सह्याद्रीचे वारे - १६५

वेरूळ येथील कैलास लेणीं ज्या वेळीं मीं प्रथम पाहिलीं त्या वेळच्या माझ्या भावना आजहि आठवतात. तीं कैलास लेणीं पाहून माझें मन भारावून गेलें. आजूबाजूचें जे लोक मला त्यांच्यासंबंधीं माहिती देत होते त्यांचे अस्तित्व देखील मी क्षणभर विसरून गेलों. माझें मी-पण मी विसरलों, आणि किंचित् काल एका स्वर्गीय अशा आनंदांत रममाण झालों. मला वाटतें, आजकालच्या धकाधकीच्या जीवनांत, व्यक्तीच्या आयुष्यांत असा क्षण येणें हाच त्याला लाभणारा खरा विरंगुळा होय. असा विरंगुळा प्रत्येकाच्या जीवनामध्यें जितका जास्त येईल तितकें त्याचें जीवन अधिक सुखी बनेल. श्रेष्ठ कलाकृतीमध्यें जीवन फुलविण्याची अशी अमर्याद शक्ति असते.

साहित्याची गोडी आपण एकांतांत चाखतों. पण समाजांत प्रत्यक्ष लोकांमध्यें बसून नाटक पाहणें, लोकनाट्याची मौज लुटणें, कुस्त्यांची रणधुमाळी अवलोकणें किंवा क्रिकेटची टेस्ट मॅच पाहण्यांत दंग होणें यांतील मौज कांहीं औरच आहे. एखाद्या जुन्या नाटकांतील पडदा वर जाऊन पेटीचे सुमधुर स्वर वातावरणांत घुमूं लागले किंवा सारंगीचे मृदु सूर कानीं पडले कीं, एका निराळ्याच जगांत आपण प्रवेश करतों. त्यावेळीं आपल्या भावना कशा दोलायमान होतात त्याचें वर्णन शब्दांनीं करतां येणार नाहीं. बालगंधर्वांचीं ती जुनीं गाणीं आठवलीं किंवा त्या काळांतील नटश्रेष्ठांच्या अभिनयकौशल्याची नुसती आठवणी आली कीं गोड स्मृति चाळविल्या जातात. केशवराव दाते यांच्यासारख्या कसलेल्या नटांच्या भूमिका आणि जुन्या काळांतील तीं भरदार नाटकें, यांच्या आठवणी देखील किती सुखद वाटतात. रसिक समुदायामध्यें बसून नाटकांची गोडी चाखणें किंवा तमाशांच्या फडांची मौज लुटणें अशा जीवनांतल्या किती तरी गोष्टी आहेत कीं, ज्यांपासून मीं अक्षरशः मनसोक्त आनंद लुटला आहे. बडे गुलामअल्लीखां, भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर ह्यांच्यासारख्या सुप्रसिद्ध कलाकारांचें गायन म्हणजे जीवनांतील आनंदाचा उच्चांक होय.

साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला ह्यासारख्या कलांनीं माणसाच्या जीवनाला समृद्धि आणलेली आहे. मानवाला सुसंस्कृत बनविलें आहे. परंतु एखादा माणूस साक्षर असून देखील सुसंस्कृत नसतो. कारण जीवनांतील आनंद कसा लुटावा हें त्याला ठाऊक नसतें. कलेचें रहस्य जाणण्याची दृष्टि त्याला प्राप्त झालेली नसते. त्यामुळें जीवनांत त्याचें मन कोठेंच रमत नाहीं. त्याला कशापासून देखील विरंगुळा मिळत नाहीं. अशा प्रवृत्तीपासून आपण दूर राहिलें पाहिजे. माझ्या जीवनाकडे मी जेव्हां दृष्टिक्षेप टाकतों त्या वेळीं सुदैवानें मला जीवन आनंदमय वाटतें व नव्या क्षितिजांच्या ओढीनें माझें मान अद्यापहि भारावून जातें.

मीं क्षणभर विचार केला तरी मला असें वाटतें कीं, किती तरी गोष्टी अद्यापि करावयाच्या राहून गेल्या आहेत. मला पोहोण्याची खूप हौस आहे. पण वेळ मिळतो कुठें ? गायन किंवा नाट्य यांची देखील मला कमी गोडी नाहीं. एखादें चांगलें नाटक पाहावें म्हणून ठरवतों, पण ऐन वेळीं दुसराच कार्यक्रम उपस्थित होतो. एखादी संध्याकाळ मित्रांबरोबर सुखसंवाद करण्यांत घालवावी म्हणून बेत आंखतों. पण मध्येंच दुसरें कांही काम निघतें. त्यामुळें सुखाचे जे क्षण योजलेले असतात ते दूर जातात. थोडासा विरंगुळा वाटावा म्हणून कांहीं गोष्टी करावयाच्या ठरविलेल्या असतात. पण त्या तशाच राहतात आणि विश्रांतीचे क्षण दैनंदिन कामांतच विलीन होऊन जातात.

कांही विषयांचा तपशीलवार अभ्यास करावा म्हणून त्या विषयांवरील महत्त्वाची पुस्तकें मी जमा करीत असतो. अशा पुस्तकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही सर्व पुस्तकें आवडीनें मीं माझ्या झोपण्याच्या खोलींत ठेवलीं आहेत. कित्येक महिने झाले या पुस्तकांना माझा हातच लागत नाही, वेळच मिळत नाही. आणि थोडा वेळ मिळालाच तर त्या पुस्तकांच्या छोट्या कपाटापुढें बसून त्यांची पानें चाळीत तीं कोणत्या क्रमाने वाचावींत याचा कार्यक्रम मनाशी योजणें एवढाच विरंगुळा हल्ली मला राहिला आहे.