वर्षावर ताईंना भेटायला गेलो होतो. त्यांनी सांगितलं, 'विधानसभेला तिकिटाची मागणी कर. तुझं काम चांगलं आहे. बाकीचं मी पाहीन.' आता काय करावं ? मी काळजीतच परत आलो. त्यावेळी तिकिटं दिल्लीत ठरत नव्हती. स्थानिक लेव्हलला ती ठरत. तालुका काँग्रेस कमिटीनं शिफारस जिल्हा काँग्रेसकडे आणि तिथून शिफारस होऊन राज्याच्या काँग्रेसकडे. त्यावर तिकीट मिळे. आमच्याकडे तिकिटाचा प्रश्नच नव्हता. पाच मिनिटांचं काम, असं राजेसाहेबांना वाटले होते. ते साहजिकच होतं. कोण मागणार होतं तिकीट ? मीटिंग सुरू झाली नि मी तिकिटाची मागणी केली. बॉम्ब पडावा तसं झालं. सारेच समजावू लागले. पण, मी तिकीट मागितलंच. ताुलक्यातून दोन नावं गेली. जिल्ह्यातूनही दोन नावं गेली. आता मोठी धावपळ सुरू झाली. ताईंनी साहेबांना आग्रहानं सांगितले हों. 'काय वाट्टेल ते झालं तरी फलटणच्या तिकिटाचं कृष्णचंद्रलाच द्या. फलटणकरांना विश्रांती द्या. संस्थानिकांचे लाड बंद करा. शेतकरी कुटुंबांना न्याय द्या.' ताई कधी राजकारणात भाग घेत नसत. कुणाची शिफारस करत नसत. कशातही ढवळाढवळ करत नसत. पण फलटणबद्दल त्यांना आस्था होती.