आपल्या देशांतील परंपरा सुद्धा अशाच त-हेची असून ती सांगावयाची झाल्यास व्यास-वाल्मिकींपासून ते आजपर्यंतच्या अनेक पंडितांचीं, विचारवंतांचीं आणि विद्वानांचीं नांवें घ्यावीं लागतील. ही यादी मोठी लांबलचक व आकर्षक होईल. पण तिची कांहीं आवश्यकता नाहीं. थोड्यांच दिवसांत रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मशताब्दीचा समारोह सबंध देशभर आपण साजरा करणार आहोंत. व्यास-वाल्मीकींसारख्या महर्षींपासून रवींद्रनाथ टागोरांसारख्या ऋषितुल्य पुरुषापर्यंत फार मोठी अशी आमची सांस्कृतिक परंपरा आहे. आणि महाराष्ट्रापुरतेंच या परंपरेसंबंधीं बोलावयाचें झाल्यास ज्ञानेश्वरापासून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांच्यापर्यंत अनेक नावांचा उल्लेख करावा लागेल. अशा या सर्व थोर विद्वानांची, पंडितांची, त्यागी संतांची आणि पराक्रमी पुरुषांची ही आपली अखंड परंपरा आहे. तीच आमची खरी प्रेरणा आहे. त्यांचें कार्य आम्हीं पुढें चालविलें पाहिजे. म्हणूनच शासनामार्फत आज या साहित्यिक आणि सांस्कृतिक मंडळाची निर्मिती होत आहे.
आजच्या ज्या विशिष्ट परिस्थितींत आपण या मंडळाची स्थापना करीत आहोंत त्याला कांहीं विशेष अर्थ आहे असें मी मानतों. मराठी भाषा, राज्यभाषा म्हणून स्वीकारण्याची तयारी करण्यासाठीं खरोखरी आजचा हा मंगल प्रसंग आहे. मराठी भाषा ही राज्यभाषा करण्याचें तत्त्व आम्हीं स्वीकारलें आहे. त्यामुळें आम्हीं कांहीं जबाबदा-या स्वीकारल्या आहेत. मराठी भाषेवर लोकशाहीचा कारभार करण्याची आतां जबाबदारी आलेली असून तो तिनें अशा रीतीनें केला पाहिजे कीं, लोकांचें जीवन संपन्न होण्यास, समृद्ध होण्यास तिचें साहाय्य होईल. त्यासाठीं भौतिक दृष्ट्या जगांत जें जें शास्त्र उंचावलेले आहे त्या त्या शास्त्रांतील ज्ञान आपल्यांत उतरविण्याचें सामर्थ्य मराठी भाषेला प्राप्त झालें पाहिजे. साहित्याचा आणि संस्कृतीचा, विचारवंतांचा आणि लेखकांचा जन्म खरोखरी कशासाठीं होत असतो ? मी तर असें मानतों कीं, मानवी मनांत अनेक मूक आशाआकांक्षा असतात, कल्पना असतात आणि त्या प्रकटीकरणासाठीं, व्यक्तिमत्त्वासाठीं, एक प्रकारें हांका मारीत असतात. शब्दांसाठी त्या भुकेलेल्या असतात, तहानलेल्या असतात. त्यांच्या हांकेला ओ देऊन लेखक, विचारवंत, संशोधक व शास्त्रज्ञ त्यांना लेखनद्वारा शब्दरूप देत असतात. मराठी भाषिक जनतेच्याहि अशा कांहीं आशा-आकांक्षा, इच्छा असून त्या विविधप्रवाही आहेत. त्यांना आपण लेखनद्वारा शब्दरूप केलें पाहिजे. त्याचप्रमाणें ज्ञानाच्या सरोवराचें पाट आपण लोकांच्या जीवनापर्यंत पोहोंचविले पाहिजेत. ही ज्ञानगंगा लोकांच्या जीवनापर्यंत पोहोंचविण्यासाठी या मंडळाची आम्हांस मदत होईल. तें या मंडळाचें काम आहे.
मराठ्यांचा इतिहास हाहि आपला एक मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. इंग्रजांनीं त्यांचा जो इतिहास निर्माण केला आहे तो बखरींतून त्यांना सोईस्कर असे ठोकळ स्वरूपाचे उतारे घेऊन निर्माण केला आहे. परंतु मराठ्यांच्या इतिहासाचें पुनरुज्जीवन करण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचें नव्यानें संशोधन होऊन हा इतिहास पुन्हा लिहिला गेला पाहिजे. भारताच्या इतिहासांतील मराठ्यांच्या इतिहासाचें पुनरुज्जीवन करण्याचें काम या साहित्य मंडळाचे आहे.
या बाबतींत विचार करतांना अनेक मार्गांनी हा प्रयत्न व्हावयास पाहिजे असें मला वाटतें. मराठ्यांच्या इतिहासलेखनासाठीं लागणारीं अनेक साधनें ठिकठिकाणी सर्वत्र विखुरलेलीं आहेत. तीं पश्चिम महाराष्ट्रांत आहेत, विदर्भात आहेत आणि मराठवाड्यांतहि आहेत. परवांच या बाबतींत विद्वान मित्रांशीं चर्चा करीत असतांना आपल्या विदर्भाचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. माडखोलकर म्हणाले कीं, विदर्भ आणि मराठवाडा या आदिभूमीशीं महाराष्ट्राचा तुटलेला दुवा जोडावयाचा असल्यास, त्यासाठीं विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या खेड्याखेड्यांतून अनेक साधनें आहेत.
परंतु या प्रश्नाला हात घालून कुणींतरी ही साधनसामुग्री एकत्र केल्याशिवाय, इतिहासाच्या पुनरुज्जीवनाचें हें काम पुरें होण्याची शक्यता नाहीं. या बाबतींत अनेक कल्पना, अनेक विचार मनांत येऊन जातात. त्यांतील मुख्य विचार असा कीं, हें काम स्थिरपणानें कुठल्या तरी संघटनेनें केलें पाहिजे. या मंडळानेंच हें काम करावें असा मात्र याचा अर्थ नाहीं.