त्या अधिका-याला चुकवून यशवंतराव निसटले परंतु लोणंद स्टेशनवर त्या अधिका-याने यशवंतरावाची चाहूल घेतली पण यशवंतरावाची जागा त्यांच्या अभावी रिकामी असल्याची त्याच्या नजरेस आले. केवढी निराशा झाली त्याची! इकडे यशवंतराव स्टेशनच्य़ा बाहेर एकटेच रेंगाळत होते. रात्री १/१/३० वाजता भयाण अंधा-या रात्री दिव्याचा प्रकाश अंधाराचा अंदाज देत होता. अशा वेळी एकटयादुकट्याने रेंगाळणे किती धोक्याचे होते, ना ओळख ना आधार ना आसरा! मोठी चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाली. स्टेशनमधल्या पोलिसांनी पाहिले असते तर त्यांना चोर लफंगा म्हणून बसवून ठेवेले असते व तसे झाले असते तर बिंग बाहेर आले असते.
पण संकटाच्या वेळी परमेश्वर कोणत्या तरी रुपाने धावत येतो याचा अनुभव यशवंतरावाना त्यावेळी आला. नीरा स्टेशनच्या बाहेर एक मिलॉरीचा मालट्रक उभा होता. यशवंतरावांनी त्या ट्रकच्या ड्रायव्हरशी बोलणे सुरु केले. त्या ड्रायव्हरलाही कळून चुकले की हा एक भूमिगत कार्यकर्ता आहे. तो ड्रायव्हर इंग्रजांच्या मिलिटरीचा नोकर होता. पण त्याचे मन भारताचे होते. त्याने यशवंतरावांना आधार दिला आणि आपल्या ट्रकमधून बारामतीच्या आसपास सोडून दिले. सर्वसामान्य लोकांच्या ठायी केवढे देशप्रेम होते, याचा अनुभव यशवंतरावाना त्यावेळी मिळाला. इंग्रजांचे राज्य राखण्यासाठी पगार घेणारा तो ड्रायव्हर, इंग्रजांचे राज्य उलथून पाडणा-या कार्यकर्त्याच्या मदतीसाठी धावून आला हे पारतंत्र्याला लागलेल्या अखेरच्या घरघरीचे लक्षण नव्हे काय? कुठे तो पैशासाठी देशद्रोह करणारा सी.आय.डी. आधिकारी आणि कुठे हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी होईल ती मदत करणारा ट्रकड्रायव्हर. या ट्रकड्रायव्हरसारखी इमानी माणसे होती म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले.
संग्राहक - अशोक प्रभाकर करंबेळकर (१०अ)
१६. तत्वनिष्ठा व बंधुप्रेम –
श्री. यशवंतरावजीचे थोरले बंधू श्री. गणपतराव मोठे कर्तबगार व धडाडीचे म्हणून प्रसिध्द होते. त्यांचे यशवंतरावांच्यावर गाढ प्रेम होते. यशवंतरावांनाही त्यांच्यावर पुतृतुल्य आदर.
१९३५-३६ चा सुमार असावा. येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाग घेतला होता. त्या निवडणुकीत गणपतराव हे एक स्वतंत्र उमेदवार होते आणि यशवंतराव काँग्रेसचा प्रचार करीत होते. यावेळी यशवंतरावांच्या तत्वनिष्ठेचा कस होता. यशवंतरावांनी श्री. गणपतरावांचे विरुध्द प्रचार करून काँग्रेसला मत मिळवून देण्याचा जाहीरपणे प्रयत्न चालू केला ही गोष्ट त्यांच्या तत्त्वनिष्ठेची नव्हे कां ?
पण त्यांचे परस्पराचे प्रेम किती होते ठीऊक आहे ? गणपतराव हे आजारपणात अंथरुणावर खिळून होते. एके दिवशी यशवंतराव त्यांचा नरोप घेऊन परगावी निघाले. ‘तेवढयात गणपतरावांनी आपला भाचा शामराव याला अंथरुणाजवळ बोलावले आणि त्याच्या हाती उशाखाली १० रुपयांची नोट देऊन त्याला सांगितले की,’ हा गावाला निघाला आहे त्याच्या खिशात एक पैसा नसेल ही नोट त्याच्या खिशात घालून ठेव.’
असे बंधूप्रेमाचे प्रसंग अनेकानी अनेक वेळा पाहिले आहेत !
काय हे प्रेम व काय ही तत्वनिष्ठा !
- संग्राहक – कु. विजया द. घळसासी (८अ)