सह्याद्रीचे वारे - १६१

राष्ट्रभाषा हिंदी

आज या दीक्षांत भाषणाच्या रूपानें माझे विचार आपल्यासमोर मांडण्याची आपण मला जी संधि प्राप्त करून दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहें. पहिल्या प्रथम हिंदी परीक्षांमध्यें यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचें मी हार्दिक अभिनंदन करतों. कोणतीहि परीक्षा असो, ती एक प्रकारची कसोटीच असते. आपलें मर्यादित ज्ञान या कसोटीवर पारखून घेण्यांत जे यशस्वी होतात त्यांना एक प्रकारची आपल्या गौरवाची व आत्मविश्वासाची प्रचीति येते. आपलें जीवन योग्य प्रकारें व्यतीत करतां यावें, आणि त्याचबरोबर आपलें कुटुंब, समाज, राष्ट्र आणि मानवता यांसंबंधींचीं आपणांवर पडणारीं कर्तव्यें चांगल्या प्रकारें पार पाडतां यावींत म्हणून आधुनिक काळांत आपणांला अनेक परीक्षा देऊन आवश्यक तें ज्ञान मिळवावें लागतें. जीवन हीच मुळीं एक मोठी परीक्षा असून ती चांगल्या रीतीनें उत्तीर्ण होण्यासाठीं अतिशय परिश्रम करावे लागतात. आपली जीवननौका योग्य मार्गावर ठेवण्यासाठी सतत जागरूक राहून आपल्या शक्तीचा आपण कार्यक्षम रीत्या पुरेपूर उपयोग केला नाहीं तर ती प्रवाहामध्यें वाहून जाते आणि आपण प्रवाहपतित बनतों. परिस्थितीवर ज्याला विजय मिळवतां येत नाहीं तो तिचा गुलाम बनतो आणि आपल्या दुर्भाग्याला दोष देत राहतो. म्हणून परीक्षेंत यशस्वी होणें अतिशय महत्त्वाचें असतें याबद्दल शंकाच नाहीं. तथापि याचा अर्थ असा मात्र नाहीं कीं, परीक्षेंत उत्तीर्ण होणारेच लायक असतात व तींत नापास होणारे निरुपयोगी ठरतात. परीक्षेंत नापास झालेल्या विद्यार्थ्यांमध्यें कांहीं असेहि विद्यार्थी असण्याची शक्यता असते कीं, ज्यांचें ज्ञान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षां अधिक असूं शकेल, पण केवळ कमनशिबामुळें त्यांना परीक्षेंत यश मिळालें नसेल. घोड्यावर स्वार होणाराहि कधीं कधीं खालीं पडतो, पण पडल्यानंतर ज्याला उठतां येत नाहीं त्याला स्वतःचें संरक्षण करणें कठीण जातें. जीवनाच्या कितीतरी परीक्षांमध्यें आपल्याला अपयश येतें. पण केवळ अपयश आलें म्हणून आपण धीर सोडतां कामा नये. हिंमत धरून आणि आपल्या अपयशाचीं कारणें समजावून घेऊन योग्य दिशेनें आत्मविश्वास व जोमानें आपण प्रयत्न केले तर आपलें ईप्सित साध्य होण्याच्या मार्गांत कोणतेच अडथळे येणार नाहींत. ज्ञानसंपादनाची आपली आवड व यशाची ईर्षा आपण कायम राखली तर अपयशामुळेंसुद्धां आपण अधिक कार्यक्षम व कार्यप्रवण बनूं शकतों असाच आपल्याला अनुभव येईल.

परीक्षांमध्यें उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आनंद वाटणें स्वाभाविक आहे. परंतु त्यामुळें त्यांनीं आत्मसंतुष्ट किंवा अल्पसंतुष्ट राहतां कामा नये. परीक्षेंतील यशप्राप्तीमुळें अधिकाधिक ज्ञानार्जनाची आवड आपल्यामध्यें निर्माण व्हावयास पाहिजे. केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठींच जर आपण शिकलों आणि नंतर तें सर्व विसरून गेलों तर असें शिकणें व न शिकणें सारखेंच होईल. म्हणून आपण जें वाचतों किंवा शिकतों, त्यांतील महत्त्वाचा भाग ध्यानांत ठेवण्याचा आपण नेहमीं प्रयत्न केला पाहिजे. आपण आपलें ज्ञान वाढविलें पाहिजे एवढेंच नव्हे तर त्यांत आपण सखोलताहि आणली पाहिजे. केवळ याच मार्गानें साहित्यसेवेसाठीं आपणांस अधिक पात्रता मिळवतां येईल. एका परीक्षेंत उत्तीर्ण झाल्यानंतर तिच्यापेक्षांहि मोठ्या परीक्षेंत यश मिळविण्यासाठीं अभ्यास चालू ठेवण्याचा विद्यार्थीवर्गानें निश्चय केला तर उच्च शिक्षण
घेणा-यांची संख्या वाढूं लागेल. साधारण शिक्षण घेतलेल्या लोकांपेक्षां उच्च शिक्षण घेतलेले लोक, हिंदी साहित्य आणि देश यांची चांगल्या प्रकारें सेवा करूं शकतील यांत शंका नाहीं. म्हणून अधिकाधिक उच्च शिक्षण घेण्यासाठीं प्रयत्न करण्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने निश्चय केला पाहिजे.

अशा प्रकारें आपली पात्रता अधिकाधिक वाढविण्याचा प्रयत्न करीत असतांना, आपला समाज आणि राष्ट्र यांच्या सेवेसाठी आपणांला अधिक उपयुक्त कसें बनतां येईल याचाहि विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. त्यासाठीं प्रथम त्यांनीं आपल्या समाजाची व देशाची आज खरी परिस्थिति काय आहे हें जाणून घेतलें पाहिजे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या सर्वांगीण विकासासाठी फार मोठ्या प्रमाणावर कार्य चालू आहे. देशांतील गरिबी नाहींशी करून त्याला आर्थिक समृद्धि प्राप्त करून देण्यासाठीं पंचवार्षिक योजना अंमलांत येत आहेत. आणखी थोड्याच महिन्यांत दुसरी पंचवार्षिक योजना पूर्ण होऊन तिस-या योजनेस सुरुवात होईल. या योजनांच्या द्वारें, देशामध्ये शेतीसुधारणा व औद्योगिक प्रगति यांबाबत फार मोठें कार्य होत आहे. शिक्षण प्रसार व सार्वजनिक आरोग्य यांमध्यें सुधारणा घडवून आणण्यासाठीं हरत-हेचे प्रयत्न होत आहेत, आणि देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनें सरकार आणि जनता सर्व प्रकारें प्रयत्नशील आहे. या सर्व गोष्टींची विद्यार्थ्यांना माहिती असली पाहिजे आणि या सर्व घटनांचें त्यांनीं अभ्यासपूर्वक निरीक्षण केलें पाहिजे. कारण हें सर्व त्यांच्या हितासाठींच चाललेलें आहे. आपलें भवितव्य उज्ज्वल व्हावें म्हणून सरकार आणि सर्वसाधारण जनता कशा त-हेनें परिश्रम करीत आहे, हें जेव्हां डोळें उघडून ते पाहतील तेव्हां आपणहून या महान् कार्यांत सहभागी होण्याकरिता ते पुढें येतील असा माझा विश्वास आहे.