यशोदर्शन-४

या शताब्दी संवत्सराचे निमित्त साधून आज अनेक स्मृतीग्रंथ, समिक्षा, लेखमाला असे ना. यशवंतरावजींच्या जीवनमूल्ये व तत्वज्ञान यावर विपुल प्रकाशन- गाजावाजा करीत होते आहे. होणार आहे. अशा वेळी आपल्या प्रेमपुरूषांच्या पराक्रमांच्या, बालपणीच्या आठवणी म्हणजे, बालगोपालांनी आपल्या भावभक्तीने प्रज्वलित केलेल्या छोटयाशा निरांजनानी केलेली ती कुरवंडी, ओवाळणीच आहे. ही नक्कीच समयोचित, न्यायोचित, मांगल्यमय पवित्र घटना आहे.

ना. यशवंतरावजींच्या सान्निध्यात, बालवयापासून वावरलेल्या जीवलग मित्रांकडून मिळवल्या त्या आठवणी, आज त्या देवाघरी गेलेल्या त्यांच्या मित्रांच्या आत्म्यालाही संतुष्ट करणा-या ठरतील. देशभक्त कै. शांताराम इनामदार, कै. श्री. अनंतराव (धनी) कुलकर्णी, कै. श्री. संभाजीराव थोरात, प्रसिध्द साहित्यिक व प्रकाशक कै. श्री. दयार्णव कोपर्डेकर, कै. श्री.प्र.ल. ऊर्फ शंकरराव करंबेळकर यांनी हे मूल्यभांडार तुम्हापाशी उघडे केले आहे. तुमचा एक मार्गदर्शक- स्नेही म्हणून त्या बैठकीत उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले! पण हे सर्व श्रेय तुम्हा सर्व बाललेखकांचे आहे. आशीर्वादार्थ कोणी असावे एवढाच या सर्व घटनेशी माझा ऋणानुबंध जुळून आला!’

‘यशोदर्शन’ दुस-या आवृत्तीच्या प्रकाशनाबाबत तुम्ही माझ्याशी संपर्क साधून ‘आशीर्वाद’ मागितलात हा तुमचा विनम्र मोठेपणा आहे. वयाचा व तुमच्या सर्वांशी जुळून आलेल्या गुरूवर्य या नात्याचा आदर करून माझे या तुमच्या उपक्रमाला अनंत शुभाशीर्वाद! शुभेच्छा!’

‘सर्व लेखक बालमित्रांनी, तुझ्यामार्फत, माझ्याशी संपर्क साधला. तू प्रत्यक्ष येऊन भेटलास. सविस्तर पत्राने मनोदय व्यक्त केलास, याचाही मला परम आनंद झाला आहे. म्हणून हा पत्रोत्तराचा प्रपंच.’
प्रकाशन समारंभ, तुम्ही आत्म समाधानार्थ, साधा आणि केवळ स्नेही परिवारासह करीत आहात. हे तर माझ्या दृष्टीने अपूर्व साहस आहे. सर्वाना पुनश्च शुभेच्छा!

आपणा सर्वांचा शुभाकांक्षी

शाम घळसासी
गुरूपौर्णिमा, आषाढ शु १५ शके १९३४
दि. ३ जुलै २०१२

शोभे हा मुकुटमणी

शोभे हा मुकुटमणी, गुणाचा धनी, महाराष्ट्राचा||
मान दंड जहाला हा, ‘अजिंक्य तारा’ साता-याचा ||

भारताची धुरा खुशाल द्यावी ज्याच्या स्कंधावरी||
पसरली जयाच्या नेतृत्वाची कीर्ती भारतावरी||

वेरूळ अजिंठा कला, अन् उंची विध्याद्रीची||
एकत्र जहाली येथे वृत्ती सह्याद्रीची||

साकार जाहले पावित्र्य जिथे कृष्णामाईचे||
वा भेटले परस्परांना येथे, कर्तव्य नि कैवल्य तियेचे||

उत्तुंग मनोरा क-हाडचा उंचावी दर्पाने मान||
पण पाहता ‘यशवंत’ टाकला तयाने अभिमान||