यशोदर्शन-६

४. १९३० च्या आंदोलनात-

१९३० च्या ऐन चळवळीत यशवंतरावाचा बराच मोठा वाटा होता. भूमिगत राहून त्यांचे कार्य चालू होते. रात्री वस्तीला ते क-हाडमधील श्री. एकनाथ वास्के यांच्या दुकानी असत. रात्री गावात प्रमुख चौकातून ‘बुलेटीन’ चिकटून ते सकाळी दूर जात. चौकाचौकात पोलिसाचा पहारा होता. त्यांची नजर चुकवून श्री. यशवंतरावजी प्रकटन चौकात डकवत जात. प्रथम श्री. एकनाथ वास्के चौकातून पाणी आणण्याच्या निमित्ताने जाऊन येत व पोलिस नसल्याची खात्री झाल्यावर यशवंतराव कार्यभाग उरकत!

एक दिवस दडून पाळत ठेवणा-या पोलिसाने यशवंतरावाना चौकातच पकडले, पण नशीब सिकंदर असल्यामुळे यशवंतराव त्यातूनही निसटले. श्री. एकनाथ वास्केना यातून त्रास होणार हे यशवंतरावजींच्या लक्षात येताच ते आपणहून पोलिस स्टेशनवर हजर झाले! आपल्यासाठी दुस-याला कसलाही त्रास होणार नाही याकडे श्री. यशवंतरावजींचे कटाक्षाने लक्ष असते.

संग्राहक - मदन ए. वास्के (१० क)

५.  भविष्यवाणी-

यशवंतरावजी चव्हाणांच्या लग्न समारंभाला सा-या महाराष्ट्रातून कार्यकर्ते जमा झाले होते. उत्साहाला व मांगल्याला जिकडे तिकडे भरती आली होती.
या सोहळयातच दे. भ. रामानंद भारती यानी ना. यशवंतरावजींच्याबद्दल एक विधान केले... ते म्हणाले-

... ‘श्री. यशवंतरावजी चव्हाण हे सातारा जिल्ह्याचे पंडित नेहरू आहेत.”
आज वीस वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच ही भविष्यवाणी साकार झाल्याचं दिसत आहे!

संग्राहक - सु. बा. वंजारी (१० अ)

६. गुरूप्रेम

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाच्या जीवनात असं काही चिरस्मरणीय संभवेल हे कदापि शक्य नाही कारण लोकशाहीत सामान्यातून श्रेष्ठ नेते जन्मतात पण त्यांच्याकडून आपल्या श्रेष्ठत्वाला पहिले वळण देणा-या प्राथमिक शिक्षकाचे स्मरण राहातेच असे नाही.

श्री. यशवंतरावजींचे गुरूजी श्री. बा. सा. बुधकर हे एकदा आपल्या मुलाकडे मालाडला गेले होते. मुंबईच्या परिसरात गेल्यामुळे एका काळच्या आपल्या विद्यार्थ्याला- ना. यशवंतरावजीना- भेटण्याची त्यांना इच्छा झाली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवले. श्री. यशवंतरावजींनी ताबडतोब स्वत:ची गाडी पाठवून त्यांना निवासस्थानी आणले व चार पाच तास गतस्मृती व योगक्षेमाच्या गोष्टी केल्या. व तातडीने जाण्याची इचछा व्यक्त करताच श्री. यशवंतरावजी म्हणाले, ‘तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला जाण्याची घाई आहे हे जाणतो. तुम्हाला वेळेवर पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे! पुन्हा थोडावेळ गप्पा झाल्या व पुन्हा आपल्या गाडीतून मोठया इतमामाने त्यांना घरी पोहोचवले.

आपल्याबद्दल दाखविलेला जिव्हाळा, प्रेम व आदर कसा अकृत्रिमपणे त्याच्या सहवासात व्यक्त झाला हे सांगताना श्री. बा. सा. बुधकरांना आजही गहिवरून येते!

संग्राहक - सुधाकर अ. मंत्री (१० अ)