यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ५-१८०२२०१२-१

पुरात वाहत येणारी मोठमोठी झाडं, लाकडं, सारं दावी धरून आम्ही बाहेर काढत असू.  अशी जमलेली लाकडं शिमग्याच्या होळीसाठी देवळाम्होरं साठवून ठेवत असायचो.  पण कुणी माणूस आजारी पडला, बायांची बाळंतपणात अडचण झाली तर गाव बंद असायचा.  फलटणला जाता यायचं नाही.  गाव ओढे पुरांनी वेढलेलं.  बारामतीला जाता यायचं नाही, नदी आडवी.  नावाडी सांगवीला, बोलावणार कसं ?  नाव अलिकडं असली तिच्या नशिबानं तर जीव वाचणार, नाहीतर बाळ, बाळंतिनीला मुठमाती द्यावी लागायची.

अशी बेटाबेटांमध्ये अडकलेली गावं, पुरानं वेढलेली गावं, माणसं.  दळणवळणाची कोणतीच सोय असलेला काळ तो.  सर्व्हिस मोटारी होत्या पण ओढ्यांना, नदीला पूर आला म्हंजे काय करणार, मोटार तरी ?  व्यापार नव्हताच म्हटलं तरी चालेल.  एकाददुसरं किराणामालाचं गावात दुकान.  तेही गुजरातवरनं आलेलया गुजराती माणसाचं.  त्यात जे काही मिळेल ते वाणसामान.  काडेपेटी, चहापत्ती, साखर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हंजे रॉकेल.  रॉकेलवरनं लक्षात आलं म्हणून सांगतो, गावं सारी अंधारात बुडालेली.  तिन्ही सांजा झाल्या की दिवा लावायचा.  ज्याची बरी ऐपत त्याच्या घरी काचेचे कंदील.  गोरगरीब माणसांकडे चिमण्या.  चिमणी म्हणजे त्रिकोणी आकाराची पत्र्याची बुदली.  तिला वात घालायला रॉकूल ओतायला टोपण असायचं.  टोपणाला एक भोक असायचं.  त्या भोकातून कापडाची चिंधी सरकवायची.  ती रॉकेलमध्ये भिजवायची आणि चिमणी रॉकेलनं भरायची.  एक चिमणी पेटली की बास !  सार्‍यांच्या चिमण्या पेटत. मिणमिणता उजेड.  अगदी चूल पेटवायलासुद्धा आयाबाया एकमेकीला आपआपल्या चुलीतला विस्तव उलतान्यातनं देत असत.  काडेपेटी नसायची ना ?  चौकाचौकात खांबावर ग्रामपंचायत दिवे लावत असायची.  त्या खंदिलाच्या उजेडात गावकरी रात्ररात्रभर लेझीम खेळत असत.  मी लेझीम बरा खेळत असे पण ढोल मात्र छान वाजवायचो.  रस्त्यावरला खंदील विझला की सारं गावं अंधारात बुडून जायाचं.  त्यानं चोर्‍यामार्‍या, दरोडं यांना ऊत आलेला असायचा.  रातच्याला आठ वाजता सारं गाव चिडीचूप झोपी जायाचं.

आम्हा पोरांना अभ्यासाला शाळंत जावं लागायचं.  शिक्षकही शिकवणीला मुक्कामाला असायचे.  पोरांनी वाकळा, गोधड्या, रकटी, फाटकीतुटकी आणि दप्‍तर म्हंजे बाजारातल्या थैल्या, पिशव्या.  तुमच्या मुलांसारख्या सॅक-बिक नव्हत्या.  दोन्ही बंद काखेला मारायचे, हातात चिमणी पेटवून घ्यायची आणि अंधारातनं वाट काढीत शाळेत पोहचायचं.  सारी पोरं आशीच येत.  पोरी शाळेत नसायच्या.  एखादीच असली तरी ती अभ्यासाला नसायची.  त्यामुळे सारी  पोरंच.  मी जरा आगाऊ.  सगळ्यांचा मार खाणारा, शिव्या खाणारा. सारी पोरं झोपली की झोपण्याचं सोंग करायचं.  शिक्षकही आमच्याच बरोबर झोपलेले असायचे.  आपली गरिबाची चिमणी.  रॉकेल नसायचं.  शिक्षक भल्या पहाटे अभ्यासाला उठवायचे.  तेव्हा रॉकेल पायजे.  मंग रात्रीच कुणाच्या तरी चिमणीतलं रॉकेल आपल्या चिमणीत वतून घ्यायचं आणि त्याची चिमणी आपल्या 'शू' नं भरून टाकायची.  पहाटे सर्वात आधी उठून शांतपणे अभ्यासाला बसायचे.  प्रत्येकजण आपली चिमणी पेटवत असे.  आपल्या पुढ्यात आपली चिमणी पाहिजे.  चिमणीच्या काजळाचा धूर ज्याच्यात्याच्या नाकातोंडात जात असे.  नाकाची भोकं त्या काजळीनं काळी होऊन जात.  आजही तो रॉकेलचा वास आणि चिमणीच्या धुराची काजळी माझ्या नाकात आहे.  ज्यांच्या घरात चिमण्या होत्या आणि नाकात काळं काजळ, त्यांनाच समजेल की यशवंतरावांनी काय केलं.  तर पहाटे सगळे जीव लावून अभ्यास करायला बसत, पण ज्याचं रॉकेल मी माझ्या चिमणीत ओतून घेतलेलं असे त्याची चिमणी पेटत नसे.  ती नुसती तुडतुडायची.  पेटायची नाही.  ती कशी पेटणार ?  मी आपण त्या गावचेच नाही असा अभ्यासात मग्न असायचो.  तक्रार गुरुजींकडे जायची.  कोण कबूल होणार ?  ज्याची स्थिती बरी तो खंदील वापरत असे.  मग गुरुजी संतापून सगळ्यांना रुळांनी सपासप छड्या द्यायचे.  मुकाट्यानं सारेजण मार खात असू.  गुरुजी फार चांगले, तेही मग रउत.  असे शिक्षक जे मार मारत आणि पुन्हा लागलंना रे सगळ्यांना म्हणून डोळ्यांच्या कडा पुशीत !  सुप्रिया, सांग आता असले एक तरी गुरुजी असतील काय ?