यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ६-११०६२०१२-२

मिरवणूक सारी गावभर फिरली आन् बैलजोडीचा प्रचार करत गाडी तळावर म्हणजे बाजारतळावर आली.  लय खच्चून गर्दी जमलीती.  स्टेजवर मऊशार गाद्या घातल्यात्या.  पांढरीशुभ कापडी बिछाती घालून गाद्या सजवल्यात्या.  लोड-तक्के नीटनेटके लावले व्हते.  यशवंतराव, मालोजीराजे स्टेजवर गेले.  गावच्या पुढार्‍यांनी सार्‍यांना बैजवार बसवले.  हारतुरे झाले आणि स्टेजवर एकदम कालवा झाला.  भराभरा गाद्या उचकटल्या गेल्या सारी सभा बसलेली उठली.  गर्दी म्होरं म्होरं सरू लागली.  काय झालं ?  काय झालं ?  एकच कालवा उसळला.  माईकवरून खाली बसण्याच्या सूचना सुरू झाल्या.  कुणीतरी पायतानानं स्टेजवर गादीवर मारीत व्हता.  कुणलाच काही कळत नव्हतं.  'यशवंतरावास्नी विंचू चावला' कुणीतरी म्हणाला.  आन् बगता बगता कालवा थांबला.  ज्यो त्यो 'विंचू चावला, विंचू चावला' म्हणून लागला.  कुणी मांत्रिक गर्दीतनं स्टेजकडं पळू लागला.  आंगारा, धुपारा करणारे होते, तसे वैद्य हकीमही गर्दीतनं स्टेजकडे पळू लागले.  त्यानं पुन्हा कालवा झाला.  यशवंतराव शांतपणे उठले.  सारे उपचार नाकारले आणि माईक हाती घेतला.  तेवढ्यात एका माणसानं पानाचा विडा दिला, तो त्यांनी तोंडात घातला आणि जसं काही झालंच नाही, अशा थाटात यशवंतराव बोलू लागले.  सभा डोलू लागली.  हळूहळू सभा एवढी रंगली, की हास्य, विनोद, टाळ्या, कोपरखळ्या, चिमटे यांत सारे जणू काही विसरून गेले की, यशवंतरावांना विंचू चावला आहे !  विंचू चावला असेल, तर तुलाही समजेल काय यातना असतात.  मुंग्यांनी घाम फुटत असतो.  पण या माणसानं अख्खी सभा खिशात घातली.  सभा यशवंतरावांनी जिंकली, ते खाली बसले.  सभा संपली. प्रत्येकाच्या डोक्यात राहिले ते यशवंतराव.  विंचू चावला असताना स्थितप्रज्ञासारखं भाषण देणारे यशवंतराव.  त्यांचा धीरोदत्तपणा, त्यांची कणखरवृत्ती, कळा सोसण्याची अफाट शक्ती.  मी लहान होतो.  माझ्या लक्षात राहिलं ते भाषण नव्हे, ते माझं वय पण नव्हतं.  विंचू चवला तरी कळा सोशीत केलेलं त्यांचं भाषण, सोशिकपणा याचीच चर्चा सार्‍या तालुकाभर व्हती. तशाही स्थितीत तुकाराम, आत्माराम यांनी यशवंतरावांची केलेली नक्कल बघून गर्दीतले यशवंतराव जवळ आले.  हसले.  यशवंतरावांनी पाठीवर थाप मारली.  'वा गड्यांनो' म्हणाले आणि गाडीत बसले.  कोण कौतुक दोघांना !  खुद्द यशवंतरावांचा स्पर्श झाला.  स्वर्ग दोन बोटं उरला.  बिर्‍हाडावर हीच चर्चा व्हती.  सारी माणसं आनंदून गेलीती.

मी मोठा झालो.  त्यांच्याबरोबर गाडीतून त्यांच्यासोबत हिंडू लागलो.  एकदा मी त्यांना या सभेची आठवण सांगितली आणि विचारलं, 'साहेब विंचवाच्या कळा नव्हत्या का येत ?'  साहेबांनी माझं कौतुक केलं, लक्षात ठेवल्याबद्दल.  म्हणाले, 'अहो, तो विंचूच ना ?  विष तर चढतच होतं.  कळाही सुरू होत्या.  ठणका, उन्हाचा दणका, यातनांनी खूप बेजार.  पण, उन्हातान्हातनं आलेली माणसं.  त्यांचा केवढा विरस होणार ?  विंचवानं कोणी मरत नाही.  आणखी गंमत सांगतो, मी पोटात असताना देवराष्ट्रात आईला विंचू चावला होता.  त्यानं मला विंचू फारसा चढत नाही, असं आईनं सांगितलं होतं.'

'पण साहेब, तास-दीड तास भाषण कसं केलंत ?'

'अहो, त्याचं असं आहे.  विंचू त्याचं काम करीत होता.  मी माझं काम करत होतो.  सभा उधळली जाणं पक्षाला परवडणारं नव्हतं.  माणसं जशी उतरवणारी असतात, तशी चढवणारीही असतात.  राजकारणही असंच असतं ना ?  कुणी चढवणारे असतात, कुणी पाडणारे असतात.  आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे.'

यशवंतरावांच्या सहनशिलतेला सलाम !  खेड्यापाड्यातून आलेले शेतकरी हे खरं त्यांचं दैवत.  सभा संपल्यावर वैद्यांनी औषध दिलं.  तोपर्यंत तो विंचू उतरत होता. जनतेसाठी देहभानविसरून काम करणारा नेता.  आम्हा भिक्षा मागणारांतही किती पॉप्युलर होता.  नाहीतर आताचं राजकारण आन् पुढारी !  सारा आनंद आहे !!

ती. बाबांना आणि सौ. वहिनींना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका