सह्याद्रीचे वारे - १५७

साहित्याची अंतिम प्रेरणा मानवी मूल्यांची जाणीव करून देणारी असली पाहिजे असें मी मानतों. यवतमाळच्या साहित्य सम्मेलनांत बोलतांना या विषयावर मी बोललों होतो म्हणून त्याची पुनरुक्ति मी करूं इच्छीत नाहीं. रशियांतील कादंबरीकार आणि अमेरिकेंतील कादंबरीकार यांच्या कादंब-यांतील नांवें बदलतील, त्यांतील सृष्टिसौंदर्याचीं स्थळें बदलतील, त्यांतील लेखन तंत्रहि कदाचित् वेगवेगळें असेल, परंतु मानवी मनाचें त्यांत जें पृथक्करण केलेलें असतें, भावनांचा त्यांत जो प्रत्यय येतो, तो शेवटीं एकच असतो. रशियन भाषेंतील उत्कृष्ट कथा वाचून माणसाला जो आनंद व अनुभव मिळतो, तोच आनंद आणि अनुभव मराठी, तामिळ किंवा जपानी भाषेंतील उत्कृष्ट कथा वाचून मिळतो. निरनिराळ्या भाषांतील अक्षर वाङ्मय वाचल्यानंतर त्यांतील मानवी मूल्यांचा आपणांस जो प्रत्यय येतो त्यामुळें त्या वाङ्मयाचें महत्त्व आपल्या मनाला पटत राहतें. मानवी मूल्यांचा प्रत्यय हीच वाङ्मयाची आपण शेवटची कसोटी मानली तर मानवी मूल्यांची किंवा मानवी गुणांची वाढ करणें हें आम्हीं आमचें साध्य मानलें पाहिजे. आणि हें साध्य गांठण्याचें साधन म्हणून आपण आपल्या राज्याकडे पाहिलें पाहिजे.

परंतु त्याबरोबरच तुमच्या आमच्या सर्वांच्यावर एक जबाबदारी येणार आहे. विदर्भांच्या परंपरेंत जे चांगले गुण आहेत, त्यांचा अनुभव गेल्या तीन वर्षांत मला विपुलतेनें आलेला आहे. विदर्भांच्या परंपरेंत एक प्रकारची प्रौढता आहे, एक प्रकारचें सौजन्य आहे, एक प्रकारची आतिथ्यशीलता आहे. हीं जीं विदर्भांचीं वैशिष्टें आहेत, तीं प्राचीनतेंतून आलेलीं आहेत. विदर्भ हें महाराष्ट्राचें जुनें नांव आहे असें कै. तात्यासाहेब केळकरांनीं एके ठिकाणीं म्हटलें आहे. महाराष्ट्र हें नांव कदाचित् ऐतिहासिक परंपरेंतून आलें असेल. परंतु आजोळची भूमि असा त्यांनीं विदर्भाचा उल्लेख केलेला आहे. आणि एका अर्थानें विदर्भ महाराष्ट्राचें ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धां आजोळ आहे.

आज मी बुलढाणा जिल्ह्यामध्यें असतांना तर या गोष्टीची मला जास्तच तीव्रतेनें जाणीव होते. शिवाजी महाराज आमच्या मराठी मनाचें प्रतीक आहेत आणि त्यांचें आजोळ विदर्भांत बुलढाणा जिल्ह्यांत आहे. आणि म्हणून मी म्हणतों कीं, विदर्भ ऐतिहासिक दृष्ट्याहि महाराष्ट्राचें आजोळ आहे. तेव्हां विदर्भाच्या प्राचीनतेंतून हे जे गुण आलेले आहेत त्यांची देवाणघेवाण तुम्हांला महाराष्ट्राच्या इतर भागांशी करावी लागेल. ती करतांना कदाचित् त्यांना थोडेसें समजावून घ्यावें लागेल आणि त्यांचे जे दोष असतील ते तुम्हांलाहि थोड्याशा रेशमी हातानें - मी पुन्हा त्या शब्दांचा उच्चार करून सांगतों - दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि हा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण आज एका मोठ्या ऐतिहासिक कालखंडांतून आपण चाललों आहोंत. दहापांच माणसांना येणारा राग हा समाजाचा राग बनतां कामा नये. आम्ही तीन कोटी मराठी भाषिक एका छत्राखालीं, एका घरामध्यें, एका छायेखालीं बंधुभावानें राहूं, वागूं, आणि वाढूं अशी मनाशीं आशा धरून आपण प्रयत्न केले पाहिजेत. समाजाची आजची ही गरज असून त्यासाठीं पुढील पावलें टाकण्याचें काम तुम्हांला आम्हांला करावयाचे आहे. एका अर्थानें गेल्या तीन वर्षांत आपण सात पावलें बरोबर टाकलेलीं आहेत. आणि तुमचा आमचा हा जो जवळचा संबंध आला आहे त्याच्या पाठीमागें कांहीं ईश्वरी संकेत आहे अशी माझी भावना आहे. हा कांहीं कुणा एका माणसाचा पराक्रम नाहीं. मी तर असें मानतों कीं महाराष्ट्राचा कायदेशीर जन्म होण्याच्या पूर्वीहि विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्र यांना एकत्र आणण्यामध्यें ईश्वराचा कांहीं संकेत होता. तो संकेत आज पुरा होत आहे. आम्ही मराठी भाषिक इतिहासकालामध्यें शतकानुशतकें एकमेकांपासून अलग राहिलों. पण यापुढें आम्ही बंधुभावानें एकत्र रांहू आणि हा बंधुभाव आम्ही अशा तेजानें वाढवूं कीं सबंध भारताला तो एक आदर्श व्हावा. अशा प्रकारची भावना आम्हांला आमच्या प्रयत्नांनीं निर्माण करावयाची आहे. कारण भारतांतील अनेक भाषिकांना एकत्र ठेवून भारताचें ऐक्य आम्हांला भावनात्मक ऐक्य बनवावयाचे आहे. तें बनविण्याकरितां आम्ही एकभाषिक प्रेमानें एकत्र राहूं शकतों, एकमेकांचें दोष सुधारण्याचा प्रयत्न करीत एकत्र राहूं शकतों, या आदर्शाची जाणीव आम्हांला असली पाहिजे, आणि तो आदर्श आम्ही प्रत्यक्ष जीवनामध्यें आचरला पाहिजे. त्या आचरणाचा क्षण आतां जवळ आला असून तुमचे आमचे मराठी भाषेचे सगळे पूर्वज आशीर्वादाच्या दृष्टीनें आपल्याकडे पाहात आहेत, असें चित्र आज माझ्या मनापुढें उभें राहिलें आहे. आमच्या या वंशजांना परमेश्वरानें सद्बुद्धि द्यावी अशीच त्यांची प्रार्थना असेल, आणि आम्हां तीन कोटि मराठी भाषिकांच्या मुखांतून संचारणा-या आमच्या मराठी माउलीचीहि तीच प्रार्थना असेल. आमची ही मूळ प्रेरणा आमच्यामध्यें कायम ठेवण्याच्या व वाढविण्याच्या कामीं साहित्यिकांची लेखणी मदत करो अशी सदिच्छा मी या प्रसंगीं व्यक्त करतों.

आपण मला येथें बोलावलें त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहें. विदर्भ साहित्य संघाचें व्यासपीठ हें मराठी भाषिकांना बंधुभावाची प्रेरणा देऊन त्यांना एकत्र आणणारें व्यासपीठ आहे असें मी मानतों. हें कार्य त्याच्याकडून यापुढेंहि असेंच सतत चालू राहो अशी प्रार्थना करून मी या अधिवेशनाचें उद्घाटन झालें असें जाहीर करतों.