७. संयम -
१९४२ च्या आंदोलनाच्या काळात एक पोलिस अधिकारी अत्यंत क्रुरपणे वागत होते. या त्याच्या वर्तनाचा ब्रिटीश राजवटीत खूपच उदोउदो झाला होता. श्री. यशवंतरावजी भूमिगत झाल्यानंतर याच पोलिस अधिका-याकडून श्री. यशवंतरावजींचा तपास काढण्याच्या उद्देशाने सौ. वेणूताई चव्हाण यांना अटक व त्रास झाला होता व त्याच्या उध्दट वर्तनाचा कोणाला संताप यावा असेच त्याचे सतत वागणे असे. स्वातंत्र्य मिळाले. व यशवंतरावजी मंत्री झाले. क-हाडला आल्यानंतर याच पोलिस अधिका-याची गाठ श्री. यशवंतरावजीशी पडली पण श्री. यशवंतरावजींनी त्याच्या वर्तनानी कधीच ओळख दिली नाही. एकदा श्री. यशवंतरावजींना त्यांचे एक स्नेही म्हणाले,’ तुम्हाला या अधिका-याचा संताप कसा येत नाही? त्यानं किती अनन्वित छळ केलाय तुमचा, ते तुम्हाला स्मरतं कां नाही?
श्री. यशवंतराव म्हणाले, सारं काही मला आठवते व मनस्तापही होतो! पण-“… मी गत घटना विसरून जाण्याचा सतत प्रयत्न करीत असतो!”
संग्राहक - शि. बा. बटाणे (इ. ९ वी)
८. लोकशाही-
प्रांत पुर्नरचनेच्या अंमलबजावणी नंतरच्या संतप्त वातावरणात घडलेली घटना आहे ही!
एका शाळेला भेट देण्याबद्दल ना. यशवंतरावजींना अगत्याचं नि आग्रहाचं निमंत्रण आल्यावरून ते त्या विद्यालयात गेले. एका वर्गात प्रवेश करताच एका विद्यार्थ्याने अनुचित घोषणा केली. या अनपेक्षित घटनेमुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक, चालक वगैरे अगदी भांबावून गेले व त्यांना काय करावे हेच सुचेना. श्री. यशवंतरावजी भेट देऊन परत गेले. झाल्या प्रकाराबद्दल शाळा चालकांनी त्यांचेजवळ क्षमेची याचना केली व विद्यार्थ्याला कडक शासन करण्याचा इरादा व्यक्त केला. तेव्हा श्री. यशवंतरावजी म्हणाले,’ छे, छे, असे काहीच करू नका! लोकशाहीत अशा घटना घडणारच!’ त्या अटळ असतात!
संग्राहक - प्रताप ज्ञा. चव्हाण (१० अ)
९. एक बाका प्रसंग-
१९४२ च्या चलेजावच्या चळवळीत कराड तालुक्याचे नेतृत्व श्री. यशवंतराव चव्हाण यांचेकडे आले होते. यशवंतरावानी मामलेदार कचेरीवर मोर्चे, बुलेटिन्स इत्यादी मार्गानी जनतेत जागृती करून इंग्रज सरकारला बेचैन करून टाकले होते. त्यामुळे यशवंतरावजीना पकडण्यासाठी येथील पोलिस अधिका-यानी जीवाचा आटापिटा चालविला होता.
एके रात्री यशवंतराव शेणोली स्टेशनवर रात्री साडे दहाच्या सुमारास पुण्यास जाणा-या गाडीत चढले ते इंटरच्या डब्यात बसले. आपण सहज प्रवाशांच्या नजरेस येऊ नये म्हणून तातडीने त्यांनी इंटरमधील वरच्या फळीवर (बर्थवर) जागा पटकाविली आणि झोपेचे सोंग घेतले.
गाडी कराड स्टेशनवर आली आणि यशवंतराव ज्या इंटरच्या डब्यात बसले होते. त्या डब्यात एक प्रवासी चढला. यशवंतराव झोपलेल्या बर्थच्या खालचे रिकाम्या असलेल्या बाकावर तो प्रवासी येऊन बसला. यशवंतरावानी हळूच बघितले आणि त्यांच्या मनात चर्रर झाले. तो प्रवासी कोण होता ठाऊक आहे? तो प्रवासी म्हणजे कुप्रसिध्द फौजदारांचा हस्तक होता. या चळवळीत कार्य करणा-या लोकांची फौजदाराना माहिती देणे त्यांना पकडून देण्यास मदत करणे हे त्याचे काम. या कामासाठी त्याला फौजदाराकडून चांगली कमाई होत असे, असे म्हणतात. इतकेच नव्हे तर फौजदारांचे आणि त्याचे असले नाते लोकाना ठाऊक होते. त्यामुळे काही निरपराधी आणि चळवळीपासून अलिप्त असलेल्या लोकाना हे कुप्रसिध्द फौजदार पकडून आणीत आणि हे गरीब बिचारे लोक या हस्तकाकडे जाऊन आपली सुटका करून घेत. ते फौजदार आणि हा हस्तक यांचा असा बनाव होता. चळवळीच्या धामधुमीत त्या हस्तकाने आणि फौजदाराने आपले उखळ पांढरे करून घेतले असेल तर त्यात नवल काय? हा हस्तक किती भयावह होता याची कल्पना यावी म्हणून ही त्यांच्याबदद्लची माहिती दिली असा हा भयावह हस्तक यशवंतरावांच्या खलीच बसल्याने यशवंतरावांच्या मनात चर्रर झाले असल्याचे नवल कसले. एखादा हिंस्त्रपशु आपल्या जवळ यावा म्हणजे भीती वाटेल तीच भीती त्यांना वाटली. पण यशवंतरावांनी आपले झोपेचे सोंग आधिकच हुबेहुब वठविण्यास सुरवात केली.