हें दीक्षा मैदान सरकारनें दिलें तें मेहेरबानी म्हणून दिलें असें मीं कधीं मानलें नाहीं. महाराष्ट्र राज्याचें तें कर्तव्यच होतें. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्या राज्याचे नागरिक होते त्याचा महाराष्ट्र राज्याला अभिमान आहे. त्यांचें हें जें येथें स्मारक होत आहे, त्या स्मारकांत महाराष्ट्र राज्याला अभिमान वाटतो. येथें मालकीची भावना नसून कोणी कोणावर मेहेरबानी केलेली नाहीं. मेहेरबानी करणारी राजवट इंग्रजांच्या बरोबर निघून गेली. आतां सगळ्यांचा हक्क आहे. आपलें कांहींहि मत असो, आपला या राज्यावर हक्क आहे. म्हणून मी आपणांस पुन्हा एकदां सांगूं इच्छितों की, आपणांला या देशांत नवी सामाजिक परिस्थिति निर्माण करावयाची असेल, सामाजिक एकतेची नवी भावना निर्माण करावयाची असेल तर सहनशीलतेची, आपुलकीची, समजूतदारपणाची आणि दुस-याचा विचार समजून घेण्याची प्रवृत्ति आपण आपल्या समाजामध्यें निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय विचारस्वातंत्र्याची, त्याशिवाय लोकशाहीची खरी भूमिका निर्माण होणार नाहीं. मघाशीं श्री. शिवराज यांनीं सांगितलें तें बरोबर आहे. डॉ. आंबेडकर स्वातंत्र्यासाठीं जरा थांबा असें म्हणत होते. असा हा विचार त्यांनीं मांडला त्याचें कारण सबंध दुनियेंतील लोकशाहीचा इतिहास त्यांनी वाचला होता. तो वाचल्यानंतर त्यांना असें दिसून आलें कीं, जेथें शिक्षण वाढलेलें आहे, जेथें विचारांचे महत्त्व समजलेलें आहे, जेथें अंधश्रद्धा नाहींशीं झालेली आहे तेथेंच लोकशाही रुजलेली आणि वाढलेली आहे. जेथें परिपक्व मनें निर्माण होतात तेथेंच लोकशाहीचें फूल चांगलें फुलतें, असाच इतिहासाचा निष्कर्ष त्यांच्या प्रतिभेला दिसला असावा. म्हणून कदाचित् त्यांना असें वाटलें असावें कीं, अशी परिस्थिति निर्माण होईपर्यंत आपण थांबूं या. परंतु हें फूल आतां येथें उमललें आहे. त्याला सतत प्रफुल्लित ठेवण्याचें अत्यंत महत्त्वाचें, जबाबदारीचें आणि जोखमीचें काम आतां आपल्याला पार पाडावयाचें आहे. त्यासाठी आमच्यातर्फे सारखा प्रयत्न चालू आहे, बिनशर्त चालू आहे. महाराष्ट्रांतील मध्यम वर्ग, महाराष्ट्रांतील शेतकरी, महाराष्ट्रांतील कामगार, महाराष्ट्रांतील भूमिहीन शेतमजूर यांची आजपर्यंतच्या, निरनिराळ्या सामाजिक परंपरांमुळें वेगवेगळी घडण झाली आहे, त्यांच्या मनावर या परंपरांचा वेगवेगळा परिणाम झालेला आहे. या सर्वांना अलग ठेवणारी जी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिति असेल तिला दूर हटवून एक नव्या प्रकारची परिस्थिति आपण निर्माण केली पाहिजे. आणि या नव्या परिस्थितींतून आपण एक नवी सामाजिक भावना, एक नवा विचार स्वीकारलेला माणूस या महाराष्ट्रांत निर्माण केला पाहिजे. या विचाराचे आम्ही पाईक आहोंत. आणि हा विचार स्वीकारलेले हें राज्य म्हणजे त्या विचाराकडे नेणारें एक साधन आहे, त्या विचारापर्यंत नेणारा एक मार्ग आहे अशी आमची भावना आहे. याच भावनेनें आम्ही आपल्या प्रश्नाकडे पाहात आहोंत.
आपण मला येथें बोलविलें याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहें. या ठिकाणीं आपण एक महाविद्यालय सुरू करणार आहांत आणि आणखीहि अनेक कामें करीत राहाल. परंतु या सर्व कामांकडे आपण एक ऐतिहासिक काम करीत आहोंत या दृष्टीनें कृपा करून पाहा. शेकडों वर्षे, हजारों वर्षे आपल्या या कामाची आठवण राहणार आहे या भावनेनें आपण या कामाकडे पाहा. आजचे प्रश्न, आजच्या आकांक्षा, आजचे मोह, आजचे मतभेद, आजचे तणाव यांचा विचार न करतां शंभर वर्षांनंतर, दोनशें वर्षांनंतर येणा-या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आपण इथें निर्माण होणा-या संस्था, इथे निर्माण होणा-या परंपरा व इथें चालू होणारीं कामें यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा अशी मी आपणांस विनंती करीन. आपल्या कामाला माझ्या आशीर्वादाची जरुरी नाहीं. ज्या कामाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचें नांव लाभलें आहे, तें काम आपल्याच तेजानें, आपल्याच पुण्याईनें अमर होणार आहे. तुमचें माझें काम एवढेंच आहे कीं, या कामाला हातभार लावून आपले प्रणाम त्याला अर्पण करावेत. ही कोनशिला बसविण्यासाठीं मी निव्वळ याच भावनेनें येथें आलों, या कामाला माझा स्वतःचा प्रणाम करण्यासाठीं आलों. परंतु या कामांतून पुन्हा एक नवी अंधश्रद्धा निर्माण होणार नाहीं, एक वेगळा संप्रदाय निर्माण होणार नाहीं अशी मी आशा करतों. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीं ज्ञानाचें, वैचारिक स्वातंत्र्याचें, आणि लोकशाही विचारांचें सामर्थ्य प्राप्त करून घेऊन आपल्याला जी विचारपरंपरा दिली त्या परंपरेला सामर्थ्य देणारा असा नवा विचार, नवा वारसा या दीक्षाभूमींतून निव्वळ बुद्ध समाजालाच नव्हे, निव्वळ रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनाच नव्हे, तर सबंध महाराष्ट्राला आणि अखिल भारताला मिळत राहावा अशी मी प्रार्थना करतो आणि माझें भाषण संपवितो.