प्रस्तावना.......
श्याम द. घळसासी एम.ए.बी.एड्.
११ विश्वास गार्डन बी (सनसिटी रोड)
आनंदनगर, सिंहगड रस्ता पुणे- ४११०५१
फोन- २४३४८७६७
मोबा.-९९६०१७५७२९
बीज अंकुरे, अंकुरे
प्रिय विद्यार्थी चि. सुधाकर मंत्री यांना
सादर सप्रेम शुभाशीर्वाद. विशेष
तुमचे सविस्तर पत्र नुकतेच मिळाले. पत्र वाचून माझ्या आनंदाला जणू उधाणच आले. मी ते दोन, तीन वेळा थांबून थांबून वाचले. श्री शिवाजी विद्यालय, क-हाडमधील माझ्या अध्यापकीय जीवनात माझे अंतरमन आता पुन्हा पुन्हा डोकावते आहे!
आज मला तीव्रतेने आठवते-
‘इयत्ता ७ वीच्या स्कॉलरशीप परीक्षेच्या मार्गदर्शननाच्या निमित्ताने माझ्या व्यावसायिक जीवनात तुम्ही सर्वानी प्रवेश केलात, ते थेट शालान्त परीक्षेअखेर. आपले ‘मराठीचे अध्यापक’ म्हणून, आपले परस्परांचे भावविश्व व्यापून राहिले होते. पुढे उच्च शिक्षण नि व्यावसायिक जीवनातील अत्युच्च यश संपादन करूनही, आजही तीच ममत्व भावना तुम्ही जपली आहे. हे मी माझे भाग्यसंचित समजतो!’ यश, कीर्ती, लौकिक संपादन करून, सेवानिवृत्तीनंतरचे प्रापंचिक समृध्द, समाधानी जीवन अनुभवत असतानाही, तुमची कृतज्ञभावना तुम्ही सर्वजणानी जपून ठेवली आहे. आजच्या काळात अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. विद्याभ्यासातील हुशारी व नोकरी, पेशाचे अधिकार पद किंवा डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा व्यापार अशा क्षेत्रात तुम्ही सर्वांनीच अपूर्व यश संपादन केले आहे. तरीही आपल्या बालपणीच्या वा शालेय उपक्रमांच्या आठवणी तनामनात जपणारी तुमची पिढी- भावी युवामनात आदर्श भावभावनांचे बीजांकूर अंकुरीत करणारी ठरेल! ठरो!! ही ईशचरणी माझी प्रार्थना.
‘यशोदर्शन भाग- १’ हे तुमच्या विद्यार्थी वाडमय मंडळाचे पहिले मुद्रित पुष्प, १९५६ मधील एका प्रासंगिक शुभ घटनेची आज साक्ष पटवणारे ठरते आहे.
तुम्ही सर्वजण दहावी इयत्तेत होतात. तुमच्या वाङमय मंडळाच्यावतीने त्यावेळी, मराठी साहित्य परिषद पुणेच्या, वाङमयीन परीक्षांची तयारी, शालेय व राज्य पातळीवरील वक्तृत्व स्पर्धाची तयारी, स्नेहसंमेलनातील नाटुकली, हस्तलिखिते इत्यादी उपक्रम सुरू असत. कविवर्य पंडित सप्रे, श्री. ना. ल. तथा नाना इनामदार, श्री. श्याम घळसासी यांच्या भोवती तुम्हा सर्वांचा गराडा पडलेला असे. निकोप स्पर्धा (‘वर्दि कॉम्पिटेशन’) म्हणजे काय? याचा अनुभव मी त्यावेळी सतत घेत आलो. आपले मुख्याध्यापक व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री. प्र. ल. ऊर्फ काकासाहेब करंबेळकर यांचे सतत व सबल प्रोत्साहनन ही आपणा सर्वांची दृढ संकल्पशक्ती होती.