थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (10)

प्रथम आपल्या अनुयायी आश्रमातील मी कोण हे स्पष्ट करावे वाटते. आठवण करा. साहेब आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला असलेल्या कट्याच्या कडेला उभा रहाणारा, आईने ग-म-भ-न मुळाक्षरे, क,ख,ग बाराखडी व उभा एक आडवे दोन अंकगणिताचा दिलेला गृहपाठ पुरा करुन रोज कोणातरी जाणत्या अनुयायांबरोबर लहान परंतु नेहमी येणारा मुलगा या समजुतीने द्वारपालाने न हटकलेला,” भविष्यांत अनुयायी होवू इच्छिणारा, निसर्ग ओलाव्याला कोरडे करण्याकरिता सतत आपल्या पैरनीच्या पुढच्या भागाने नाकाला कुरवाळणारा, या कृतीने उभ्या देहाचा निम्मा भाग उघडा झाल्यावर उपस्थितांच्या हास्याचा विषय होणारा, यामुळे एकवेळ अनुयायांच्या मोठ्या हास्यकल्लोळ प्रसंगी आपण स्वतः बैठकीवरुनच चौकशी करुन मला जवळ बोलावून, कुंरवाळून “धाकट्या बाळा” आई देत असलेले गृहपाठ पुरे करुन आश्रमातील अनुयायासारखे आसन घालून बसण्याच्या वयापर्यंत थांब व नंतर नियमीत ये. हा आश्रम तुला नक्कीच प्रवेश देईल असे सांगितले. तोच मी. तुम्ही संबोधलेले तेच “धाकटा बाळ” हे नांव त्यावेळेपासून स्विकारुन आज या अनुयायी आश्रमात मनापासून अध्ययनाचे सातत्य ठेवले. आश्रमाच्या प्रथेप्रमाणे अध्ययन संपल्यावर दिलेल्या मोहीमेवर जाण्याबाबत माझ्या मनात अनेक शंका आहेत. तुमच्या इथल्या वास्तव्यात कोणीही अनुयायाने शंका विचारल्यावर त्याचा खुलासा करुन योग्य मार्गदर्शन करण्याची तुमची प्रथा मला चांगली आठवते. म्हणूनच एकेकाळी धाकटा बाळ म्हणून आपण नामकरण केलेल्या या बाळाच्या शंकाबाबत खुलासा करून मार्गदर्शन कराल या अपेक्षेने पत्र लिहीत आहे.

ज्या मूळ शंकेबाबत मार्गदर्शन हवे आहे त्यापुर्वी त्याच अनुषंगाने एक शंका निर्माण झाली आहे. ती प्रथम मांडतो. साहेब, माझी शंका तशी कोड्यांत टाकणारी नाही. तरीही आपण याचा खुलासा काय कराल याबद्दल मनात कल्पना उभी राहते आणि तीच निर्माण झालेली शंका आहे. आपण कळवाल कि “धाकट्या बाळा” तुझ्या शंकेचा खुलासा करण्याकरीता आपल्या आश्रमातून आपला कर्तव्यभाग पार पाडण्याकरीता बाहेर पडलेल्या असंख्य परिपूर्ण अनुयायापैकी तुझ्या शंका कोणालाही विचारल्यास तुला योग्य मार्गदर्शन मिळेल. इतके दूर पत्र लिहून तसदी का घेतोस ? याच निर्माण झालेल्या शंकेमुळे आपण वरील प्रमाणे मला सुचना केलीत तरी अमान्य करून तुमच्याच मार्गदर्शनाचा हट्ट धरायचा का ? हा कठीण व अवघड प्रश्न मला पडला. तथापि आपण अनुयायांना नेहमी सांगत असत की, या जगात अनेक समस्या कठीण व अवघड आहेत पण त्या सोडवणे अशक्य नाही. त्याची आठवण ठेवून मी ठरविलेला हट्ट धरावा हा माझा निर्णय आपण वरील प्रमाणे कळविण्यापूर्वीच सादर करतो. तुमची परवानगी मिळविणे हा माझा हट्ट आहे.

सद्यस्थितीत मला भेडसावणा-या शंका व हवे असलेले तुमचे मार्गदर्शन मिळविण्याकरीता मला तुमची परवानगी हवी आहे. पत्र संपवताना एक गोष्ट स्पष्ट करतो की, इथे कार्य मोहिमेवर कार्यरत असलेल्या अनेक अनुयायापैकी निश्चित शंका निरसन होईल व योग्य मार्गदर्शन मिळेल असा आपल्या संस्कृतींतील प्रथा – रिवाजाप्रमाणे आपण आश्रम कुटुंबातील जेष्ठ अनुयायास वारसा हक्काने दिलेले कारभारी हक्क धारण करणारे, तुमच्या आश्रम स्थलांतरा नंतर इथला कारभार पहाणारे “कारभारी” सक्षम आहेत. त्यांना तुमच्या अनुपस्थितीत “साहेब” म्हणण्याची सांस्कृतीक प्रथेतूनच या देशाला सवय लागली आहे. त्यामुळे आमच्या कारभा-यांना इतरा प्रमाणे मी सुध्दा “साहेब” च म्हणून संबोधत असतो. मुद्दाम कळवावे वाटते की, तुमच्या इथल्या वास्तव्यात तुमच्या सहवासासाठी, मार्गदर्शनासाठी, मदतीसाठी जमणारी गर्दी या साहेबांनाही सहन करावी लागते. तरीही ते नव्या उत्साहाने अशा गर्दीच्या समस्या जाणून घेण्यात व सोडवण्याच्या प्रयत्नात असतात. एक मात्र खरे कि, तुमच्या वास्तव्यात तुम्हाला भेटताना सामान्याला जे कष्ट व प्रतिक्षा करावी लागत असे तशीच स्थिती आमच्याही आज वाट्याला येत आहे.